तुळशीचे पावित्र्य जपण्यासाठी 'या' गोष्टी कटाक्षाने टाळा आणि दिलेली नियमावली पाळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 04:29 PM2022-03-24T16:29:54+5:302022-03-24T16:30:57+5:30
तुळशीभोवती अनावश्यक वस्तू ठेवू नका; जसे की...
हिंदू धर्मात तुळशीला मातेसमान मानले जाते. ज्या घरात तुळशी असते तिथे सुख-समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे. दैनंदिन पूजेतही आपण कृष्णाला विष्णुरूप मानून तुळशीचे दल अर्पण करतो आणि तीर्थ प्रसादावरही तुळशीचे पान ठेवतो. या योगे तुळशीशी आपले नित्य सान्निध्य राहते. मात्र तिचे पावित्र्य जपले जावे यासाठी पुढील गोष्टी कटाक्षाने टाळा!
तुळशीभोवती अनावश्यक वस्तू ठेवू नका; जसे की...
>>ज्या ठिकाणी तुळशीचे रोप आहे त्याच्या आजूबाजूची जागा पूर्णपणे स्वच्छ असावी. जर तुळशी वाळत असेल किंवा कोमेजत असेल, तर ती अशुद्धतेमुळे असू शकते. अशा परिस्थितीत दररोज तुळशीभोवती स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. तिला आवश्यक तेवढे पाणी घालून निगा राखली पाहिजे.
>>तुळशीच्या आजूबाजूला कचरा, चपला, केरसुणी ठेवू नये. याशिवाय इतर फुलझाडं लावू नयेत. वास्तविक, ज्या कुंडीत तुळशीचे रोप लावले जाते तेथे दुसरे रोप लावणे योग्य मानले जात नाही. तुळशीमध्ये दुधात पाणी मिसळून अर्पण केल्याने तुळशी हिरवी राहते. काही जण हळदीचे पाणी देखील घालतात.
>>अनेकवेळा लोक संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना पाणी अर्पण करतात. मात्र शास्त्रानुसार सायंकाळी झाडांना किंवा कोणत्याही वनस्पतीला पाणी घालू नये कारण ती त्यांच्या झोपेची वेळ असते. याशिवाय तुळशीजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये. तुळशीजवळ फक्त दिवा लावावा आणि एखादी उदबत्ती लावावी. तुळशीला पाणी घालायचे ते सकाळीच!
>>तुळशीला वाहिलेली फुले अर्थात दुसऱ्या दिवशी झालेले निर्माल्य वेळच्या वेळी काढून टाकावे. अन्यथा दुर्गंधी पसरते. तुळशी वृंदावनाचा परिसर स्वच्छ आणि रांगोळीने आकर्षक ठेवावा.
>>अनेक विवाहित महिला तुळशीला पाणी घालताना केस मोकळे सोडतात. तसे करणे योग्य नाही. तुळशीला कृष्ण प्रिया मानले जाते. तिला हळद कुंकू वाहताना सुवासिनींनी प्राथमिक साज शृंगार किंवा सौभाग्य लेणी घातलेली असावीत. केस मोकळे न सोडता केस सावरून मगच तुळशीची पूजा करावी.