आज रामकृष्ण परमहंस यांची जयंती, त्यांनी स्वामी विवेकानंद यांना देवदर्शन कसे घडवले बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 07:00 AM2023-02-21T07:00:00+5:302023-02-21T07:00:02+5:30

गुरु शिष्याला आपल्यासारखे नव्हे तर आपल्यापेक्षा वरचढ कसे बनवतात, हे सांगणारा प्रसंग वाचा. 

Today is the birth anniversary of Ramakrishna Paramahansa, see how he met Swami Vivekananda to god! | आज रामकृष्ण परमहंस यांची जयंती, त्यांनी स्वामी विवेकानंद यांना देवदर्शन कसे घडवले बघा!

आज रामकृष्ण परमहंस यांची जयंती, त्यांनी स्वामी विवेकानंद यांना देवदर्शन कसे घडवले बघा!

googlenewsNext

आज रामकृष्ण परमहंस यांची जयंती. ते स्वामी विवेकानंद यांचे गुरु. त्यांचे मूळ नाव गदाधर चट्टोपाध्याय. ते एकेश्वर वादाचे पुरस्कर्ते होते. अर्थात धर्म वेगवेगळे असले तरी ईश्वर एकच यावर त्यांची ठाम निष्ठा होती. ते ग्रामीण बंगालमधील एका गरीब वैष्णव ब्राह्मण परिवारात जन्मले. कोलकात्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिरात त्यांनी काही काळ पौरोहित्य केले, त्यानंतर शाक्तपंथीयांच्या प्रभावाने काली मातेची आराधना सुरू केली. चिंतनातून त्यांना ईश्वर तत्त्व एकच असल्याची अनुभूती मिळाली. त्यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे-

''माझा धर्म बरोबर, दुसऱ्यांचा धर्म चूक – हे मत योग्य नाही. ईश्वर एकच आहे, त्याला वेगवेगळे लोक भिन्न भिन्न नावाने पुकारतात. कोणी म्हणते गॉड, कोणी अल्ला, कोणी म्हणते कृष्ण, कोणी म्हणते शिव, कोणी म्हणते ब्रह्म. तळ्यात पाणी असते पण कोणी त्याला पाणी म्हणते, कोणी वॉटर तर कोणी जल. हिंदू त्याला जल म्हणतात, ख्रिश्चन वॉटर, मुसलमान म्हणतात पाणी, - पण वस्तू एकच असते. एक-एका धर्माचे एक-एक मत असते, एक-एक पथ असतो - परमेश्वराकडे घेऊन जाण्यासाठी; जशी नदी नाना दिशांहून येऊन एकाच सागरात विलीन होते!''

असे हे रामकृष्ण परमहंस यांचा सर्वात लाडका विद्यार्थी म्हणजे स्वामी विवेकानंद अर्थात बालपणीचा नरेंद्र! नरेंद्रवर त्यांचा अपार जीव होता. परंतु नरेंद्र हा विज्ञाननिष्ठ, तर्कनिष्ठ बुद्धिमत्तेचा असल्यामुळे चमत्कारांवर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. त्याने गुरुदेवांना सांगितले, 'मला देव पहायचा आहे!' रामकृष्ण फक्त हसून विषय टाळत असत. 

एकदा नरेंद्र त्यांच्या पायाशी लोळण घेत म्हणाला, 'गुरुदेव आज मला तुम्ही देव दाखवा नाहीतर मी तुमचे पाय सोडणारच नाही!' त्याचा हट्ट पाहून, रडणे पाहून, आरडाओरड पाहून रामकृष्णांनी त्याच्या छातीवर आपल्या उजव्या पायाचा अंगठा टेकवला. आक्रस्ताळेपणा करणारा नरेंद्र शांत झाला. क्षणात त्याची समाधी लागली. डोक्यात लख्ख प्रकाश पडला. कितीतरी वेळ तो समाधी अवस्थेत होता. त्याला विश्वशक्तीची प्रतीची आल्यावर रामकृष्णांनी पाय बाजूला केला आणि नरेंद्र समाधीतून बाहेर आला. 

त्याक्षणी नरेंद्रने जे अनुभवलं, ते शब्दातीत होतं. त्यानंतर अनेकदा नरेंद्रने तशी समाधी लागावी म्हणून गुरूंना प्रार्थना केली. त्यावर रामकृष्ण म्हणाले, 'ज्या देवत्त्वाची प्रचिती घेत तू आत्मानंद अनुभवलास, त्यात रमून राहू नकोस. विश्वाला त्या आनंदाची प्रचिती यावी म्हणून प्रचार, प्रसार कर. लोकांची दिशाभूल होत आहे, त्यांना सन्मार्गाला लाव. ईश्वर ही असीम शक्ती आहे. तिचे दर्शन समाजात घे आणि समाजाला दर्शन घडव. 

रामकृष्णांनी नरेंद्रचा हट्ट पूर्ण केला. त्याला ईश्वर तत्त्वाची प्रचिती दिली. स्वामी विवेकानंद होऊन जगाला ज्ञानाची दीक्षा देण्यास पात्र बनवले आणि स्वामी विवेकानंद यांनीदेखील हिंदू संस्कृतीचा डंका परदेशात वाजवला आणि जगभर रामकृष्ण मिशनची स्थापना करून देवाची आणि देवत्त्वाची लोकांना प्रचिती दिली. 

Web Title: Today is the birth anniversary of Ramakrishna Paramahansa, see how he met Swami Vivekananda to god!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.