आज माँसाहेब जिजाऊ यांची पुण्यतिथी; त्यांच्या अखेरच्या क्षणी कसे सावरले असेल शिवबांनी स्वतःला? वाचा तो क्षण!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 12:05 PM2022-06-17T12:05:43+5:302022-06-17T12:06:56+5:30

शिवरायांच्या जीवनात सर्वार्थाने आनंदाचे निधान व चैतन्याचे तुफान निर्माण करणारा हा स्वराज्य नंदादीप आजच्याच दिवशी मालवला.

Today is the death anniversary of Mansaheb Jijau; How could Shiva have saved himself in her last moments? Read that moment! | आज माँसाहेब जिजाऊ यांची पुण्यतिथी; त्यांच्या अखेरच्या क्षणी कसे सावरले असेल शिवबांनी स्वतःला? वाचा तो क्षण!

आज माँसाहेब जिजाऊ यांची पुण्यतिथी; त्यांच्या अखेरच्या क्षणी कसे सावरले असेल शिवबांनी स्वतःला? वाचा तो क्षण!

googlenewsNext

>> ह. भ. प. योगेश्वर महाराज उपासनी 

आज दिनांक १७ जून, पुण्यश्लोक मातोश्री जिजाई साहेब यांची पुण्यतिथी. आजच्याच दिवशी अखंड लक्ष्मी अलंकृत, स्वराज्य निर्माते, छत्रपती श्री शिवराय सर्व प्रकारचे पृथ्वी मोलाचे वैभव असूनही एका अर्थाने पोरके झाले. महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक व सामाजिक इतिहासातील एक न विसरता येणारा "सल" आजचा दिवस आपणास देऊन गेला. आजच्याच दिवशी "अखंड वज्र चुडे मंडित" " सकल सौभाग्य संपन्न " " राजकारण धुरंधर" " सकल संस्कार संपन्न" मातोश्री जिजाबाई साहेब स्वर्ग सोपनाच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.अवघा महाराष्ट्र पोरका करून.....

श्री शिवप्रभूंच्या जीवनात मातोश्री जिजाईं चे स्थान हे केवळ शब्दातीत, अनुपमेय व वर्णनातीत आहे. रामायणात "हनुमंताचे" स्थान, महाभारतात भगवान श्रीकृष्णांचे स्थान जेवढे अखंड, एकसंध, अभेद्य व अनिवार्य तेवढेच मातोश्री जिजाऊंचे स्थान श्रीशिवभारतात आहे.
किंबहुना स्वराज्य या संकल्पनेच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणजे " मातोश्री जिजाई व छत्रपती श्री शिवाजी महाराज".....!
जिजाऊंच्या ह्रदयात अखंड तेवणाऱ्या स्वराज्य संकल्पनेच्या नंदादीपाचा मंगलमय, आनंददायी, सुखशितल प्रकाश म्हणजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज......!

महाराजांच्या चरित्रातील मातोश्री जिजाबाईंचे स्थान हे केवळ आणि केवळ अलौकिक असेच आहे. "जी" म्हणजे जिद्द....."जा" म्हणजे जागृती....." ई" म्हणजे ईश्वरनिष्ठा.....हा " त्रिवेणी संगम " ज्यांच्या चरित्रात आपणास बघावयास मिळतो अशी स्वराज्यातील परममंगल व पुण्यदायी त्रिवेणी म्हणजे मातोश्री जिजाई साहेब......! ज्यांच्यामुळे हिंदूंच्या मंदिराचा कळस, व हिंदूच्या दारातील तुळस, सुरक्षित राहिली ती जीजाई......! हे ऐतिहासिक सत्य कुणीही नाकारू शकत नाही. मातोश्री जिजाईंचे चरित्र हा स्वराज्य संकल्पाचा एक अखंड धगधगता यज्ञच आहे. आजच्याच दिवशी स्वराज्याची राजधानी "दुर्गदुर्गेश्वर " श्रीरायगडावरील पाचाड येथे मातोश्री जिजाबाईंनी आपला देह स्वराज्य कारणी समर्पित केला. शिवरायांच्या जीवनात सर्वार्थाने आनंदाचे निधान व चैतन्याचे तुफान निर्माण करणारा हा स्वराज्य नंदादीप आजच्याच दिवशी मालवला.

या घटनेचे वर्णन करताना, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, शिवशाहीर श्री बळवंतराव मोरेश्वरराव उपाख्य बाबासाहेब पुरंदरे लिहितात........ राज्याभिषेकाच्या प्रचंड गडबडीतही महाराजांचे लक्ष आई साहेबांकडे पूर्ण होते. आईसाहेब म्हणजे तर महाराजांचे सर्वस्व....!
महाराजांचे दैवत.....!
तथापी गडावरची हवा फार थंड, वारा झोंबणारा, आई साहेबांची प्रकृती नाजूक, गडावरील हवामान त्यांना मानवे ना....
म्हणून महाराजांनी खास त्यांच्यासाठी गडाच्या निम्म्या डोंगरात असलेल्या " पाचाड " नावाच्या गावी एक उत्तम वाडा बांधला. तेथे त्यांची राहण्याची सर्व व्यवस्था केली. राज्याभिषेकासाठी महाराजांनी आपले हे थोर दैवत अलगद गडावर नेऊन प्रतिष्ठित केले. लटलटत्या मानेने आणि क्षीण झालेल्या डोळ्यांनी त्यांनी आपल्या बाळाचे सारे कोडकौतुक न्याहाळले. राजा म्हणजे " विष्णूचा अवतार "....!
शिवबाला " विष्णू रूप " प्राप्त झालेले त्यांनी पाहिले. आता आणखी काय हवे होते.....?
त्यांना काहीही नको होते. पण महाराजांना मात्र त्या हव्या होत्या. राज्याभिषेक उरकल्यावर महाराजांनी आईसाहेबांना गडावरून खाली पाचाडच्या वाड्यात आणले. आईसाहेबांना ते महाद्वाराचे बुलंद बुरुज विचारीत होते.......
आईसाहेब आता पुन्हा येणे कधी....?
क्षीण स्वरित माँ साहब म्हणाल्या असतील......
आता कैचे येणे जाणे......?
आता खुंटले बोलणे....!
हे ची तुमची आमची भेटी
येथुनिया जन्म तुटी.........
आता पान पिकले होते, वारा भिरभिरत होता, तरीही भिऊन जपून वागत होता. आणि पाचाडच्या वाड्यात आईसाहेबांनी अंथरूण धरले. महाराजांच्या ह्रदयात केवढी कालवाकालव झाली असेल.....?
अखेरचेच हे अंथरुण!
आईसाहेब निघाल्या, महाराजांची आई चालली, सती निघालेल्या आईसाहेबांना पूर्वी महाराजांनी महत्प्रयासाने मागे फिरविले होते, त्यावर दहा वर्षे आईसाहेब थांबल्या पण आता त्यांना कोण थांबविणार....?

"आई" कसले हे विचित्र नाते परमेश्वराने निर्माण केले आहे. जिच्या प्रेमाला किनारे नाहीत, तिच्या प्रेमाचा पार लागत नाही ती आई ....!
जगाला आई देणारा परमेश्वर किती छान असला पाहिजे. आज तीच आई हिरावून घेऊन जाणारा तो परमेश्वर केवढा निर्दय झाला असेल नाही?

ज्येष्ठ वद्य नवमी चा दिवस उजाडला, बुधवार होता या दिवशी. आई साहेबांची प्रकृती बिघडली, आयुष्याचा हिशोब संपत आला. वर्षे, महिने, आठवडे, दिवस संपले. आता अवघ्या काही तासांची थकबाकी. दिवस मावळला, रात्र झाली, मायेच्या माणसांचा गराडा भवती असताना, सूर्य पराक्रमी पुत्र जवळ असतानाही, मृत्यूचे पाश पडू लागले. सर्व हतबल झाले, कोणाचेही काहीही चालत नाही इथे. घोर रात्र दाटली, मध्यरात्र झाली. आईसाहेबांनी डोळे मिटले. श्वास श्वास थांबला. चैतन्य निघून गेले. आईसाहेब गेल्या. छत्रपतींचे छत्र मिटले गेले. मराठ्यांचा राजा " पोरका " झाला. स्वराज्या वरचा आपला पहारा संपवून आईसाहेब निघून गेल्या. महाराज दुःखात बुडाले. आईवेड्या शिवबाची "आई" गेली. शिवनेरीवर अंगाई गाणारी, लाल महालात लाड करणारी, राजगडावर स्फुर्ती देणारी आणि रायगडावर आशीर्वाद देणारी आई कायमची निघून गेली. आता या क्षणापासून आईची हाक ऐकू येणार नाही . कोणत्या शब्दात सांगू...? आईच्या हाकेचे सुख ज्यांना आई आहे ना त्यांनाच, नाही नाही ज्यांना आई नाही ना त्यांना फक्त आईचे हे महिमान कळू शकेल.

ललाटावरी काळाच्याही... 

आज दिवस हा दिव्य उगवला
सरला तम काजळ छाया
माय जिजाई कृतार्थ अंतरी 
वंदून स्वराज्य सूर्या ।।१।।

एक सुमंगल स्वप्नं पाही ती 
काजळ काळ्या राती 
स्वराज्य शब्दाचीही जेव्हा 
वाटे अवघ्या भीती ।।२।।

काजळ काळ्या रात्रीही ती
कडाडत विद्युल्लता 
उठा गड्यांनो नका घाबरू 
पहाट होईल आता ।।३।।

माय भवानी ही वरदानी 
सांभाळील बालका 
सह्य गिरीचे कडे रक्षितिल
होऊनिया पालका ।।४।।

उठा करा पुरुषार्थ अखंडित 
क्षणभर थांबू नका 
ललाटावरी काळाच्याही 
नाचवा भगवी पताका ।।५।।

आजच्याच दिवशी ज्येष्ठ वद्य नवमी, बुधवारी, मध्यरात्री दिनांक १७ जून १६७४ रोजी जिजाई साहेब स्वर्ग सोपानावर मार्गस्थ होऊन, स्वराज्याच्या निरोप घेऊन, महाप्रस्थान करत्या झाल्या. मांगल्याची साक्षात मूर्ती, कर्तुत्वाची साक्षात कीर्ति, निर्माण करणाऱ्या या श्रेष्ठ पुण्यश्लोक राजमातेच्या चरणी पुण्यतिथीच्या निमित्ताने अनंत श्रद्धानत साष्टांग प्रणिपात ......!

संपर्क : 94 222 84 666/ 79 72 00 28 70 

Web Title: Today is the death anniversary of Mansaheb Jijau; How could Shiva have saved himself in her last moments? Read that moment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.