दिस येतील अन् जातील...शासनाने सांगितलेला उपाय उत्तम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 04:11 AM2020-05-22T04:11:16+5:302020-05-22T04:11:47+5:30
पांडवांचासुद्धा एक वर्षाचा अज्ञातवास गेला. भीम स्वयंपाक्या, अर्जुन ब्रुहन्नडा झाला. तसं तुम्हाला व्हायचं नाही. पांडवाचं वर्ष गेलं. तुमचे महिने जातील.
- बा. भो. शास्त्री
अपाय हा स्वत:च्या चुकीने, प्रारब्धाने किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वांच्याच वाट्याला येत असतो. त्यावर आपण सर्वच उपाय शोधत असतो. खूप प्रयत्न करूनही यश आलं नाही तर हताश होतो. उपाय सापडत नाही. याचं दु:ख जगातल्या महापुरुषांच्या वाट्याला आलं आहे, ते त्यांना भोगावं लागलं; पण उपाय शोधून त्यांनी त्याचं निवारणही केलं आहे. कोरोनाने आपल्या जीवनावश्यक वस्तूंवर ताबा मिळविला आहे. त्याच वस्तू आपल्याविरोधात उभ्या आहेत. कोरोनाबाधित आपलीच भाजी, आपलीच फळं, जागेचा सात-बारा आपल्या नावावर; पण सत्ता त्याची. तिथं त्याचा स्पर्श ते आपल्याला अस्पृश्य झालं. वस्तूत दोष दिसला की, वैराग्य निर्माण होते. आता आपण थांबा व संयम ठेवावा. ‘दिस येतील, दिस जातील.’ पांडवांचासुद्धा एक वर्षाचा अज्ञातवास गेला. भीम स्वयंपाक्या, अर्जुन ब्रुहन्नडा झाला. तसं तुम्हाला व्हायचं नाही. पांडवाचं वर्ष गेलं. तुमचे महिने जातील. अंदमान येथे सावकरांची अकरा वर्षे गेली. तुम्हाला घरी सुरक्षित काही दिवस थांबायचं आहे. माणसं घरात कोंडली. तो स्वत:ला दुरुस्त करून घेताना दिसतो आहे. आमचा विसावा हेच निसर्गाचं आरोग्य. नद्या स्वच्छ करण्यासाठी करोडो रुपये खर्च करणे हा उपाय चुकीचा होता. आपल्या विश्रांतीतच निसर्गाची श्रीमंती आम्हाला दिसली. तसं आपल्याला समर्थन करता येणार नाही हे खरं; पण मरणाची भीती हे जास्त खरं आहे, अशी विश्रांती नको आहे. आज देव मंदिरात बंद आहेत; पण आपलं हृदय बंद नाही. अनेक गोरगरीब उपाशी मरताना दिसतात. त्यांना थोडीशी मदत करू शकतो. हाच देवाचा धर्म आहे. मंदिराची संपत्ती दान करणं हा मंदिराचा धर्म आहे. संत-महंतांना मिळालेला पैसा गरिबांना वाटणं हा त्यांचा धर्म आहे. उपाय नाही असं कसं शक्य आहे. रायगडावरून खाली जाण्याचे उपाय संपल्यावर हिरकणी अंधारात कडा उतरते. तिला कसा उपाय सापडला. आम्हाला शासनाने घरात राहाणे हा उपाय सांगितला आहे, तो उत्तम आहे.