अकोल्याच्या शिवजयंती उत्सवात गजानन महाराज उपस्थित होते तेव्हा असा घडला चमत्कार...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 05:57 PM2022-02-21T17:57:25+5:302022-02-21T17:58:04+5:30
अकोल्यास शिवजयंतीस लोकमान्य टिळकांना अध्यक्ष म्हणून आणायचे ठरले. लोकमान्यांनीही ते मान्य केले. या उत्सवास शेगावच्या गजानन महाराजांना आणूया म्हणून ...
अकोल्यास शिवजयंतीस लोकमान्य टिळकांना अध्यक्ष म्हणून आणायचे ठरले. लोकमान्यांनीही ते मान्य केले. या उत्सवास शेगावच्या गजानन महाराजांना आणूया म्हणून ठरले. खापर्डे कोल्हटकर यांना आनंद झाला. ते महाराजांना या उत्सवाचे आमंत्रण देण्यास गेले. तेव्हा महाराज म्हणाले, 'अकोल्यास शिवजयंतीच्या उत्सवास आम्ही जरूर येऊ, तुम्ही निर्धास्त राहा. आमच्यामुळे तिथे कोणतेही संकट येणार नाही.'
शिवजयंती उत्सवास लोक लांबलांबून आले. भव्य मंडप भरून गेला. महाराज व्यासपीठावर विराजमान झाले. लोकमान्य टिळक सिंहासनाच्या अग्रभागी बसले. त्यांच्याजवळ अप्पासाहेब पटवर्धन, गणेश खापर्डे, दामले, कोल्हटकर, भावे, व्यंकटराव देसाई इ. पुढारी व्यासपीठावर बसले होते.
लोकमान्य टिळकांनी उद्गार काढले,
दिवस आजचा धन्य धन्य, आहे पहा हो सज्जन
स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण, खर्चिले आपुले पूर्वकाली,
त्या धनुर्धर योध्याची, वीर गाजी शिवाजीची
जन्म जयंती आहे साची, म्हणून आपण मिळालो।
त्या रणगाजी शिवाजीला, रामदासे हाती धरिला,
म्हणून त्याचा बोलबाला, झाला भारतखंडामध्ये।।
तेवीच आज येथे झाले, आशार्वाद द्याया आले,
श्री गजानन साधु भले, आपुलीया सभेस।।
महाराज सभेला बैठकीवर बसलेले सर्वांनी पाहिले. परंतु ते कोठून आणि कसे आले, हे कोणालाच कळले नाही. असे हे स्वामी महाराज कधी, कोणास, कशी भेट देतील माहित नाही. म्हणून मनात भाव शुद्ध असावा आणि ओठांवर महाराजांचा नित्य जप असावा...गण गण गणात बोते...!