नरसोबाच्या वाडीला दत्त प्रभूंचा साक्षात्कार अनुभवलेल्या स्त्री संत ताई दामले यांची आज पुण्यतिथी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 05:19 PM2023-09-27T17:19:39+5:302023-09-27T17:20:24+5:30
दत्त चरणी लिन असलेल्या स्त्री संत पार्वती दामले अर्थात ताई दामले यांची आज ४० वी पुण्यतिथी, त्यांच्या कार्याची ओळख करून घेऊ!
>> रोहन विजय उपळेकर
श्रीसंत प.पू.ताई दामले यांची आज ४० वी पुण्यतिथी आहे. भाद्रपद शुद्ध त्रयोदशी, सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या कृपांकित अशा अधिकारी सत्पुरुष प.पू.श्रीसंत पार्वती शंकर अशी ताईंची ओळख होती.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष येथे वसंत पंचमीदिनी, ५ फेब्रुवारी १८८९ रोजी पू.ताई दामले यांचा जन्म झाला. सौ.लक्ष्मी व श्री.नारायणराव पटवर्धन यांच्या पोटी त्या जन्मला. त्यांचे नाव द्वारका असे ठेवले गेले. १८९८ सालच्या प्लेगच्या साथीत त्यांचे जवळपास पूर्ण घरच मृत्युमुखी पडले. मातृछत्रही हरपले. त्यांच्या काकू पार्वतीबाई पटवर्धन यांनी त्यांना सांभाळले. या काकूंमुळेच पू.ताईंवर बालपणापासून परमार्थाचे संस्कार झाले. पार्वतीकाकूंचे पाठांतर दांडगे होते. उत्तमोत्तम श्लोक, स्तोत्रे, कवने, अभंगादी वाङ्मय या काकूंमुळेच पू.ताईंचेही पाठ झाले. ब्रह्मनाळ येथील एका स्वामींनी त्यांना बालपणीच नामस्मरण व मानसपूजा करण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार त्या भगवान श्रीदत्तप्रभूंची मानसपूजा व नामजप निष्ठेने करू लागल्या. त्या स्वामींनीच पुढे बारा वर्षांनी श्रीज्ञानेश्वरी वाचनाचीही त्यांना आज्ञा केली. तेव्हापासून श्रीज्ञानेश्वर माउली हे त्यांचे आराध्य दैवत बनले.
लहान वयात पू.ताई दामले यांच्या डोळ्यांना इजा होऊन ते लाल होत, दिसायला कमी आले. पुढे पुढे त्यांच्या डोळ्यांमध्ये केस उगवू लागले. त्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला सेवेसाठी राहिलेल्या असताना एकदा स्वप्नात "डोळ्यांत चरणतीर्थ घाल" अशी आज्ञा झाली. दुसऱ्याच दिवशी त्यांना पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांचे दर्शन लाभले. ते कृष्णामाईवरून स्नान करून येत होते. त्यांचे ओले चरणकमल घाटावर उमटत होते. पू.ताई त्यांच्या दर्शनासाठी गेल्या. त्यांना स्वप्नाची आठवण झाली व त्यासरशी जाणवले की श्रीदत्तप्रभूंनी हेच चरणतीर्थ घालायला सांगितले होते. प.प.श्री.टेंब्ये स्वामींच्या चरणांचे ओले ठसे त्यांनी पदराने टिपून घेतले व ते पाणी तांब्यात पिळून तीर्थ म्हणून वापरले. त्या तीर्थामुळेच पुढे कधी त्यांच्या डोळ्यांचा तो त्रास फारसा वाढला नाही.
पुढे १९०२-०३ मध्ये त्यांचा विवाह वाई येथील सुखवस्तू सावकार दामले यांच्या घराण्यातील श्री.शंकरराव यांच्याशी झाला. संसाराची सर्व कर्तव्ये पार पाडीत, हाताने काम व मुखाने नाम अशा प्रकारे त्यांची अध्यात्मसाधना गुप्तपणे चालूच होती. त्याचे फळ म्हणून त्यांना भगवान श्रीविष्णूंचे दर्शन लाभले. पुढे सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांचेही दर्शन लाभले व त्यांच्या कृपाप्रसादाने प.पू.ताई धन्य धन्य झाल्या. सतत नामस्मरण व श्री ज्ञानेश्वरी वाचन हीच त्यांची साधना होती. त्याबरोबर विविध संतवाङ्मयाचेही वाचन-मनन त्या करीत. प्रत्येक छोट्या मोठ्या घटनेचा, गोष्टीचा अध्यात्मपर अर्थ लावण्याची त्यांनी सवयच लावून घेतलेली होती. त्यामुळे दैनंदिन व्यवहारातही त्यांचे अनुसंधान टिकत असे. कधी कधी नामाच्या अथवा अशा आत्मविचाराच्या अनुसंधानाच्या योगाने त्या जणू भावसमाधीतच जात. काम करता करताच भान हरपून त्या स्थिर होऊन जात असत. श्री ज्ञानेश्वर माउलींच्या कृपेने आणि श्री ज्ञानेश्वरीच्या चिंतनाने त्यांना असा अनुभव येत असे.
१९४५ साली श्री ज्ञानेश्वर माउलींनी त्यांच्या स्वप्नात येऊन इतरांना अनुग्रह देण्याची त्यांना आज्ञा केली. तेव्हापासून प.पू.ताई दामले अध्यात्मजिज्ञासूंना, विशेषत: गृहिणींना मार्गदर्शन करू लागल्या. त्या ज्ञानेश्वरीवर प्रवचनेही करीत असत. दररोजच्या व्यवहारातील उदाहरणे घेऊन त्याद्वारे त्या परमार्थ शिकवीत असत. म्हणूनच त्यांचे सांगणे पटकन् समजत व पटत देखील असे. "आदळआपट, भांडणतंटा, धुसफूस, एक राग दुसऱ्या गोष्टीवर काढणे, असमाधान, चिडचिड व माझे माझे अशी हाव टाळून जर आपण वाट्याला आलेली रोजची कामे उत्तमरित्या करीत राहिलो व त्याचवेळी नामाची सवय लावली आणि ईश्वरार्पण बुद्धीने संसार केला तर तेच देवाला आवडते", असे त्या आवर्जून सांगत. त्यांनी स्वत: सुद्धा हेच तत्त्व आयुष्यभर कसोशीने पाळले होते.
पू.ताई दामले यांचे जीवनचरित्र हे सांसारिक भक्तांसाठी आदर्शवत् आहे. संसारात राहून, सर्व कर्तव्ये अचूक पाळूनही उत्तम परमार्थ कसा साधता येतो, हे पाहायचे असेल तर पू.ताई दामले यांचे चरित्र अभ्यासावे. त्यांचे चरित्र किती महत्त्वपूर्ण आहे हे समजण्यासाठी एक उदाहरण सांगतो. सुरुवातीच्या काळात त्या अखंड नामस्मरणाचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करीत होत्या. त्यात स्वयंपाक करताना नाम घ्यायची सवय लागण्यासाठी, फळीवरचे भांडे काढताना नाम घ्यायचे विसरले तर त्या पुन्हा ते भांडे फळीवर ठेवत, आठवणीने नाम घेऊन मग ते परत काढून घेत व स्वयंपाक करीत. इतक्या निष्ठेने आपल्या मनाला, शरीराला परमार्थाची सवय लावावी लागते, तरच तो परमार्थ अंगी मुरतो आणि मग वेगळे कष्ट न करताही आपोआपच होऊ लागतो. पू.ताईंचे हे वागणे आपल्यासाठी किती मार्गदर्शक आहे पाहा. अशा असंख्य बोधप्रद घटना त्यांच्या चरित्रात वाचायला मिळतात.
प.पू.ताई दामले यांच्याबद्दल प.पू.सद्गुरु योगिराज श्री.गुळवणी महाराजांना खूप प्रेमादर होता. प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज तर त्यांना आपली बहीणच म्हणत असत. पू.ताई दामले यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात वाई येथे प.पू.श्री.मामा स्वत: हजर होते व त्यांचीच प्रवचनसेवाही झाली होती.
पू.ताई दामले यांना नीटनेटकेपणाची खूप सवय होती. त्या वाणसामान वगैरे बांधून आलेल्या कागदांच्या नीट घड्या करून ठेवीत, त्याचे दोरेही नीट गुंडाळून ठेवीत असत. एकदा अशाच कागदाची घडी करताना त्यांचे लक्ष गेले. त्यावर काहीतरी लिहिलेले होते. कुतूहलाने पाहू गेल्यावर लक्षात आले की ते श्री ज्ञानेश्वर माउलींचे अष्टक आहे. त्यांना तो श्री माउलींचाच कृपाप्रसाद वाटला. त्यांनी ते अष्टक पाठ केले व आपल्या परिवारातील सर्व भगिनांनाही शिकवले. ते अष्टक नियमाने म्हणायची पद्धत घालून दिली. गंमत म्हणजे ते 'श्रीज्ञानदेवाष्टक' हे आपल्या प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी रचलेले असून अतिशय सुंदर आहे. सद्गुरु श्री माउलींचे पूर्ण चरित्रच त्या अष्टकामधून मांडले गेले आहे.
वयाच्या ९४ व्या वर्षी, भाद्रपद शुद्ध त्रयोदशी, दि.२० सप्टेंबर १९८३ च्या पहाटे ३ वाजून ५५ मिनिटांनी मुलुंड येथे प.पू.ताई दामले यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. त्यांच्या देहाला आळंदी येथे इंद्रायणी काठी अग्नी देण्यात आला. कृष्णेकाठी जन्मलेली ही सद्गुरु श्री माउलींची कृपांकित साध्वी इंद्रायणी काठी कायमची विसावली. त्यांची समाधी इंद्रायणी काठी बांधलेली आहे.
योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांच्या आज्ञेने प.पू.ताई दामले यांचे "कृष्णाकाठ ते इंद्रायणी घाट"नावाचे छोटेखानी चरित्र नीलाताई जोशी यांनी लिहिलेले आहे. त्या चरित्रातून अतिशय बोधप्रद मार्गदर्शन लाभते. म्हणून परमार्थ अभ्यासकांनी ते आवर्जून वाचावे. महाराष्ट्राच्या संपन्न संतपरंपरेतील एक अलौकिक स्त्रीसंत म्हणून पू.ताई दामले यांची गणना होते. त्या अतिशय प्रसिद्धिपराङ्मुख असल्याने त्यांचे नावही फारसे कोणाला माहीत नाही. सर्वसामान्य प्रापंचिक भक्तांसाठी त्यांचे जीवन खरोखर आदर्शच आहे. प.पू.श्रीसंत ताई दामले यांच्या चरणीं पुण्यतिथी निमित्त सादर प्रणिपात !
संपर्क : 8888904481