तुझी करितांचि गोठी । प्रगटसी पाठींपोटीं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 05:28 PM2021-03-03T17:28:27+5:302021-03-03T17:28:35+5:30

हे सदगुरुनाथा, तुमच्या गोष्टी केल्या की  पाठीपोटी तुम्ही प्रगट होता व दृष्टी सन्मुख ठसावता.

Think of you and you appear in front | तुझी करितांचि गोठी । प्रगटसी पाठींपोटीं

तुझी करितांचि गोठी । प्रगटसी पाठींपोटीं

Next

                  संत श्री एकनाथ महाराज  स्तवन रुपाने सदगुरुंना म्हणतात
             तुझी करितांचि गोठी । प्रगटसी पाठींपोटीं ।
              सन्मुख ठसावसी दृष्टी । हृदयगांठी छेदूनी ॥
 
हे सदगुरुनाथा, तुमच्या गोष्टी केल्या की  पाठीपोटी तुम्ही प्रगट होता व दृष्टी सन्मुख ठसावता. दृष्टीत समोर तुम्ही मूर्त स्वरुपात उभे राहता. एवढेच काय हृदयगांठी छेदून  हृदयात  प्रगटता. आता हृदय गांठी काय आहेत?
                 
             सदगुरुंच्या गोष्टी म्हणजे सांसारिक गप्पा नाहीत. सदगुरूंच्या लिलांचे ज्या कथां मध्ये वर्णन असते त्याला युगेयुगे अनेक पवित्र नांवे दिली आहेत. शीख धर्मीय गुरु ग्रंथ साहिब म्हणतात. त्याचे पवित्र पठण जेथे होते तेथे गुरुव्दारे उभी केली आहेत. गुरुचरित्र दत्त मार्गी भक्तांचा अनुपम ग्रंथ आहे. गुरुवंदना आहे. एवढेच काय गुरुंचे अनन्य महत्व असलेला गुरुगीता हा ग्रंथ आहे. सदगुरु गजानन माऊलींचा श्री गजानन विजय ग्रंथ आहे.
                मनाचे एक मनोविज्ञान आहे. आम्ही मनाचे आवडीचे पुस्तक घेतले तर त्यातील कथा ह्या संंसारी असतात. त्यात कथेतून कथा निघते ती कधी मजेची असते, कधी सुखाची असते कधी दुःखाची असते, कधी  धिराची तर  कधी अधिराची. जितक्या मनोव्यथा तितक्या कथा, जितके मनोहर्ष तितक्या कथा. पृथ्वीवर जितकी माणसं असतील तितक्या कथा होऊ शकतात. कारण प्रकृतीने प्रत्येक माणसाला युनिक असे वेगवेगळे जीवन दिले आहे. वेगवेगळी सुखंदुःखं दिली आहेत.  कथा लेखक मोठ्या माणसाच्या कथा लिहितात. चरित्र लिहितात.  प्रेमचंद सारखे अव्दितीय लेखक छोटयात छोटया माणसाची व्यथा कथा लिहितात. 
             अशा पुस्तकाची कितीही वेगळी नांवे असली तरी त्याचे जर तात्पर्य स्वरुप नांव देतो म्हटले तर एकच शिर्षक ठसते. ते म्हणजे "याला जीवन ऐसे नांव." संसारी माणसाचा कथा ग्रंथ वा सदगुरुंचा कथा ग्रंथ यातील भेद जाणतो म्हटले तर दोन्ही कथा ग्रंथ आहेत. ग्रंथ शब्द हा ग्रंथि पासून येतो. ग्रंथि पासूनच अपभ्रंशित अर्थ गांठ असाही होतो. गांंठचा अर्थ अनेक गोष्टी, अनेक तत्व, अनेक काही घटकांचे एकाच ठिकाणी संचित होणे. म्हणून स्थुलरुपाने विचार करता संसारी कथा ग्रंथ व गुरुकथा ग्रंथ हे समान कागदी ग्रंथ वाटत असले तरी गुरुग्रंथाचे पोटी  परिणामात्मक मोठा भेद आहे. संसारकथा ग्रंथ  डाेळ्या समोर सुखदुःखाची दृष्ये निर्माण करतात. सिनेमा सांसारिक  कथांचेच चित्रण आहे. सिनेमा पाहिला की त्यातील घटना सदैव नजरेपुढे उभ्या होतात. त्याच काल्पनिक घटना अनेक सुखदुःखाच्या हृदयात चिवट गांठी निर्माण करतात. ज्या आयुष्यभर हृदयात ठसठसतात. परतुं गुरु कथा ग्रंथ वाचला की हृदयातील अशा प्रकारच्या ज्या काही  ग्रंथि, गांठी असतील त्या छेदल्या जातात. सदगुरुनाथ पाठीपोटी व सन्मुख प्रगट राहतात. हृदयातील गांठीच्या पोकळीत गुरुभक्तीचा आनंदनाद घुमतो. 
               पाठीपोटी हा फार सुंदर शब्द आहे. स्थुल अर्थाने व त्याच्या सुक्ष्म अर्थाने. स्थुल अर्थाने पोट बाह्यतः दिसत असले तरी त्याचे अस्तित्व आंत आहे व पाठीचे  आत नाही अस्तित्व बाहेर आहे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात,  सदगुरुनाथा तुमच्या गोष्टी, कथा, लिला ऐकल्या की,  तुम्ही अंर्तबाह्य व्यापून दृष्टी समक्ष साक्षात होता व हृदयाच्या गांठी नष्ट करता.
        आतळतां तुझे चरण । आकळलें राहे मन ।
        सहज देशी समाधान । आनंदघन अच्युता ॥
 
आतळताचा अर्थ होतो स्पर्श होणे, संसर्ग होणे व आकळताचा अर्थ होतो बोध होणे. सदगुरुंचे चरणाचा स्पर्श झाला की, मनाचा बोध होणे सुरु होते.मन जे सतत संसारात भटकविते. गुरुचरण स्पर्शाची किमयाच की मनाचा स्वभाव भक्ताला कळणे सुरु होते. त्याचा स्वभाव कळणे म्हणजे मनाचे तावडीतून भक्ताची सुटका होणे. जसा दुष्ट ओळखु पडला की मनुष्य त्याला जसे ना मैत्री भली ना शत्रुत्व भले या बोधाने  राहतो.  दोन तोडांचा सांप वागवतांना माणूस जसा दोन्ही तोंडाबद्दल सावध असतो. तसाच भक्तही मनाशी संसारी दोस्ती नाही व  अध्यात्मिक हटवादी त्यागही नाहीअसा राहतो. एकनाथ महाराज म्हणतात,  यामुळे सदगुरुनाथा, हे आनंदघन अच्युता,  तुम्ही भक्ताला समाधान देता. 
               आनंदघन आहेत म्हणजे आनंदाने घनरुप आहे. आनंदाचे घनत्व असे आहे की, त्याला अन्य कशानेही छेद नाही केल्या जाऊ शकत. अच्युत आहेत म्हणजे अचल आहेत, स्थिर आहेत. सदगुरु हे अनंतकोटी ब्रह्मांडनायक आहेत, महाराजाधिराज योगीराज आहेत, परब्रह्म आहेत. अशा सच्चिदानंद स्वरुप सदगुरुंचा, समर्थ श्री गजानन महाराजांचा  जय जयकार असो.
                    
सदगुरु श्री एकनाथ महाराज चरणी श्रध्दा नमन!             

                                                   शं.ना.बेंडे पाटील

Web Title: Think of you and you appear in front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.