राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज पुण्यतिथी; त्यांनी समाजाला घातलेली साद त्यांच्याच शब्दात वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 11:35 AM2021-10-25T11:35:33+5:302021-10-25T11:36:08+5:30
श्रीसंत तुकडोजी महाराज यांचा ग्रामसेवेच्या बाबतीत अधिकार खूपच मोठा होता, हे विश्वश्रुत आहे. आधी केले मग सांगितले, हे त्यांच्याबाबतीत अक्षरश: खरे ठरले.
अरे उठा, उठा, श्रीमंतांनो, अधिकाऱ्यांनो,
पंडितांनो, सुशिक्षितांनो, साधुसंतांनो,
हाक आली क्रांतीची।
गावा गावासि जागवा, भेदभाव हा समूळ मिटवा,
उजळा ग्रामोन्नतीचा दिवा।
या दोन ओव्या वाचल्या तरी संत तुकडोजी महाराजांची ग्राम कल्याणाविषयीची आर्त हाक पूर्णपणे लक्षात येते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. प्रा. सोनोपंत दांडेकर त्यांचेविषयी लिहितात, श्रीसंत तुकडोजी महाराज यांचा ग्रामसेवेच्या बाबतीत अधिकार खूपच मोठा होता, हे विश्वश्रुत आहे. आधी केले मग सांगितले, हे त्यांच्याबाबतीत अक्षरश: खरे ठरले. त्यांच्या खंजीरी भजनाचे आकर्षण एवढे होते, की ते ऐकायला हजारो गावकरी गोळा हो असत. त्यांच्या भजनांची पुस्तके छापून आली आणि पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमात देखील वापरली गेली.
तुकडोजी महाराजांचे मूळ नाव 'माणिक' असे होते. बालपणीच अडकोजी महाराजांचे शिष्यत्व पत्करून त्यांनी परमार्थ मार्गातील साधना करण्यात काही वर्षे घालवली. ही साधना सुरू असताना त्यांनी जगास उपदेश करण्याचे कार्य सुरू केले. आधी फक्त ईश्वरभजनावर त्यांचा भर होता, परंतु महात्माजींच्या युगापासून त्यांनी गावातील सामाजिक सुधारणा, सर्वांगीण सुधारणा याचीही जोड दिली. किंबहुना, भजनाचा उपयोग प्रामुख्याने मानवाच्या सर्वांगीण उद्धारासाठी केला.
तुकडोजी महाराजांनी केवळ गावोगावी फिरून नुसते भजन केल नाही, तर 'श्रीगुरुदेव' यानावाने मासिक काढून कित्येक वर्षे ते चालवले. ग्रामसफाई, सुतकताई, दवाखाने, शाळा, प्रार्थना अनेक गोष्टींद्वारे त्यांनी खेड्यांना शिस्तीचे व समाजसेवेचे वळण लावले.
१९३२ नंतर तुकड्याबोवा 'तुकडोजी' महाराज झाले. त्यांच्या कार्यकत्र्यांचे जाळे सर्वत्र पसरायला लागले. गावोगावी सामुदायिक प्रार्थना होऊ लागल्या. भजन मंडळे स्थापन होऊ लागली. शेकडो सेवक निर्माण होऊ लागले. आधुनिक विज्ञानाचे भांडवल नसतानाही निष्ठा व श्रद्धा या शिदोरीवर समाजाच्या मूलभूत प्रेरणेला जागृत करण्याचे काम होऊ लागले. खेड्यातील अज्ञ जनता शिस्तबद्ध होऊ लागली. खेड्यात खराटे खरखरू लागले, रस्ते, नाले बांधले जाऊ लागले. हे कार्य ज्या शब्दांनी, ज्या भावनांनी, ज्या विचारांनी साधले त्या सगळ्याचा सुव्यवस्थित ग्रंथ म्हणजे ग्रामगीता! या ग्रंथाबाबत तुकडोजी महाराज म्हणत,
ग्रामगीता माझे हृदय, त्यांत बसले सद्गुरुराय,
बोध त्यांचा प्रकाशमय, दिपवोनि सोडील ग्रामासि।
आजच्या अणुबॉम्बच्या हिंस्र युगामध्ये मानवाच्या खऱ्या उत्थानासाठी ज्या मुलभूत प्रेरणांची गरज आहे, ती प्रेरणा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्यातून मिळते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना व त्यांच्या अतुल्य कार्याला त्रिवार वंदन!