'अजूनही माणुसकी शिल्लक आहे...' याची जाणीव करून देणारा रोमांचकारी प्रसंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 08:00 AM2021-08-04T08:00:00+5:302021-08-04T08:00:12+5:30

ऊस डोंगापरी। रस नोहे डोंगा। काय भुललासी। वरलिया रंगा...

A thrilling event that makes one realize that 'there is still a balance of humanity ...'! | 'अजूनही माणुसकी शिल्लक आहे...' याची जाणीव करून देणारा रोमांचकारी प्रसंग!

'अजूनही माणुसकी शिल्लक आहे...' याची जाणीव करून देणारा रोमांचकारी प्रसंग!

Next

एक अतिशय रूपवान स्त्री, जिला स्वत:च्या सौंदर्याचा अतिशय अहंकार होता. ती एकदा विमान प्रवासात जात असताना तिच्या बाजूला एक दिव्यांग माणूस सहप्रवासी म्हणून बसला होता. तिने हवाईसुंदरीला बोलावून तक्रार केली आणि आपल्यासाठी दुसरीकडे बसण्याची व्यवस्था करावी असे सांगितले. हवाईसुंदरीने कारण विचारले असता ती रूपगर्विता म्हणाली, `माझ्या बाजूला असा दिव्यांग सहप्रवासी असताना मला प्रवास करणे अवघड जाईल.' 

हवाईसुंदरीला तिच्या बोलण्याचे नवल वाटले. परंतु त्यांच्यासाठी सर्व प्रवासी समान असल्यामुळे तिने विनम्रतेने काही उपाय करता येतोय का असे कळवते म्हणत विमानाच्या कॅप्टनची भेट घेतली.

थोड्यावेळाने हवाईसुंदरी परतली आणि तिने त्या रूपवतीला सांगितले, 'मॅडम, बैठक व्यवस्था बदलणे हे आमच्या नियमाबाहेर असूनसुद्धा आमच्या कॅप्टनने निर्णय घेतला आहे की जनरल कोचवरील प्रवाशाला फर्स्ट क्लास कोचमध्ये जागा द्यावी.'

हे ऐकून त्या रुपवतीला मूठभर मांस चढले. तिने बाजूला बसलेल्या सहप्रवाशाकडे कुत्सितपणे पाहिले आणि ती डोळ्यावर गॉगल चढवून जायला निघणार, तोच हवाईसुंदरी म्हणाली, 'क्षमा करा मॅडम, ही सुविधा तुमच्यासाठी नसून कॅप्टनने या दिव्यांग प्रवाशाला बिझनेस क्लासमधून प्रवास करण्याची मुभा दिली आहे.'

हे ऐकताच रुपवतीला मोठा धक्का बसला आणि त्याचवेळेस दिव्यांग प्रवाशाच्या डोळ्यात अश्रू आले. तो उभा राहताच विमानातील इतर प्रवाशांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. तेव्हा सद्गदित होऊन दिव्यांग प्रवासी म्हणाला, 'अजून माणुसकी शिल्लक आहे, यावरील माझा विश्वास दृढ झाला. मीदेखील तुमच्यासारखाच देहाने सुदृढ होतो. परंतु कारगील युद्धात लढताना मी माझे दोन्ही हात गमावले आणि मी दिव्यांग झालो. कॅप्टनने हे सत्य माहित नसतानाही एका दिव्यांग व्यक्तीचा केलेला सन्मान हा समस्त जवानांचा व दिव्यांग बांधवांचा सन्मान आहे असे मी समजतो.'

आता कुत्सितपणे पाहण्याची वेळ त्या दिव्यांग प्रवाशाची होती. परंतु त्याने तसे केले नाही. अन्यथा ते वर्तन माणुसकीला शोभले नसते. हे भान त्याने राखले आणि बिझनेस कोचमधून सन्मानपूर्वक पुढचा प्रवास सुखाने केला. त्यावेळेस त्या सुंदर रूपवतीची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी! 

म्हणून संत चोखामेळा म्हणतात, 

ऊस डोंगापरी। रस नोहे डोंगा। 
काय भुललासी। वरलिया रंगा।। 

Web Title: A thrilling event that makes one realize that 'there is still a balance of humanity ...'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.