आज चंद्रोदय लवकर आहे, पण उपास सोडण्याआधी चंद्रदर्शन का घ्यायचे हे जाणून घेऊ!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 11:36 AM2021-09-24T11:36:52+5:302021-09-24T11:37:17+5:30
संकष्टीच्या विधी मध्ये चंद्राला एवढे महत्त्व का दिले गेले, ते गणेश पुराणातील कथेवरून जाणून घेऊ.
आज संकष्ट चतुर्थी आहे व रात्री ८ वाजून ४८ मिनिटांनी चंद्रोदय आहे. उपासामुळे आज फार काळ कष्टी राहावे लागणार नाही. तरीदेखील हा उपास आपण ज्या चंद्राचे दर्शन घेऊन मग सोडतो, त्याचे महत्त्व आधी जाणून घेऊया.
अलीकडे संकष्ट चतुर्थी करणारे बरेच लोक आहेत. कलियुगामध्ये गणपतीची व देवीची उपासना वाढेव व ती फलद्रुप होईल. 'कलौ चंडी विनायकौ' असे समर्थांनी म्हटले आहे, तसे दृश्य आता दिसू लागले आहे. समर्थांचे ते वचन खोटे ठरणारे नाही. लोकांची श्रद्धा उत्तरोत्तर वाढत आहे. दुसरे म्हणजे या मनस्वी धकाधकीच्या जीवनात लोकांना मन:शांतीसाठी दुसरी जागा व मार्ग नाही. मन:शांती मिळवण्यासाठी मंदिरात गेले पाहिजे, काही उपासना केली पाहिजे, हे लोकांना आता पटत आहे.
संकष्ट चतुर्थीव्रत का करावे? यासंबंधी मुद्गल पुराणात दिलेली माहिती जाणून घ्या!
संकष्टीचा उपास करणारे सर्व भाविक पूर्वापार पद्धतीने उपास करतात. उपासना करतात. स्तोत्र म्हणतात. बाप्पाला दुर्वा वाहतात. त्याच्या आवडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवतात आणि सायंकाळी आरती करून चंद्रदर्शन झाल्यावर भोजन करतात. अशा या संकष्टीच्या विधी मध्ये चंद्राला एवढे महत्त्व का दिले गेले, ते गणेश पुराणातील कथेवरून जाणून घेऊ.
गणेशाचे जे स्वरूप आहे ते चंद्राला नीट कळले नाही. चंद्राने गणेशाची टवाळी केली. त्यावर गणपतीने त्याला शाप दिला. तुझे तोंड कोणी पाहणार नाही. हा शाप देण्यामागचे कारण एवढेच होते, की कोणीही कोणाच्या व्यंगावर हसू नये आणि कोणाला कमी लेखू नये. चंद्राला त्याच्या चुकीची जाणीव झाली. गणपतीने त्याला क्षमा करत उ:शाप दिला, की गणेश चतुर्थीला तुझे दर्शन कोणी घेणार नाही पण संकष्टीला तुझे दर्शन घेतल्याखेरीज कोणी उपास सोडणार नाही.
गणेशाने दिलेल्या शब्दाचे पालन सर्व भक्त करतात. चतुर्थीला चंद्र दर्शन घेऊन उपास सोडतात. काही जण एकादशीप्रमाणे दोन्ही वेळ उपास करतात. परंतु संकष्टीच्या व्रतात दोन्ही वेळचा उपास अपेक्षित नाही. म्हणून चंद्रदर्शन झाल्यावर काहीच नाही, तर निदान भात खाऊन उपास सोडावा.
संकष्टीचे व्रत शीघ्र फलदायी आहे, त्याबाबत एक पौराणिक कथादेखील सांगितली जाते; ती अशी...
उपास सोडण्यापूर्वी चंद्रोदयाची वेळ पाहून चंद्र दर्शन घ्यावे. गणेशाचे दर्शन घ्यावे. त्याला दुर्वा व फुले वाहावीत. आरती म्हणावी. मोदकांचा आणि जेवणाच्या ताटाचा नैवेद्य दाखवावा. संकष्ट चतुर्थीचे दिवसभराचे व्रत पूर्ण करून सहभोजनाचा आनंद घ्यावा.
बाप्पा मोरया!