तिरुपती मंदिरात आता AI वापरणार; भाविकांच्या सोयीसाठी TTD घेणार पुढाकार, नेमके काय करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 13:24 IST2024-12-24T13:24:42+5:302024-12-24T13:24:52+5:30
Tirumala Tirupati Balaji Sri Venkateswara Temple: तिरुमला तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर मंदिराला जगातील सर्वांत आदर्श तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी, मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. AI तंत्रज्ञानाचा भाविकांना कसा फायदा होणार? जाणून घ्या...

तिरुपती मंदिरात आता AI वापरणार; भाविकांच्या सोयीसाठी TTD घेणार पुढाकार, नेमके काय करणार?
Tirumala Tirupati Balaji Sri Venkateswara Temple: तिरुमला तिरुपती बालाजी श्री व्यंकटेश्वर मंदिर हे जगातील सर्वांत श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. दरवर्षी कोट्यवधी भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. कित्येक तास रांगेत उभे राहून भाविक तिरुपती बालाजीचे दर्शन घेतात. या मंदिरात दान स्वरुपात कोट्यवधी रुपये, सोने-चांदींच्या वस्तू मोठ्या प्रमाणात येत असतात. भाविकांच्या सोयीसाठी टीटीडी समिती विविध उपाययोजना करत असते. अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतात. यातच आता भाविकांच्या सोयीसाठी तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात AI चा वापर करण्याची तयारी मंदिर प्रशासनाने सुरू केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तिरुमला तिरुपती बालाजी श्री वेंकटेश्वर मंदिरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा वापर करण्याबाबत विचार केला जात आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी ऑटोमेशन आणि एआय चॅटबॉट्स देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यामुळे भक्तांच्या सोयी, सुविधा तसेच सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
तिरुपती बालाजी मंदिरातील AI च्या वापराने काय फायदा होणार?
तिरुमला तिरुपती देवस्थानम टीटीडीचे कार्यकारी अधिकारी श्यामला राव यांनी याबाबत माहिती दिली आहे. आताच्या घडीला भाविकांच्या राहण्यासंदर्भात, दर्शनाबाबत तसेच अन्य सेवांसाठी मानवी स्तरावर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खूप वेळ खर्च होतो. त्यामुळेच मंदिर प्रशासनाने AI ची मदत घेण्यासाठी तयारी सुरू केली असून, याचा भाविकांना फायदा होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI मुळे भाविकांना तत्काळ, अद्ययावत आणि चांगल्या सेवा देता येऊ शकणार आहेत. ऑटोमेशन प्रक्रियेमुळे मंदिरात येणाऱ्या यात्रेकरूंना चांगला अनुभव मिळेल आणि सेवेत पारदर्शकताही वाढेल, असा विश्वास राव यांनी व्यक्त केला.
भाविकांचे प्रश्न आणि AI चॅटबॉटची उत्तरे
भाविकांच्या तसेच पर्यटकांच्या मदतीसाठी एआय चॅटबॉटचा वापर केला जाणार आहे. हा चॅटबॉट पर्यटकांच्या तसेच भाविकांच्या प्रश्नांची तत्काळ उत्तरे देईल आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करेल. यामुळे भाविकांना त्यांच्या समस्यांसाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची गरज लागणार नाही. भाविकांना आवश्यक असलेली माहिती AI च्या मदतीने लगेचच उपलब्ध होऊ शकणार आहे.
तंत्रज्ञान आणि पवित्रता यांचा संगम
भावी पिढ्यांसाठी तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराचे अध्यात्मिक आणि सांस्कृतिक पावित्र्य जपत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून सेवांच्या माध्यमातून भाविकांना चांगला अनुभव देणे हेच मंदिर प्रशासन समितीचे उद्दिष्ट आहे. मंदिर प्रशासन मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या पारंपारिक सौंदर्य आणि आधुनिक कार्याचा मिलाफ करण्याच्या व्हिजननुसार तिरुमला तिरुपती मंदिराच्या विकासासाठी काम करत आहे. तसेच व्हिजन २०४७ अंतर्गत जगातील सर्वांत श्रीमंत हिंदू मंदिर सर्वांत आदर्श तीर्थक्षेत्र बनवणे हे TTD चे उद्दिष्ट आहे. यासाठी मंदिर प्रशासन पर्यावरण व्यवस्थापन, विकास आणि वारसा संवर्धनावर विशेष लक्ष देणार आहे. हे पाऊल तिरुमला तिरुपती मंदिराला एक आदर्श तीर्थक्षेत्र बनवण्यात मदत करेल, जिथे भाविकांना तसेच पर्यटकांना चांगली सेवा मिळेल आणि मंदिराचे पावित्र्यही राखले जाईल, असे राव यांनी नमूद केले.