हरिपाठातला 'हा' अभंग म्हणजे अध्यात्माशी संबंधित आपल्या पडणाऱ्या प्रश्नांची माउलींनी दिलेली उत्तरंच आहेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 10:25 AM2023-04-24T10:25:50+5:302023-04-24T10:26:37+5:30
आजही अनेक घरात हरिपाठ नित्यनेमाने म्हटला जातो, त्यातील शब्दरचनेकडे डोळसपणे पाहिले असता अध्यात्माची उकल सहज होऊ शकेल.
>> समीर सुनिल तुर्की, आळंदी
श्रीमाऊलींच्या प्रत्येक रचनेत काही न काही नवलच सापडतं.. अगदी प्रत्येक वेळी...अर्थात ते ह्याआधीही अनेकांना सापडलं असेलच.. अगदी खात्रीशीर, निःसंशय..रात्री सहज हरिपाठ म्हणत असतांना एक अशीच फोड अनुभवायला मिळाली. श्रीमाउलींनी सर्वसामान्य लोकांना धर्म सांगितला, शिकवला, रुजवला तो किती सहज सुलभ आणि अत्यंत विशुध्द प्रकारचा आहे हे वेगळं सांगायला नकोच. मुळातच हा सगळाच पूर्णतः वेगळा आणि संशोधन व अभ्यासाचा विषय होऊच शकतो.
केवळ साधना करा असं न सांगता पाठोपाठ त्याचं फळ काय आहे हेसुद्धा नकळतपणे सांगणाऱ्या श्रीमाऊलींच्या एकमेवाद्वितीय कवित्वाची प्रचिती नव्याने अनुभवणं हेच मुळी एका वेगळ्या लेव्हलच सुख आहे.
माऊलींनी हरिपाठात साधना काय करावी आणि फळ काय मिळेल हे प्रत्येक चरणात पूर्वार्धात साधना आणि उत्तरार्धात फळ असे सांगितले आहे. उदाहरण म्हणून...
१. साधना-देवाचिया द्वारी उभा क्षणभरी।
फळ-तेणे मुक्तीचारी साधियेल्या ।।
२. साधना-हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
फळ-पुण्याची गणना कोण करी।।
३. साधना-ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ।
फळ-भरला घनदाट हरि दिसे।।
४. साधना-ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी।
फळ-अनंत जन्मोनी पुण्य होय।।
५. साधना-ज्ञानदेव म्हणे हरीजप करणे।
फळ-तुटेल धरणे प्रपंचाचे।।
संपूर्ण हरिपाठ असाच अनेक गूढ, अगम्य ज्ञानाने ओतप्रोत भरलेला आहे. जितकं जास्त चिंतन करता येईल तेवढं उलगडत जाईल..
श्रीमाउलींनी पुढच्या जन्मी तरी "मेधावी" बनवावं आणि सेवेतही ठेवावं इतकंच!