'वस्तू' म्हणून 'कन्यादान' करतच नाहीत; लग्नातील हा विधी खूपच महत्त्वाचा... समजून घ्या त्यामागचा 'भावार्थ'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 10:46 AM2021-09-21T10:46:51+5:302021-09-21T10:47:41+5:30

विवाहासारख्या सुंदर सोहळ्यात कन्या ही उत्सवमूर्ती असताना तिला 'दानाची वस्तू' कसे ठरवले जाईल, हा साधा विचार आपण केला पाहिजे.

They do not give 'Kanyadan' as 'objects'; This wedding ceremony is very important ... Understand the 'meaning' behind it | 'वस्तू' म्हणून 'कन्यादान' करतच नाहीत; लग्नातील हा विधी खूपच महत्त्वाचा... समजून घ्या त्यामागचा 'भावार्थ'

'वस्तू' म्हणून 'कन्यादान' करतच नाहीत; लग्नातील हा विधी खूपच महत्त्वाचा... समजून घ्या त्यामागचा 'भावार्थ'

googlenewsNext

'कन्यादान नाही कन्यामान', अशी कुठलीशी ओळ कोणा अभिनेत्रीने वापरली आणि चर्चेची गुऱ्हाळे सुरू झाली. मूळात आपली संस्कृती, परंपरा, रूढी यामागील अर्थ समजावून न घेता  'उचलली जीभ, लावली टाळ्याला' असे आपण वागतो. आपल्या परंपरेतील कोणत्याही गोष्टी बिनबुडाच्या अजिबात नाहीत. परंतु पुरोहित जेव्हा त्या गोष्टींची उकल करून सांगत असतात, तेव्हा आपण ते लक्ष देऊन ऐकत नाही, पोथ्या-पुराणं-उपनिषदात दिलेली माहिती समजावून घेत नाही आणि नवीन बदल घडवू पाहतो. आता कन्यादानाचा विषय निघालाच आहे, तर त्याबद्दल सविस्तर समजावून घेऊ.

हिंदू विवाह पद्धतीत प्रत्येक विधीचा शास्त्रशुद्ध अर्थ आहे. मात्र  हे विधी सुरू असताना लोकांच्या भेटीगाठी घेण्यात, फोटाग्राफरला पोज देण्यात, वधू वराचे एकमेकांकडे चोरटे कटाक्ष टाकण्यात गुरुजींच्या सूचनांकडे दुर्लक्ष होते आणि त्याची किंमत आयुष्यभर चुकवावी लागते. प्रेत्यक विधीमागील अर्थ हा सुखी संसाराचा कानमंत्र आहे. तो लक्षपूर्वक ऐकावा. 

आपल्याकडे विवाह सोहळ्याची आखणी अतिशय सुंदर केलेली आहे. विहिणींची भेट, व्याह्यांची भेट, करवलीचा मान, कानपिळीचा मान, मामाचा मान, काकांचा मान, मंगलाष्टक म्हणताना आत्या, आजी, मामी, मावशीचा मान अशी सगळ्यांची दखल घेतलेली आहे. अशा या सुंदर सोहळ्यात कन्या ही उत्सवमूर्ती असताना तिला 'दानाची वस्तू' कसे ठरवले जाईल, हा साधा विचार आपण केला पाहिजे. 

दान म्हणजे देणे. कन्यादान म्हणजे कन्या देणे एवढा सोपा अर्थ आहे. इतर वस्तूंचे दान करताना 'इदं न मी मम' असे म्हणतो, परंतु मुलगी देताना वराकडून वचन घेतले जाते. मुलगी काही वस्तू म्हणून दिली जात नाही, तर वधूपिता वधूचा हात वराच्या हाती सोपवताना सांगतात, 'विधात्याने मला दिलेले वरदान, जिच्यामुळे माझ्या कुळाची भरभराट झाली, ती तुझ्या हाती सोपवत आहे. ती तुझ्या वंशाची वृद्धी करणार आहे. म्हणून धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशा चारही बाबतीत तिची प्रतारणा करू नकोस आणि तिच्याशी एकनिष्ठ राहा व दोघांनी सुखाचा संसार करा.' असे वचन घेतात.
त्यावर 'नातिचरामि ' म्हणत वर म्हणतो, 'तुम्हाला दिलेल्या वचनाचे मी उल्लंघन करणार नाही.'

केवढी मोठी जबाबदारी आहे ही! देवाब्राह्मणाच्या, नातेवाईकांच्या, आप्तेंष्टांच्या साक्षीने वधूपित्याने नवरदेवाकडून घेतलेले हे वचन आहे आणि त्यानेही पूर्ण विचारांती दिलेला शब्द आहे. तो शब्द पाळण्यासाठी तो कटिबद्ध झालेला आहे. 

हा प्रसंग, हा क्षण, हा विधी म्हणजे कन्यामानच नव्हे का? मग कन्यादान या शब्दात वावगे वाटण्यासारखे उरते तरी काय? ही केवळ खाजवून काढलेली खरूज आह़े. ती वाढण्याऐवजी वेळीच शमवलेली बरी! त्यासाठी माहितीचे, ज्ञानाचे, विचारांचे मलम हवे. त्यामुळे नवीन प्रथा पाडताना जुन्या प्रथा आधी समजावून घेऊया आणि आधुनिकतेला, जाहिरातबाजीला न भुलता आपली संस्कृती, परंपरा, वेद, शास्त्र, पुराणे यांचा सन्मान करूया.

Web Title: They do not give 'Kanyadan' as 'objects'; This wedding ceremony is very important ... Understand the 'meaning' behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.