प्रेमळ मनाने आर्त साद घालणाऱ्यांना नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची प्रचिती येते, हा भक्तानुभव!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 07:00 AM2024-01-13T07:00:00+5:302024-01-13T07:00:02+5:30

आज पौष शुद्ध द्वितीया, कलियुगातील द्वितीय श्रीदत्तावतार, भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जयंती; जाणून घेऊया त्यांच्याबद्दल!

Those who called with loving heart get to know Nrisimha Saraswati Swami Maharaj, this devotee experience! | प्रेमळ मनाने आर्त साद घालणाऱ्यांना नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची प्रचिती येते, हा भक्तानुभव!

प्रेमळ मनाने आर्त साद घालणाऱ्यांना नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची प्रचिती येते, हा भक्तानुभव!

>> रोहन विजय उपळेकर

भगवान श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी महाराजांनी, कुरवपूरच्या कृष्णानदीत जीव द्यायला आलेल्या एका दुर्भागी स्त्रीला, पुढील जन्मी उत्तम पुत्र होण्यासाठी शनिप्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले होते. तीच पुढच्या जन्मी अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी जन्माला आली. पुढे त्याच गावातील माधव विप्राशी या अंबा नामक स्त्रीचा विवाह झाला. पूर्वावतारात दिलेल्या आशीर्वादानुसार, भगवान श्रीदत्तप्रभूंनी श्री नरहरी रूपाने तिच्या पोटी, शके १३०० अर्थात् इ.स. १३७८ मध्ये पौष शुद्ध द्वितीयेला मध्यान्ही कलियुगातील आपला दुसरा अवतार घेतला.

भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या लाखो लीलांपैकी काही अद्भुत लीला श्रीगुरुचरित्रात वर्णन केलेल्या असून, श्रीदत्तसंप्रदायात या ग्रंथराजाला वेदतुल्य मानून याची उपासना केली जाते.

भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाची पहिली ८-१० वर्षे कारंज्याला राहिले. तेथे त्यांनी अलौकिक बाललीला केल्या. मौंजीबंधन होईपर्यंत ते फक्त ॐ एवढाच उच्चार करीत असत. त्यांच्या आई-वडिलांना वाटले की, बालक मुके आहे की काय? पण त्यांनी मुंजीच्या भिक्षावळीत चारही वेदांचे पठण करून मौन सोडले. त्यानंतर ते एक वर्ष ज्ञानी लोकांना वेदादी शास्त्रे शिकवत होते.  नंतर काशी येथे जाऊन त्यांनी श्रीमत् कृष्ण सरस्वती स्वामी यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली व पुढील तीस वर्षे उत्तरेत व उर्वरित भारतात जगदोद्धारार्थ भ्रमण करून पुन्हा कारंज्याला आले. तेथून मग गोदावरीच्या तीराने भ्रमण करीत करीत ते वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले. तेथून कृष्णामाईच्या तीराने भ्रमण करीत औदुंबर क्षेत्री आले. तेथे एक चातुर्मास्य राहिले. तेथे त्यांच्या स्मरणार्थ पुढे 'विमल पादुका' स्थापन करण्यात आलेल्या आहेत. औदुंबरहून पुढे ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आले. तेथे त्यांचे बारा वर्षे वास्तव्य झाले. तेथे श्रींनी आपल्या 'मनोहर पादुका' व अन्नपूर्णामातेची स्थापन केली व मग ते गाणगापूर क्षेत्री आले. तेथे त्यांचे चोवीस वर्षे वास्तव्य झाले. त्यानंतर अंदाजे वयाच्या ऐंशीव्या वर्षी, गाणगापुरात  'निर्गुण पादुका' स्थापून ते श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे जाऊन योगमार्गाने मल्लिकार्जुनाच्या लिंगात अदृश्य झाले. त्यांनी लौकिक अर्थाने देहत्याग केलेला नाही. श्रींचा जो अपार्थिव, दिव्य-पावन श्रीविग्रह अशाप्रकारे स्थूलरूप धारण करून कार्यरत होता, तोच आजही गुप्तरूपाने व पादुका रूपाने अखंडपणे भक्तांचे सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण करीत आहे व पुढेही करीत राहीलच.

भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी त्याकाळात लोप पावत चाललेल्या वेदविहित धर्माची पुनर्स्थापना केली. लोकांमध्ये भक्तिमार्गाचा प्रसार केला. ते स्वत: अत्यंत कडक आचरण करीत असले तरी, त्यांनी कृपा करण्यात भक्तांचा जात-धर्म कधीच पाहिला नाही. जसे चारही वेदांचे ज्ञानी ब्राह्मण, श्रेष्ठ संन्यासी त्यांचे शिष्य होते, तसेच भक्तराज तंतुक, पर्वतेश्वर शूद्र व बिदरचा मुसलमान बादशहा असे अन्य जाती-धर्मातील हजारो भक्तही त्यांच्या कृपेने धन्य झालेले होते. ते कृपाळू व परमदयाळूच आहेत. जगाच्या कल्याणासाठी आलेल्या अवतारांना, संतांना जात-धर्म यांच्या चौकटीत बसवणे हा वेडगळपणाच नव्हे काय?

भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे स्मर्तृगामी व स्मरणमात्रे संतुष्ट होणारे परमदयाळू व भक्तवत्सल आहेत. प्रेमभराने व निर्मळ अंत:करणाने त्यांना घातलेली साद त्यांच्यापर्यंत पोचतेच पोचते, असा लाखो भक्तांचा आजवरचा रोकडा अनुभव आहे. श्रीदत्तसंप्रदायातील थोर विभूतिमत्व  प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्याकडून ऐकलेले आहे की, भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे अत्यंत ऋजू अंत:करणाचे परमशांत असे अवतार आहेत. त्यांच्या दयाकृपेला ना अंत ना सीमा. त्यांच्या भक्तवात्सल्य ब्रीदाचे यथार्थ वर्णन करताना श्री गुरुभक्तही हेच म्हणतात,

अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारु मोठा रे ।
संकटिं भक्ता रक्षी नानापरी ।
रुतूं देईना पायी कांटा रे ॥
शरणांगता जना पाठिसी घालुनी ।
कळिकाळासी मारी सोटा रे ॥
अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारु मोठा रे ।

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी ही श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी आहे. तेथे ते निरंतर राहून भक्तकल्याण करीत असतात. त्यांचेच प्रत्यक्ष अधिष्ठान आमच्या श्रीक्षेत्र दत्तधाम येथेही आहे. " वाडी-गाणगापूर प्रमाणे आम्ही दत्तधाम येथेही निरंतर वास्तव्य करू ", असा प्रेमळ आशीर्वाद त्यांनी स्वत: प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना दिला होता. त्यांच्या त्या अमृतशब्दांची आजही सतत प्रचिती येत असते.

प.प.श्री.नारायणस्वामी महाराजांचे शिष्योत्तम, वाडीतील ढोबळे पुजारी उपनावाचे व श्री गुरुभक्त ही नाममुद्रा धारण करणारे थोर भक्तवर, भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांविषयीचा आपला दृढ प्रेमभाव व्यक्त करताना म्हणतात,

त्रैलोक्याचा राजा ।
नरहरि तो माझा तो माझा ॥ध्रु॥
नांदे अमरापूर ग्रामीं ।
कृष्णातीरीं यतिवरस्वामी ॥१॥
नृसिंहसरस्वती करुणामूर्ति ।
त्रिभुवनिं गाती ज्याची कीर्ति ॥२॥
श्रीधरविभु निजकैवारी ।
भावें भजतां भवभय वारी ॥३॥

या अखिल ब्रह्मांडांचे नायक असणा-या, भक्तांचे भवभय वारण करणा-या, कृष्णातीरी नित्य नांदणा-या, त्रिभुवनात ज्यांच्या कीर्तीचा डंका सदैव वाजत असतो, त्या परमदयाळू परमकनवाळू महाराजाधिराज श्रीमत् नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं, आज जयंतीदिनी प्रेमभराने साष्टांग दंडवत घालून आपण त्यांचेच परमपावन नाम घेत त्यांना कृपाप्रसादाची प्रार्थना करूया !!

अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।

संपर्क -8888904481

Web Title: Those who called with loving heart get to know Nrisimha Saraswati Swami Maharaj, this devotee experience!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.