हरीण आणि उंटाची 'ही' बोधकथा शिकवते सुखापेक्षा समाधान मिळवण्याचे महत्त्व!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 07:00 AM2023-08-03T07:00:00+5:302023-08-03T07:00:01+5:30
सद्यस्थितीत आपण सगळेच मृगजळामागे धावत आहोत, पण ते कधी हाती लागणार नाही; सुख हेदेखील मृगजळच आहे!
जीवघेण्या उन्हाने तो वाळवंटी परिसर अतिशय उजाड, रखरखीत, दयामाया नसलेल्या निष्ठुर काळासारखा वाटत होता. त्या गरीब बिचाऱ्या हरणाची अवस्था अत्यंत शोकाकुल होती. तृष्णेमुळे विचारबुद्धी जणू नष्टच झाली होती.
पाण्याच्या शोधार्थ भटकत असताना, त्याला एके ठिकाणी पाण्याचा साठा दिसला. ते आनंदातिशयाने त्याच्या रोखाने धावू लागले आणि आता ते पाणी आपणास प्राप्त होणार असे त्याला वाटले, पण तिथे होता केवळ भास!
कधीही तहान न भागवणाऱ्या मृगजळामागे ते धावले होते. इतक्यात त्या हरणाला वाटले की त्या वृक्षाजवळ पाणी आहे. बिचारे, त्या विचाराने पुलकीत होऊन त्या जवळ गेले. परंतु पदरी पुन्हा निराशाच आली. मुळात तो वृक्ष नव्हताच. तर कोणीतरी टाकलेल्या फांद्या असलेला लाकडी ओंडका होता. जलाचे भास त्या अज्ञानी मृगाला होत राहिले आणि त्यांना बळी पडून तो वेडापिसा धावत राहिला. पाण्यासाठी व्याकुळ झालेले त्याचे शरीर जणू मृत्यूपंथाला लागले.
एवढ्यात एक उंट त्याच्याजवळ आला व त्याला म्हणाला,
'रे मृगा, मगापासून मी पाहतो आहे, किती मैल तू या परिसरात धावत आहेस. त्याऐवजी योग्य विचाराने, रस्त्याने तू जर या वाळवंटी परिसरातून बाहेर पडला असतास तर एवढ्याच धावपळीत पलीकडेच एक कधीही न आटणारा लहानसा झरा आहे तो तुला नक्की दिसला असता. अरे केवळ आभासामुळे तुझी भयंकर दिशाभूल झाली.
या हरणाप्रमाणे आपणही आयुष्यभर मृगजळाप्रमाणे धावत राहतो आणि हाती काहीच लागले नाही म्हणून उद्विग्न होतो. मृगजळ आभासी असते. हे माहीत असतानाही त्यामागे धावणे, हे स्वत:चीच फसवणूक करण्यासारखे आहे. अशी दिशाभूल होऊ नये, म्हणून वेळोवेळी त्या त्या क्षेत्रातील उंटासारख्या अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन घ्यायला हवे, म्हणजे पश्चात्तापाची वेळ येत नाही.
समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन करतात-
असे सार साचार ते चारिलेसे,
इही लोचनी पाहता दृश्य भासे,
निराभास निर्गुण ते आकळेना,
अहंतागुणे कल्पिताही कळेना।
चित्त, मन, बुद्धी, अहंकार, इंद्रिय हे भ्रामक जग मृगजळाप्रमाणे आहे. त्या वर्तुळात आपण फिरत राहतो आणि निराश होतो. परंतु खरे सुख, आनंद, समाधान ज्या परमतत्त्वात आहे, त्याला आपण ओळखत नाही. कारण त्याच्याकडे या चर्मचक्षूंनी नाही, तर ज्ञानचक्षूंनी पाहता येते.