वारकऱ्यांमधील शैव आणि वैष्णव भेद मिटवणारे संत निवृत्तीनाथ यांचा आज समाधी दिवस!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 07:00 AM2023-06-15T07:00:00+5:302023-06-15T07:00:01+5:30

माऊलींची माउली अर्थात संत ज्ञानेश्वर यांना गुरुस्थानी असलेले वडील बंधू संत निवृत्तीनाथ यांचा १५ जून रोजी समाधी दिन. 

Today is the Samadhi Day of Saint Nivrittinath, who settled the differences between Shaivites and Vaishnavites! | वारकऱ्यांमधील शैव आणि वैष्णव भेद मिटवणारे संत निवृत्तीनाथ यांचा आज समाधी दिवस!

वारकऱ्यांमधील शैव आणि वैष्णव भेद मिटवणारे संत निवृत्तीनाथ यांचा आज समाधी दिवस!

googlenewsNext

विठ्ठलपंत हे आपेगाव क्षेत्रातील गोविंदपंत कुलकर्णी व त्यांची पत्नी निराबाई यांचे पुत्र. वेदशास्त्रांचे अध्ययन केल्यानंतर विठ्ठलपंत आई वडिलंच्या आज्ञेने द्वारका, सोरटी सोमनाथ वगैरे तीर्थे हिंडून त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी येथे जाऊन आळंदीस आले. आळंदीच्या सिद्धोपंतांच्या रुक्मिणी या कन्येशी विठ्ठलपंतांचा विवाह झाला. लहानपणापासूनच विठ्ठलपंत संन्यासी वृत्तीचे होते. एक दिवस पत्नीची संमती न घेताच त्यांनी काशीला प्रयाण केले. तिथे त्यांनी रामानंद स्वामींकडून संन्यासदीक्षा घेतली. 

काही काळानंतर रामानंद स्वामी फिरत फिरत आळंदीस आले. ते अश्वत्थाच्या पारावर बसले असता रुक्मिणीने त्यांना नमस्कार केला तेव्हा `पुत्रवती भव' असा स्वामींनी तिला आशीर्वाद दिला. 
'माझे पती विठ्ठलपंत यांनी माझा त्याग करून संन्यासदीक्षा घेतली आहे. काशीला वास्तव्य केले आहे.' असे तिने सांगितले. 

रामानंद स्वामी तसेच काशीला गेले. त्यांनी विठ्ठलपंतांना गृहस्थाश्रम घेण्याची आज्ञा केली. गुुरुच्या आज्ञेप्रमाणे विठ्ठलपंत आळंदीस परतले. त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. लोकांनी त्यांची निंदा केली. त्यांना बहिष्कृत करण्यात आले. तेव्हा ते गावाबाहेर झोपडी बांधून राहू लागले. त्यांना तीन पूत्र व एक कन्या झाली. पहिला निवृत्ती, दुसरा ज्ञानेश्वर, तिसरा सोपान व शेवटची मुक्ताबाई.

विठ्ठलपंतांनी गुरुच्या आज्ञेचे पालन केले. त्या आचरणाला धर्ममान्यता नव्हती. वैदिक ब्रह्मवृंदांनी त्यांचा अतिशय छळ केला. त्यांच्या मुलांना `संन्याशाची पोरं' म्हणून मानहानी सहन करावी लागली. ते माधुकरीलाही महाग झाले. पठणच्या ब्रह्मवृंदांकडे शुद्धीचा काही आधार मिळतो का पहावा, या विचाराने विठ्ठलपंत मुलांना घेऊन निघाले. ब्रह्मनगरीला आल्यावर एका वाघाची डरकाळी त्यांच्या कानी आली. निवृत्ती त्या सर्वांना घेऊन एका गुहेच्या दारात जाऊन उभा राहिला.
गुहेतून आवाज आला, `ये बाळ ये!' त्या आवाजाने निवृत्तींना एक दिलासा मिळाला. त्यानंतर `मी तुझीच वाट पाहतोय' हे शब्द कानी पडल्यावर कुणाचा तरी आपणाला आधार आहे, कुणीतरी आस्थेने आपणाला जवळ घेत आहे या जाणिवेने निवृत्ती सुखावले. 

निवृत्ती गुहेत गेले. त्या ध्यानस्थ योगीराजाच्या चरणांवर त्यांनी मस्तक ठेवले. 
`जय अलख निरंजन' म्हणून सद्गुरुकृपेचा करस्पर्श निवृत्तींच्या मस्तकावर झाला. ते होते, श्री गहिनीनाथ. त्यांनी निवृत्तींना नाथपंथाची दीक्षा दिली. अनुग्रह केला. शिवशंकराकडून आलेला मच्छिंद्र, गोरक्ष, गहिनी असे करीत गुप्त ज्ञानाचा ठेवा निवृत्तीनाथांच्या हाती आला. 
`बाळ निवृत्तीनाथा, तुझ्यासारख्या सोशिक, सात्विक, भाविक जीवाच्या शोधात मी होतो. तुला दिलेले ज्ञान, हा ठेवा योग्य वेळी जनकल्याण, लोकजागृतीसाठी प्रगटन कर.'

ब्रह्मवृंदांनी विठ्ठलपंत व रुख्मिणीबाई यांना देहांताची शिक्षा फर्मावली. ती प्रमाण मानून त्या माता पित्यांनी जगाचा निरेप घेतला. चारही मुले पोरकी झाली. त्या सर्वांचा सांभाळ निवृत्तीनाथांनी केला. पदोपदी होणारा अपमान, कानावर येणारी दुष्ट वचने, पोटात भडकत राहणारी भूक हे पाहून ज्ञानेश्वर खोपटाची ताटी बंद करून स्वत:ला कोंडुन घेऊन बसले. निवृत्तीनाथ व सोपान यांनी त्यांना समजावले. मुक्ताबाईने आपला चिमुकला गाल ताटीवर टेकवून आळवून म्हटले, `अरे ज्ञाना, आपण या जगात उगाच का आलो? अरे, जग झालिया वाहिन, संतमुखे व्हावे पाणी, तुम्ही तारोन विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा'

मुक्ताबाईंच्या शब्दाबरोबर ज्ञानेश्वरांचा क्रोध नाहीसा झाला. आई वडील देहांत प्रायश्चित्त घेऊन गेले. आतातरी पैठणचे ब्रह्मवर्य आपल्याला स्वीकारून यज्ञोपवित देतील या विचाराने चारही भावंडे आळंदीहून पैठणला गेली. तिथे ज्ञानेश्वरांपुढे त्या पंडितांची भंबेरी उडाली. त्यांनी त्या चार मुलांवरचा बहिष्कार काढून घेतला. गळ्यात जानवे न पडलेल्या या मुलांच्या गाठी ब्रह्मज्ञान असलेले पाहून त्यांनी या चार भावंडांना हरिनाम घेत जन्माचे सार्थक करून घेण्याचा सल्ला दिला. 

पैठणहून ही भावंडे निघाली. वाटेत निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना आदेश दिला, `या साध्यासुध्या समाजाला समजेल अशा साध्या, सरळ भाषेत जीवनाचे तत्त्वज्ञान समजावून दिलेस तर साऱ्यांच्या जीवनाचे सार्थक होईल. तुझ्या वाणीत प्रसाद आहे. लोकांविषयी तुला आत्मियता वाटते. त्यांच्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला जा गीताप्रसाद दिला, तो तू सर्वांसाठी मराठी भाषेत समजावून सांग.' ज्ञानेश्वरांनी गुरुस्थानी असलेल्या निवृत्तीनाथांचा आदेश मानत ज्ञानेश्वरी लिहिली, कथन केली. ठायी ठायी गुरुभक्तीचे महात्म्य सांगितले.  

निवृत्तीनाथांनीही दोनशेहून अधिक अभंग लिहिले, हरिपाठ रचले. निवृत्तीनाथांनी शिवभक्तीला कृष्णभक्तीची जोड दिली. यातूनच संतांचा पंढरीचा पांडुरंग व विठ्ठलभक्ती निर्माण झाली. निवृत्तीनाथांनी शिव व श्रीकृष्ण हे एकरूप असल्याचे अभंगातून सांगितले. त्यामुळे शैव व वैष्णव भेद वारकरी संप्रदायात उरला नाही. निवृत्तीनाथांमुळे ज्ञानेश्वर महाराजांसारखा मराठी भाषेला ललामभूत महाकवी महाराष्ट्राला लाभला. या तिनही भावंडांच्या पश्चात निवृत्तीनाथांनी संजीवन समाधी घेतली, तो आजचाच दिवस!

Web Title: Today is the Samadhi Day of Saint Nivrittinath, who settled the differences between Shaivites and Vaishnavites!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.