प्रेमप्रीतीचें बांधलें । ते न सुटे कांही केले ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 12:09 PM2021-02-11T12:09:49+5:302021-02-11T12:11:19+5:30

प्रेमप्रीतीचें बंधन सहजासहजी तोडता येत नाही. एका गंध विषयाने जर त्या (भ्रमर) जीवाचा अंत केला तर पांचही विषय रात्रंदिवस उपभोगणाऱ्या या देहाचा अंत व्हायला वेळ लागेल का..? माणूस तर विषयसेवनाखेरीज अन्य कांहीच करीत नाही.

tied the knot of love. doesn't leave easily. | प्रेमप्रीतीचें बांधलें । ते न सुटे कांही केले ॥

प्रेमप्रीतीचें बांधलें । ते न सुटे कांही केले ॥

Next

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र. )


जो शुष्क काष्ठ स्वयेकोरी । तो कोवळ्या कमळा माझारी ।
भ्रमर गुंतला गंधावरी । कमळास तरी कुचंबो नेदी ॥

शांतीसागर एकनाथ महाराजांनी या ओवीत भ्रमराचा एवढा समर्पक दृष्टांत दिला आहे तो एवढ्यासाठी की, या ओवीत भ्रमर गंधावर एवढा लुब्ध होतो की, आपले अनमोल जीवन तो कमळाच्या गंधावर भुलून समर्पित करतो. मोठमोठ्या इमारतीची लाकडे पोखरण्यात पटाईत असणारा हा भुंगा, कमळातील परागकण सेवन करण्यासाठी त्या सूर्यविकासिनी कमळात प्रवेश करतो. त्या कमळातील गंध विषयाला तो इतका लुब्ध होतो की, कमळाच्या पाकळ्या गळून खाली पडू नये म्हणून तो पंखसुद्धा हलवित नाही. गंधाचे सेवन करता करता सूर्यविकासिनी कमळ आपल्या पाकळ्या मिटून घेते. आत हा भुंगा कोंडून पडतो. कशाच्या आशेने तर, उद्या सकाळ होईल, सूर्योदय होईल व या कमळाच्या पाकळ्या पुन्हा उमलतील.. हा हा म्हणता रात्र निघून जाईल व सूर्य उगवला, कमळाने आपल्या पाकळ्या उघडल्या की, आपण सुखरुप या कमळांतून बाहेर पडू..! असा विचार हा भ्रमर करतो. सुभाषितकारांनी अत्यंत रसभरीत वर्णन केले आहे ते म्हणतात-

रात्रि र्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम् ।
भास्वान् उदेष्यति हसिष्यति पंकजश्री: ।
इत्थं विचिंतयति कोषगते द्विरेके ।
हा हन्त नलिनी गज उज्जहार ॥

सकाळी बाहेर पडू असा विचार हा भ्रमर करतो खरा पण घडते काय..? सायंकाळच्या वेळी एक हत्ती त्या सरोवरात पाणी पिण्यासाठी येतो. सरोवरात जलविहार करता करता हत्ती आपल्या सोंडेने ते कमळ देठासकट उपटून पायाखाली चिरडून टाकतो आणि त्यातच या भ्रमराचा किंवा भुंग्याचा अंत होतो. अहो..! लाकडे पोखरण्यात पटाईत असणाऱ्या या भुंग्याला कमळ पोखरता आले नसते का..? पण तो गंध या विषयाच्या प्रेमात पडून स्वतःचा अंत करुन घेतो. तुकाराम महाराजांनी एका अभंगात दृष्टांत दिला -

नाही काष्ठाचा गुमान । गोंवी भ्रमरां सुमन ।
प्रेमप्रीतीचें बांधलें । ते न सुटे कांही केले ॥

प्रेमप्रीतीचें बंधन असे सहजासहजी तोडता येत नाही. एका गंध विषयाने जर त्या (भ्रमर) जीवाचा अंत केला तर पांचही विषय रात्रंदिवस उपभोगणाऱ्या या देहाचा अंत व्हायला वेळ लागेल का..? माणूस तर विषयसेवनाखेरीज अन्य कांहीच करीत नाही.
ज्ञानराज माऊली म्हणतात -

जैसा भ्रमर भेदी कोडे । भलतैसे काष्ठ कोरडे ।
परी तो कमलकलिकेमाजि सापडे । कोवळिये ॥

तेव्हा अमर्याद विषयसेवन हे जीवाचा सर्वस्वी नाश करणारच..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

Web Title: tied the knot of love. doesn't leave easily.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.