दत्तगुरुंच्या आशीर्वादाने अवतीर्ण झालेले 'श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू' यांची आज जयंती!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 01:44 PM2023-09-19T13:44:41+5:302023-09-19T13:45:45+5:30
अवधूतरुपी राहिलेले आणि दत्त नामाचा प्रसार करून 'दिगंबर' हा महामंत्र देणारे दत्तगुरूंचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याबद्दल जाणून घेऊ.
>> रोहन विजय उपळेकर
आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, श्रीगणेश चतुर्थी. कलियुगातील प्रथम श्रीदत्तावतार, सद्गुरु भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची जयंती!
भगवान श्रीदत्तप्रभू अपळराजांच्या घरी दर्शश्राद्धाच्या दिवशी, क्षण दिलेले ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा मागायला आले व अखंडसौभाग्यवती सुमतीमातेकडून भिक्षा घेऊन संतुष्ट झाले. तिचा हात प्रेमभराने आपल्या हाती घेऊन, "जननी, काय हवे ते माग !" असे प्रसन्नतापूर्वक म्हणाले. सुमतीमातेचे पुण्य फळाला आलेले असल्याने तिने, "स्वामी, हेच बोल सत्य करा !" असेच मागितले. भगवान श्रीदत्तप्रभूंनी तिला जननी म्हटल्यामुळे तेच आजच्या पावनदिनी, सूर्योदय समयी पीठापूरमध्ये, श्री.अपळराज व सौ.सुमतीमातेच्या पोटी अवतरित झाले. भविष्यपुराणात, "कलियुगात अवधूत होतील", असा जो उल्लेख येतो तो भगवान श्री श्रीपादांचाच आहे. म्हणूनच श्रीदत्त संप्रदायातील नमनात "कलौ श्रीपादवल्लभ: ।" असे मोठ्या प्रेमाने म्हटले जाते.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी हे परिपूर्ण परब्रह्मस्वरूप असे नित्य अवतार असून त्यांचे वय कायमच सोळा वर्षांच्या किशोराएवढे असते. भगवान श्रीदत्तात्रेयांची कलियुगातील श्रीगुरुपरंपरा भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांपासूनच सुरू होते. भगवान श्री श्रीपादांचे सारे चरित्र अत्यंत अलौकिक असून आजही भक्तांना त्यांची प्रचिती अखंड येत असते.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज ब्रह्मचारी होते, त्यांनी संन्यास घेतलेला नव्हता. अनेक भाग्यवान भक्तांना त्यांचे एकमुखी षड्भुज अशा मूळरूपात दर्शन झालेले आहे. आपल्या श्रीगुरूंच्या, प.प.श्री.थोरल्या महाराजांच्या हृदयात झालेल्या त्याच दर्शनानुसार योगिराज श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांनी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे सुंदर चित्र काढलेले आहे. तसेच एक भव्य तैलचित्र प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या पुण्यातील 'माउली' आश्रमात आहे. त्याचाच फोटो या लेखासोबत शेयर केलेला आहे.
त्यांनी सोळाव्या वर्षी पीठापूरहून प्रयाण करून बदरिकाश्रमातील साधूंना मार्गदर्शन केले. तिथून भ्रमण करीत ते श्रीनृसिंहवाडी, गोकर्ण महाबळेश्वर, तिरुपती करून कृष्णा काठावरील कुरवपूर या तीर्थक्षेत्री आले. तेथे त्यांनी चौदा वर्षे राहून अनेक दिव्य लीला केल्या.
भगवान श्री श्रीपाद स्वामी महाराजांनीच कुरवपूर परिसरातील पंचदेव पहाडी येथील आपल्या दरबारात एके दिवशी, भक्तांवर परमकृपा करण्याच्या उद्देशाने सर्वप्रथम *"दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ।"* हा श्रीदत्त संप्रदायाचा महामंत्र स्वमुखाने उपदेशिला. हा संप्रदायाचा उघडा महामंत्र असून अत्यंत प्रभावी आहे. पुढे प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी ब्रह्मावर्तच्या चातुर्मास्यात, प्लेगपासून संरक्षण व्हावे म्हणून सात नाम सप्ताह करवून घेतले होते. त्यांपैकी एका सप्ताहात पुन्हा याच महामंत्राचा सर्वांना उपदेश करून " दिगंबरा..." महामंत्र सर्वत्र प्रचलित केला.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी श्रीगुरुद्वादशी तिथीला आपला देह कुरवपूर येथे कृष्णामाईत अदृश्य केला, पण त्यांनी देहत्याग केलेला नाही, हे लक्षात घ्यावे. कारण हा श्रीदत्तप्रभूंचा "नित्य अवतार" आहे. अजूनही त्यांचे भक्तोद्धाराचे कार्य त्याच रूपातून चालू असून अनंत कालपर्यंत चालूच राहणार आहे.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या काही लीला श्रीगुरुचरित्रात वर्णिलेल्या असून "श्रीपादचरित्रामृतम्" ग्रंथात त्यांचे सविस्तर चरित्र वर्णन केलेले आहे. श्रीनृसिंहवाडी स्थानावर त्यांचेही वास्तव्य झालेले आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव(जामोद) येथेही त्यांचे काही काळ वास्तव्य झाले होते. आज त्याजागी श्रीपाद सेवा मंडळाने त्यांचे भव्य मंदिर उभारलेले आहे. त्या जागृत स्थानी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची बालरूपातील श्रीमूर्ती असून, तेथूनही त्यांच्या अद्भुत लीला आजही सतत चालू असतात.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना कुरवपूर क्षेत्री, १९५४ सालच्या श्रीगुरुद्वादशीच्या पावन दिनी स्वत: भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी बिल्वदलासह दिव्य पादुका प्रसाद म्हणून दिल्या होत्या. त्या सोन्यासारख्या दिसत असत, पण प्रत्यक्षात कशापासून बनलेल्या होत्या हे ज्ञात नाही. कारण ते श्रीभगवंतांच्या संकल्पानेच निर्माण झालेले साक्षात् आत्मलिंगच होते. त्या पादुका सदैव पू.मामांच्या सोबत असत. पू.मामांच्या देहत्यागानंतर त्या पादुका त्यांच्या मुखात ठेवल्या गेल्या. त्याबरोबर त्या जशा प्रकटल्या होत्या तशाच पुन्हा अदृश्य झाल्या. त्या दिव्य पादुकांच्या तीर्थाला अद्भुत सुगंध येत असे आणि त्या तीर्थाने असंख्य भक्तांचे रोग, पिशाचबाधा व अडचणी दूर होत असत.
साजुक तुपातला शिरा, माठाची/राजगि-याची पालेभाजी व वांग्याची भाजी या भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या काही आवडत्या गोष्टी आहेत. मनापासून आणि विशुद्ध प्रेमभावाने अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट त्यांना आवडते. वस्तुत: आवड - नावड यांचा या श्रीपादरूप परमशुद्ध ब्रह्मचैतन्याशी काहीही संबंधच नसतो. भक्ताचा निर्मळ प्रेमभाव हीच त्यांची आवड व तेच त्यांच्या प्राप्तीचे एकमात्र साधन आहे ! आजच्या परम पावन दिनी, भगवान भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या श्रीचरणी सादर साष्टांग दंडवत प्रणाम !
विमला: कीर्तयो यस्य श्रीदत्तात्रेय एव स: ।
कलौ श्रीपादरूपेण जयति स्वेष्टकामधुक् ॥
"ज्यांची यश-कीर्ती अत्यंत उज्ज्वल आहे असे साक्षात् श्रीदत्तप्रभूच कलियुगामध्ये भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे अद्भुत असे श्रीपादरूप धारण करून निरंतर कार्य करीत आहेत !"
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ।
संपर्क - 8888904481