आज रामकृष्ण मिशनचा 'कल्पतरू' अर्थात 'ज्याला जे हवे ते मिळवून देणारा दिवस'; सविस्तर वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 03:46 PM2024-01-01T15:46:07+5:302024-01-01T15:46:33+5:30
जगभरातील रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनच्या केंद्रात साजरा केला जाणारा कल्पतरू दिवस नक्की आहे तरी काय ते जाणून घ्या!
१ जानेवारी हा दिवस जगभरातील रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनच्या तसेच वेदांत सोसायटीच्या केंद्रांतून 'कल्पतरू दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवसाबद्दल जनसामान्यांना फारशी माहिती नाही. सदर लेखाच्या माध्यमातून या दिवसाचे महत्त्व, त्यामागील कथा आणि सद्यस्थितीशी याचा संबंध जाणून घेऊया.
कल्पतरू दिवसाबद्दल :
लेखिका मीनल सबनीस माहिती देतात, १ जानेवारी हा दिवस विवेकानंद केंद्र, श्रीरामकृष्ण संघात " कल्पतरू दिन " म्हणून साजरा केला जातो. श्रीरामकृष्ण परमहंस हे एक कल्पतरूच होते. श्रीरामकृष्णांना घशाचा कर्करोग झाला होता. हवापालटासाठी ते काशीपूर उद्यानगृहात येऊन राहिले होते. १ जानेवारी १८८६ दुपारी ३-३.३० च्या सुमारास ते सहज फिरायला म्हणून उद्यानात आले. तिथे काही भक्त भेटायला आले होते. तेव्हा गिरीशबाबू तिथे आले. ठाकूर गिरीशबाबूंना म्हणाले की, " का रे, तू सगळ्यांना सांगतोस की मी अवतार आहे. तू माझ्यात काय पाहिलंस सांग बरं?" तेव्हा गिरीशबाबूंनी ठाकूरांचे पाय धरले व ते म्हणाले, "ठाकूर, ऋषिमुनींना ज्या तुम्हा परब्रह्म स्वरूपाचे वर्णन करता आले नाही, ते वर्णन मी काय करणार?" हे ऐकताच ठाकूर भावावेशात गेले व त्यावेळी तिथे जे जे कोणी होते त्यांना पारमार्थिक आनंदाचा ठेवा बहाल केला. 'वर्षत सकळ मंगळी' असे माऊलींनी म्हटल्याप्रमाणे रामकृष्णांनी सर्व भक्तांवर मांगल्याचा वर्षाव केला. त्यामुळे सगळ्यांचे जीवन पूर्णतः बदलून गेले.
आपल्या स्पर्शाने व कृपेने कित्येकांची अंतर्शक्ती जागृत केली.कोणाला चैतन्याचा आशीर्वाद दिला, कोणाला प्रकाशाचा. त्यांच्या स्पर्शासरशी प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव आला. कोणाच्या ह्रदयात दिव्य शक्तीचा संचार झाला, कोणाला अपार शांतीचा अनुभव आला. कोणाचे मन एकाग्र झाले, कोणी भावविभोर झाले. कोणाला ज्योतीचे दर्शन झाले तर कोणाला इष्टदेवतेचे दर्शन झाले. या दिवशी रामकृष्ण आपल्या शिष्यांसाठी कल्पवृक्षच झाले होते. पुराणातील कल्पतरू फक्त भौतिक सुखाच्याच गोष्टी देतो. परंतु श्रीरामकृष्णांनी मात्र पारलौकिक, आध्यात्मिक गोष्टी शिष्यांना दिल्या, ज्या श्रेयस्कर होत्या, शाश्वत होत्या. ' सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्त व्हा.' असाच संदेश या आत्मसाक्षात्कारातून मिळाला. त्यावेळेस रामकृष्णांचा पट्टशिष्य नरेंद्र अर्थात स्वामी विवेकानंद तिथे उपस्थित नव्हते. परंतु इतर शिष्यांना त्या दिवशी आलेली अनुभूती स्वामी विवेकानंद यांनी अनेकदा अनुभवली होती.
यावरून लक्षात येते, की गुरुना कल्पतरुची उपमा का दिली जाते, कारण त्यांची कृपादृष्टी होण्यासाठी स्थळ, काळ, वेळ, वय असे कसलेच बंधन त्यांच्यावर नसते. शिष्य त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा अवकाश, तो गुरुकृपेस पात्र होतो. म्हणूनच की काय, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सद्गुरुंवर लिहिलेल्या एका अभंगात वर्णन करतात,
आपणासारिखे करिती तात्काळ,
नाही काळ वेळ तयालागी!
गुरूंना कल्पतरू म्हटले जाते कारण ते आपल्यासारखं आपल्या शिष्याला करतात, नव्हे तर आपल्यापेक्षाही वरचढ बनवतात. त्यासाठी त्यांना काळ वेळ पहावा लागत नाही. याचीच अनुभूती रामकृष्ण परमहंस यांच्या शिष्यांनी तसेच स्वामी विवेकानंद यांनी घेतली, म्हणून आजचा दिवस कल्पतरू दिवस म्हणून साजरा केला जातो. आजही गुरुदेव रामकृष्ण सर्वांच्या इच्छा पूर्ती करतात असा भाविकांचा अनुभव आहे..!
तुमच्या आयुष्यात जर गुरु असतील तर त्यांच्यावर अढळ विश्वास ठेवून आणि नसतील तर गुरुदेव रामकृष्ण यांना गुरुस्थानी मानून आजचा दिवस आपल्यालाही साजरा करता येईल. आता साजरा करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर गुरुकृपा आपल्या पाठीशी आहे असे समजून आपल्या इच्छा, आकांक्षा, ध्येय पूर्तीसाठी प्रयत्न करायचे आणि आपल्या मदतीने इतरांना त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी हातभार लावावा. या प्रामाणिक प्रयत्नांना गुरूंचे आशीर्वाद नक्कीच मिळतील आणि तो कल्पतरू आपल्याला कायम छत्रछायेत घेईल हे नक्की!