आज गुरुप्रतिपदा : त्यानिमित्त जाणून घेऊया श्रीक्षेत्र गाणगापूर व निर्गुण पादुका यांचे महात्म्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 03:30 PM2022-02-17T15:30:47+5:302022-02-17T15:31:18+5:30

दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे.

Today Guru Pratipada: On that occasion, let us know the greatness of Shrikshetra Gangapur and Nirgun Paduka! | आज गुरुप्रतिपदा : त्यानिमित्त जाणून घेऊया श्रीक्षेत्र गाणगापूर व निर्गुण पादुका यांचे महात्म्य!

आज गुरुप्रतिपदा : त्यानिमित्त जाणून घेऊया श्रीक्षेत्र गाणगापूर व निर्गुण पादुका यांचे महात्म्य!

googlenewsNext

आज गुरुवार १७ फेब्रुवारी २०२२, माघ वद्य प्रतिपदा. तिलाच गुरु प्रतिपदा असेही म्हटले जाते. आजच्या तिथीला इस १४५८ साली श्रीगुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले व श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात कर्दळीवनात अवतार गुप्त ठेवला. व ३०० वर्षांनी पौष शुद्ध द्वितीया इस १७५८ मध्ये स्वामी समर्थ अवतार प्रकट केला. त्यानिमित्त जाणून घेऊया श्रीक्षेत्र गाणगापूर व निर्गुण पादुका यांचे महात्म्य! 

दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे. भीमा नदी मधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त जाहल्या नंतर सर्व भक्तांना या पादुका स्थळी "श्री नृसिंहसरस्वती" महाराजांनी दर्शन दिले. 

गाणगापूर तेथील पादुकांना ‘निर्गुण पादुका’ अशी संज्ञा आहे. येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात कुठलाही पाणी स्पर्श नाही. या पादुका चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पंचोपाचारांसाठी ताम्हणांत ‘उदक’ सोडतात.

"प्रसिद्ध आमुचा गुरु जगी । नृसिंह सरस्वती विख्यात ॥
ज्याचे स्थान गाणगापूर । अमरजा संगम भीमातीर ॥"

श्रीक्षेत्र गाणगापुराला ‘दत्तभक्तांचे पंढरपूर’ म्हटले जाते. येथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात. हे स्थान अत्यंत जाज्वल्य आहे. या जागृत स्थानात सर्व तऱ्हेचे पावित्र्य सांभाळावे लागते. भगवान श्रीदत्तात्रेयांचे द्वितीयावतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल तेवीस वर्षे वास्तव्य होते. या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लीला केल्या. ‘निर्गुण पादुका’च्या द्वारा इथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे. आज श्री क्षेत्र गाणगापुरला जेथे निर्गुण मठ आहे त्याच स्थानी श्री नृसिह सरस्वती  निवासास होते. तेथे आज श्रींच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित आहेत त्याच खाली एक तळघर आहे. त्या गुफेत स्वामी महाराज रोज ध्यानासाठी बसत असत. आज ती गुफा बंद केलेली आहे. पण पूर्वीचे पुजारी सांगत की, त्या  ठिकाणी भगवान श्री नृसिंह स्वामी महाराजांनी  स्वहस्ते श्री नृसिंह यंत्राची स्थापना केलेली होती. तसे उल्लेख जुन्या नोंदीत सापडतात. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे शिष्य सिद्ध सरस्वती व भास्कर विप्र, स्वामींनी श्रीशैल्य गमन केल्यानंतर बराच काळ त्या जागी जाऊन पूजाही करीत असत. पुढे महाराजांच्याच आज्ञेने ती गुफा चिणून बंद करण्यात आली.

श्रीनृसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्तभक्तांच्या वास्तव्याने ही पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली आहे. इथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. पिशाच्च विमोचनाचे तर हे महातीर्थच आहे. श्रद्धाळू भाविकाला आजही इथे साक्षात दत्तदर्शन घडते. तसे दर्शन झालेले सत्पुरुष विद्यमान काळीही वास्तव्य करुन श्रीदत्तप्रभूंच्या कृपेने जगाला सन्मार्ग दाखवीत आहेत.

श्रीनिर्गुण पादुका मंदिर (अथवा श्रीगुरूंचा मठ) हे गाणगापूर गावाच्या मध्यभागी आहे. या मंदिराची बांधणी नेहमीच्या मंदिराप्रमाणे नसून ती एखाद्या धाब्याच्या मोठ्या वाड्यासारखी आहे. मंदिराच्या पूर्वेस व पश्र्चिमेस दोन महाद्वारे आहेत. पश्र्चिम महाद्वारावर नगारखाना असून तो त्रिकाल पूजेच्या वेळी वाजविला जातो. नव्यानेच बांधण्यात आल्याने अतिभव्य महाद्वाराने पादुका मंदिराची शोभा अधिकच वाढली आहे.

श्रीनिर्गुण पादुका मंदिराच्या पूर्वेस महादेव, दक्षिणेस औदुंबर व त्या खाली गणपती, महादेव व पार्वती यांच्या मूर्ती आहेत. पश्र्चिमेस अश्र्वत्थ वृक्ष आहे. वृक्षाभोवताली नागनाथ, मारुती व तुलशीवृंदावन आहे. मठात मंदिर सेवेकऱ्यांच्या अनुष्ठानासाठी एकूण तेरा ओवऱ्या आहेत. त्यांपैकी पाच पूर्वेस, सात उत्तरेस व एक पश्र्चिमेस आहे. मठाच्या दक्षिणभागी श्रीगुरुपादुकांचा गाभारा असून तो उत्तराभिमुख आहे. त्यासमोर प्रशस्त सभामंडप आहे. गाभाऱ्याला फक्त उजव्या हातालाच एक दरवाजा आहे. आत पश्र्चिमेकडील कोनाड्यात विघ्नहर चिंतामणीची मूर्ती आहे. ही गणपतीची मूर्ती वालुकामय असून ती स्वत: श्रीनृसिंह सरस्वतींनी स्थापन केलेली आहे. या गणेशासमोर दक्षिण बाजूस एक लहान दरवाजा असून तो पश्र्चिमाभिमुख आहे. या दरवाज्यातून ओणव्याने आत प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीला असलेला एक लहानसा झरोका दृष्टीस पडतो. या झरोक्यातून आत डोकावले म्हणजे समोर त्रैमूर्तींचे दर्शन घडते. ही मूर्ती आसनस्थ असून पश्र्चिमाभिमुख आहे. या त्रिमूर्तीच्या आसनावरच श्रीगुरुंच्या ‘निर्गुण पादुका’ ठेवलेल्या आहेत. या पादुका सुट्या व चल असून खास वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. त्या अन्यत्र आढळणाऱ्या पादुकांप्रमाणे पावलांच्या आकाराच्या नसून तांबूस, काळसर रंगाच्या गोलाकार अशा आहेत. त्या दिव्य शक्तीने भारलेल्या आहेत.

श्रीगुरुचरित्रात श्रीगुरू आपल्या निर्गुण पादुकांची व गाणगापूर माहात्म्याची ग्वाही देताना म्हणतात,

“मठी आमुच्या ठेविती पादुका । पुरवितील कामना ऐका । अश्र्वत्थ वृक्ष आहे निका । तो सकळिकांचा कल्पतरू ॥
कामना पुरविल समस्त । संदेह न धरावा मनात ॥ मनोरथ प्राप्त होतील त्वरित । ही मात आमुची सत्य जाणा ॥
संगमी करूनिया स्नान । पूजोनी अश्र्वत्थ नारायण । मग करावे पादुकांचे अर्चन । मनकामना पूर्ण होतील ॥
विघ्नहर्ता विनायक । आहे तेथे वरदायक ॥ तीर्थे असती अनेक । पावाल तुम्ही सुख अपार ।।

श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे ज्या वेळेस श्रीशैल यात्रेस निघाले त्या वेळी सर्व भक्तांच्या, शिष्यांच्या आग्रहावरून, हार्दिक प्रार्थनेवरून त्यांनी आपल्या ‘निर्गुण पादुका’ इथे ठेवल्या. या पादुकांना सगुण आकार असूनही त्यांना निर्गुण पादुका म्हणतात. त्याचे कारण असे की आपण आपल्या मनातील संकल्प ज्या वेळेस या ठिकाणी सांगतो त्या वेळेस श्रीदत्तप्रभू आपले काम अप्रत्यक्षरीत्या या पादुकांद्वारा करतात. दर्शन सगुण असले तरी कार्य करणारी परमेश्वरी शक्ती ही निर्गुण, निराकार असते. म्हणून या पादुकांना ‘निर्गुण पादुका’ म्हणतात. भक्तकल्याणार्थ ठेवलेल्या या निर्गुण पादुकांच्या सामर्थ्याने आजपर्यंत लाखो भक्तांची दैन्य-दु:खे व अटळ संकटे निवारण झालेली आहेत.

श्रीनृसिंह सरस्वतींची अनुष्ठान भूमी भीमा-अमरजा संगमावर असून हे स्थान गाणगापूरच्या नैऋत्येस साधारणत: ३ कि.मी.वर आहे. श्रीगुरू ज्या अश्र्वत्थ वृक्षाखाली अनुष्ठान करीत तो पडून गेल्यावर त्याच स्थळी हल्लीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. याच मंदिरात अश्र्वत्थवृक्षाखाली पादुका व लिंग यांची स्थापना केलेली आहे.

श्रीगाणगापूर क्षेत्राच्या पूर्वभागात श्रीकल्लेश्र्वर मंदिर आहे. हे जागृत शिवालय म्हणून प्रसिद्ध आहे. इथला पुजारी नरकेसरी कल्लेश्र्वराशिवाय अन्य कुणाला मानत नसे. श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याला इथे अद्वैताचा साक्षात्कार घडविला.

श्री क्षेत्र गाणगापूरच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाने ऐहिक दारिद्र्य क्षणात नष्ट होते, पारलौकिक कल्याण होते व सर्व तऱ्हेच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून इथे लाखो दत्तभक्तांची नेहमीच गर्दी असते.

इथल्या देवस्थानचे पुजारी सत्त्वगुणी आहेत. ते यात्रेकरूंची धार्मिक कृत्ये, अभिषेक, पूजा, माधुकरी, नैवेद्य, ब्राह्मणभोजन वगैरे व्यवस्था चांगल्याप्रकारे करतात.

श्रीक्षेत्र गाणागापुराला आलेले सर्व भक्त माधुकरी मागतात तसेच ते इतरांना माधुकरी वाढतात. स्वत: श्रीनृसिंह सरस्वती भिक्षा मागत असत.

‘वसती रानी संगमासी । जाती नित्य भिक्षेसी ॥ तया गाणगापुरासी । माध्यान्हकाळी परियेसा ॥’

असा श्रीगुरुचरित्रात उल्लेख आहे. दररोज बारा ते साडेबाराच्या सुमारास श्रीमहाराज भिक्षा मागण्यासाठी गावात येतात. परंतु साक्षात परमेश्र्वराचाच अवतार असल्यामुळे ते कोणाच्या रूपाने येऊन भक्तांची परीक्षा पाहतील हे आपण आपल्या मानवी अपूर्णत्वाने ओळखू शकत नाही. म्हणूनच या ठिकाणी येणारे दत्तभक्त यशाशक्ती अन्नदानाचा कार्यक्रम करतात. श्रीदत्तमहाराजांच्या दरबारात पाच घरची भिक्षा मागून प्रसाद ग्रहण केल्यास मन प्रसन्न होते. श्रीक्षेत्र गाणागापूर म्हणजे श्रीनृसिंह सरस्वतींची लीलाभूमी. अनेक भक्तांची दु:खे, संकटे नाहीसे करण्याचे कार्य त्यांनी इथे केले. त्यामुळेच या क्षेत्राला एक आगळे महत्त्व आलेले आहे. भीमा-अमरजा संगमामुळे या स्थानाला कमालीचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. गाणगापूरचा परिसरही श्रीक्षेत्र नरसोबावाडीप्रमाणे नितांत रमणीय आहे.

(सदर संकलित माहिती श्रीगुरु चरित्र तसेच समाज माध्यमांवरून साभार)

Web Title: Today Guru Pratipada: On that occasion, let us know the greatness of Shrikshetra Gangapur and Nirgun Paduka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.