शाकंभरी नवरात्रीत आज आहे नवमी तिथी; देवीच्या या तिथीला करा कुमारिकेचे पूजन!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 02:16 PM2022-01-11T14:16:26+5:302022-01-11T14:16:50+5:30
कुमारिका पूजनाशिवाय देवीचे पूजन पूर्णत्वास जात नाही, असे मानले जाते. म्हणून शाकंभरी नवरात्रीतही पौष शुक्ल नवमीला चंडिकेची आणि कुमारिकेची पूजा करतात.
सोमवारपासून शाकंभरी नवरात्र सुरू झाली. शाकंभरी अर्थात भरपूर भाज्या, फळे देणारी देवी. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाकंभरी नवरात्रीचा उत्सव साजरा करतात. नवरात्रीत आपण शक्तीपूजन करता़े मग ती चैत्र नवरात्र असो, शारदीय असो नाहीतर शाकंभरी असो. या तीनही नवरात्रीत आपण हळदी कुंकू समारंभ करून स्त्रीशक्तीचा गौरव करतो. तसेच नवरात्रीत मान असतो कुमारीकांचा. कुमारिका पूजनाशिवाय देवीचे पूजन पूर्णत्वास जात नाही, असे मानले जाते. म्हणून शाकंभरी नवरात्रीतही पौष शुक्ल नवमीला चंडिकेची आणि कुमारिकेची पूजा करतात.
कुमारिका पूजन का करतात?
देवी भागवतात म्हटले आहे, की दोन ते दहा वर्षांच्या मुलींना अर्थात वयात न आलेल्या मुलींना कुमारिका म्हणून बोलवावे. तीन वर्षाच्या मुलीला त्रिमुर्ती, चार वर्षाच्या मुलीला कल्याणी, पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी, सहा वर्षाच्या मुलीला कालिका, आठ वर्षांच्या मुलीला शांभवी, नऊ वर्षांच्या मुलीला दुर्गा आणि दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा असे नवकन्यारूप मानले जाते. वयात आल्यानंतर मुलींमध्ये राग, लोभ, विकार, वासना यांची वृद्धी होऊ लागते. परंतु कुमारिका अल्लड, निरागस आणि निर्विकार असतात. बालरूपात आपण देव पाहतो. म्हणून कुमारिकांना पूजेचा मान दिला जाता़े कुमारिका पूजनाने धन, दीर्घायुषय, बळ वृद्धिंगत होते. तसेच त्यांच्या शुभाशिर्वादाने घरात सुख, समृद्धी, शांती येते.
कुमारिका पूजन पुढीलप्रमाणे करावे-
नवरात्रीत सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवशी कुमारिका पूजन करतात. शाकंभरी नवरात्रीत ध्वजनवमीला अर्थात नवमीला कुमारिकांना पाचारण करतात. पायावर दूध-पाणी घालून स्वागत करतात. हळद-कुंकू लावून औक्षण करतात. त्यांना आवडेल अशी भेटवस्तू देतात. देवीला स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवून कुमारिकेला जेवू घालतात.
देवीचा उत्सव मांगल्याचा, विजयाचा ध्वज उंचावून साजरा केला जातो, म्हणून त्याला 'ध्वजनवमी' अशी ओळख मिळाली आहे. तसेच या दिवसाला शाकंभरी नवमी असेही म्हणतात. देवीचे मंदिर, घट, मूर्ती फुलांच्या माळांनी सुशोभित करतात आणि कुमारिका पूजन करतात. या नवमीला उभय नवमीदेखील म्हणतात. काही ठिकाणी तांदळाची पिठाची देवीची मूर्ती तयार करून पूजा करतात. व पूजेनंतर खीरीचा नैवेद्य दाखवतात. देवीचा नित्यसहवास मिळावा आणि तिची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी, म्हणून हे व्रत मनोभावे केले जाते.