महर्षी नारदांचे सहगायक असणारे गंधर्वराज तुंबरु यांची आज जयंती; रामायणातही होता त्यांचा सहभाग!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 11:19 AM2023-05-12T11:19:32+5:302023-05-12T11:21:05+5:30

'गणराज रंगी नाचतो' या गाण्यात नारदांपाठोपाठ ज्या तुंबरू नावाच्या गंधर्वाचा उल्लेख आहे त्यांची आज जयंती, त्यांचा परिचय करून घेऊ. 

Today is the birth anniversary of Gandharvaraja Tumburu who was the co singer of Maharishi Narada; He was also involved in Ramayana! | महर्षी नारदांचे सहगायक असणारे गंधर्वराज तुंबरु यांची आज जयंती; रामायणातही होता त्यांचा सहभाग!

महर्षी नारदांचे सहगायक असणारे गंधर्वराज तुंबरु यांची आज जयंती; रामायणातही होता त्यांचा सहभाग!

googlenewsNext

>> रोहन विजय उपळेकर

आज वैशाख कृष्ण अष्टमी. ही तिथी गंधर्वांतील सर्वश्रेष्ठ गायक आणि भगवद्भक्त श्री तुंबरु यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

आपण विविध अभंगांमधून, स्तोत्रांमधून वाचतो की, श्रीभगवंतांपुढे नारद आणि तुंबरु यांनी सामगायनाची सेवा केली. देवर्षी श्री नारदांचे चरित्र त्यामानाने प्रसिद्ध आहे, पण या जोडीतील श्री तुंबरु याच्या बद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. आज त्यांच्या जयंतीदिनी आपण श्री तुंबरु यांच्याबद्दल जाणून घेऊ या.

महर्षी कश्यप आणि त्यांची पत्नी प्रधा यांच्या चार गंधर्व-पुत्रांपैकी तुंबरु हे एक होत. हे गंधर्वांचे राजे मानले जातात. अत्यंत मधुर गळा व गानकलेतील अद्वितीय अधिकार ही श्री तुंबरु यांची वैशिष्ट्ये होत. म्हणूनच स्वर्गातील तसेच धनाधिपती कुबेराच्या दरबारातील सर्वश्रेष्ठ गायक म्हणून श्री तुंबरूंचा प्राचीन ग्रंथांमधून उल्लेख येतो.

भगवान श्रीशिवशंकरांची उपासना करून तुंबरु यांनी घोड्याचे मुख, त्रिखंडात मुक्त संचाराचा अधिकार, गायनकलेतील सर्वश्रेष्ठत्व आणि अमरत्व(दीर्घजीवित्व) असे वर प्राप्त करून घेतले होते. आपल्या गायनाला साथ करण्यासाठी तुंबरु एका हातात वीणा व दुसऱ्या हातात चिपळ्या धारण करतात. यांचे भक्तिरसपूर्ण गायन भगवान श्रीविष्णू, भगवान श्रीशंकर व इंद्रादी देवतांना अतिशय आवडते. त्यामुळेच महान स्वर्गीय गायक म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत.

रंभा या अप्सरेचे तुंबरु हे गायनगुरु मानले जातात. तसेच काही ठिकाणी त्यांना तिचे पती देखील म्हटलेले आहे. श्रीमद्वाल्मीकि रामायणातील अरण्यकांडात सुरुवातीलाच श्री तुंबरूंची एक कथा येते. एकदा रंभेमध्ये आसक्त झाल्याने तुंबरु कुबेराच्या दरबारात वेळेवर पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे रागावलेल्या कुबेराने त्यांना राक्षस होण्याचा शाप दिला. त्यांनी प्रार्थना केल्यावर, "भगवान श्रीरामांच्या हातून मृत्यू येऊन तुझी राक्षसजन्मातून सुटका होईल", असा कुबेराने उश्शाप दिला. त्या शापानुसार तुंबरु दंडकारण्यातील 'जव' नावाच्या राक्षसाच्या 'शतह्रदा' नावाच्या पत्नीच्या पोटी 'विराध' नावाने जन्माला आले. तपश्चर्या करून त्यांनी भगवान ब्रह्मदेवांकडून 'कोणत्याही शस्त्राने मृत्यू येऊ नये' असा वर मिळवला. विराध अत्यंत गलिच्छ दिसणारा, प्रचंड ताकदवान व दंडकारण्यातील ऋषिमुनींचे मांस भक्षण करणारा भयानक राक्षस बनला होता.

भगवान श्रीराम, श्री लक्ष्मण व सीतामाता दंडकारण्यात प्रवेशल्यानंतर लगेचच त्यांचा विराधाशी सामना झाला. विराधाने सीतामातेला पकडले व तो श्री रामरायांना म्हणाला, "तुम्ही वेषावरून तापसी दिसता आणि तरुण स्त्री व धनुष्यबाण घेऊन फिरता ? हा खोटेपणा झाला तुमचा. आता या तरुण स्त्रीला मी माझी पत्नी बनवणार आहे, तुम्ही जीवाचे भय असेल तर इथून निघून जा, नाहीतर मरायला तयार व्हा !"

विराधाने सीतामातेला पकडल्याचे पाहून भगवान श्रीरामरायांना अनावर क्रोध आला. त्यांनी व लक्ष्मणाने विराधाबरोबर युद्ध केले. भगवान श्रीरामरायांनी अत्यंत तीक्ष्ण असे सात बाण सोडले, त्या बाणांनी विराध जखमी झाला पण मेला नाही. कारण तसा त्याला वर होता. तोही चिडून आपले त्रिशूल घेऊन धावून आला. त्याचा शूल श्रीरामरायांनी बाणांनी मोडून टाकला. मग श्रीराम-लक्ष्मणांनी दोन धारदार तलवारी घेऊन विराधावर चढाई केली. विराधाने आपल्या लांब हातांनी दोघांना पकडले, श्रीरामराय व लक्ष्मणांना त्याने आपल्या खांद्यावर बसवले तो दुसऱ्या वनात जाऊ लागला. हे पाहून सीतामाता विलाप करू लागल्या. त्यांच्या रडण्याने क्रुद्ध झालेल्या या दोघांनी विराधाचे दोन्ही हात छाटून टाकले. त्यासरशी तो विराध मूर्च्छित होऊन कोसळला. त्याला रामरायांनी भरपूर बडवले, आपटले, पण तरीही तो मेला नाही. मग त्याच्या गळ्यावर पाय देऊन श्रीरामराय लक्ष्मणांना म्हणाले की, "याच्यासाठी मोठा खड्डा खोद. हा शस्त्राने मरणार नाही, याला असेच पुरून टाकले पाहिजे." 

श्रीरामरायांचे हे वाक्य ऐकून विराध विनम्रपणे त्यांना म्हणाला, "देवा, आपण इंद्रासमान पराक्रमी आहात. मी आपल्या हातून मृत्यू आल्याने या योनीतून सुटेन. मला तसाच उश्शाप मिळालेला आहे. मी आपल्याला आधी ओळखले नाही, त्याबद्दल क्षमा करा !" असे बोलून त्याने आपली सर्व कथा सांगितली. भगवान श्रीरामरायांच्या हातून मृत्यू आल्याने विराधाच्या जन्माला गेलेले तुंबरु पुन्हा आपल्या मूळ रूपात स्वर्गात निघून गेले.

भगवान श्रीविष्णूंचे परमभक्त असलेले श्री तुंबरु हे त्यांचे नित्यपार्षदच आहेत. ते सदैव श्रीभगवंतांची स्तुती गात सेवा करीत असतात. श्रीभगवंतांच्या सर्व अवतारांमध्ये श्री तुंबरूंनी सेवा केलेली आहे. महाभारत युद्धाचे ते प्रत्यक्षदर्शी मानले जातात. त्यांनी अर्जुनाला गंधर्वांचे शस्त्र आणि शिखंडीला रथाचे घोडे दिल्याचा संदर्भ आहे. धर्मराज युधिष्ठिरांच्या अश्वमेध यज्ञातही त्यांनी शंभर घोडे दिल्याचा महाभारतात उल्लेख आहे.स्वर्गीय श्रेष्ठ गायक व थोर भगवद्भक्त अशा श्री तुंबरूंना जयंती निमित्त सादर साष्टांग दंडवत !

Web Title: Today is the birth anniversary of Gandharvaraja Tumburu who was the co singer of Maharishi Narada; He was also involved in Ramayana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.