आज झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी; जाणून घ्या मृत्यूपूर्वीचे त्यांचे शेवटचे विधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 07:00 AM2022-06-07T07:00:00+5:302022-06-07T07:00:02+5:30

स्वराज्यासाठी आणि स्वधर्मासाठी लढणारी झाशीची राणी आजच्याच तिथीला अर्थात ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला लढता लढता देवाघरी गेली. त्यावेळी तिचे शेवटचे शब्द होते... 

Today is the death anniversary of Queen Lakshmibai of Jhansi; Know their last statement before death! | आज झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी; जाणून घ्या मृत्यूपूर्वीचे त्यांचे शेवटचे विधान!

आज झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी; जाणून घ्या मृत्यूपूर्वीचे त्यांचे शेवटचे विधान!

googlenewsNext

"खूब लडी मर्दानी वो तो झाँसीवाली रानी थी" कवयित्री शुभद्रा कुमारी चौहान यांच्या "झांसी की रानी" या कवितेतील या ओळी राणी लक्ष्मीबाईच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी सर्वात अचूक आहेत. भारतीय इतिहासात राणी लक्ष्मीबाई यांना भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक मानले जाते. स्वराज्यासाठी आणि स्वधर्मासाठी लढणारी दुर्गा आजच्याच तिथीला अर्थात ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला लढता लढता देवाघरी गेली. त्यावेळी तिचे शेवटचे शब्द होते... 

''इंग्रजांना माझा देह मिळता कामा नये!''

अर्थात या दुर्गेने आजन्म आपल्या देहाचे, मनाचे, विचारांचे पावित्र्य तर जपलेच शिवाय मृत्यू पश्चातही क्रूरकर्मा इंग्रजांचा आपल्या देहाला स्पर्श होऊ नये याची खबरदारी घेत हितचिंतकांना, सैनिकांना शेवटची आज्ञा फर्मावली ती ही अशी! आज राणी लक्ष्मीबाईंची पुण्यतिथी आहे. १८५८ मध्ये ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला आणि तारखेनुसार १८ जून या दिवशी ग्वाल्हेरमध्ये इंग्रजांविरुद्ध लढताना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८२८ रोजी वाराणसी शहरात ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे आणि आईचे नाव भागीरथी सप्रे. राणी लक्ष्मीबाई ४ वर्षांच्या असताना त्यांच्या आईचे निधन झाले. राणी लक्ष्मीबाईचे वडील बिथूर जिल्ह्यातील पेशवा बाजीराव द्वितीय यांच्यासाठी काम करत होते आणि ते कल्याण प्रांताचे सेनापती होते. त्यांनी आपल्या कन्येचे नाव ठेवले मणिकर्णिका! लाडाने ते तिला मनु अशी हाक मारत असत. मनु अभ्यास, धनुर्विद्या, घोडेस्वारी, तलवारबाजी, मल्लखांब हे शिकत होती. 

मे १८४२ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी मणिकर्णिका हिचा विवाह झाशीचे राजे गंगाधर नेवाळकर यांच्याशी झाला. त्यानंतरच राणी लक्ष्मीबाई असे तिचे नामकरण करण्यात आले.

भारताचे तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी राणीच्या दत्तक पुत्राला झाशीचा उत्तराधिकारी म्हणून मान्यता दिली नाही. गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी झाशी ताब्यात घेण्याचा आदेश दिला. पण राणी लक्ष्मीबाईंनी त्याविरुद्ध उठाव केला. राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांशी लढण्याचा निर्णय घेतला आणि ‘मी माझी झाशी देणार नाही’ असा नारा दिला.

झाशीचा त्याग न करण्याच्या निर्धाराने, राणी लक्ष्मीबाईंनी १८५८ च्या लढाईत जवळजवळ दोन आठवडे वेढा घालून इंग्रजांना कडवी झुंज दिली. राणी लक्ष्मीबाई दोन्ही हातात तलवारी घेऊन, धाकटा मुलगा दामोदरराव पाठीवर बांधून रणांगणात लढल्या. शत्रूने त्यांचा पिच्छा सोडला नाही. राणीनेही हार मानली नाही. राणीच्या अंगावर तलवारीचे, बंदुकीच्या गोळ्यांचे असंख्य वार झाले होते. डोकं फुटलं होतं, एक डोळा लोम्बकळत बाहेर आला होता. राणी चक्कर येऊन धारातीर्थी पडणार, पण त्याही स्थितीत तिने एक इंग्रज मारून एका मंदिराच्या दिशेने घोडा वळवला. पाठोपाठ तिचा एक सैनिक होता आणि मंदिरात पुजारी होते. राणीने त्यांना सांगितले, ''माझ्या देहाला इंग्रजांचा स्पर्श होता कामा नये. त्याआधी माझा देह जाळून टाका आणि माझ्या दामोदरला सांभाळा!'

एवढे बोलून राणीने श्वास सोडला. त्यांच्या इच्छेप्रमाणे कारवाई करत उपस्थित दोघांनी मंदिराच्या मागच्या परिसरात लाकडांची जुळवाजुळव करत राणीच्या देहाला अग्नी दिला. राणी लक्ष्मी बाईंचा आत्मा पंचतत्त्वात विलीन झाला. मात्र तिच्या लढ्याने इंग्रजांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि हिंदूंच्या करारीपणाचा त्यांना प्रत्यय आला. 

अशा मर्दानी झाशीच्या राणीला शत शत नमन!

Web Title: Today is the death anniversary of Queen Lakshmibai of Jhansi; Know their last statement before death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.