आज विनायकी चतुर्थी; जाणून घेऊया बाप्पाच्या संकटनाशन स्तोत्राबद्दल रोचक माहिती!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 01:05 PM2021-06-14T13:05:30+5:302021-06-14T13:10:39+5:30
संकट नाशन स्तोत्रात बारा गणेश नावांचा व नावानुसार स्थानांचा उल्लेख केला आहे. ही स्थाने सद्यस्थितीत कुठे आहेत, याचीही माहिती दिली आहे.
आपल्या आवडत्या बाप्पाची प्रार्थना,स्तुती करण्यासाठी आपण पूजेला स्तोत्र पठणाची जोड देतो. जसे की संस्कृतातले किंवा मराठीत भाषांतरित केलेले 'गणपती स्तोत्र' अवघ्या दोन मिनिटांत म्हणून होते. हे स्तोत्र संकटनाशन स्तोत्र म्हणूनही ओळखले जाते. ते पाठ करायलाही सोपे असल्याने बालपणापासूनच मुखोद्गत असते. परंतु, आपल्याला त्याचा अर्थ माहीत असतोच असे नाही. आज विनायकी चतुर्थी निमित्त या स्तोत्रात दडलेली माहिती जाणून घेऊया.
संकट नाशन स्तोत्रात बारा गणेश नावांचा व नावानुसार स्थानांचा उल्लेख केला आहे. ही स्थाने सद्यस्थितीत कुठे आहेत, याचीही माहिती दिली आहे. मध्यंतरी समाज माध्यमावर ही उपयुक्त माहिती वाचनात आली व त्यात उल्लेख केल्यानुसार समर्थ रामदास स्वामींनी या स्तोत्रात दडलेली बाराही गणेशस्थाने शोधून काढून बाप्पाचे दर्शन घेतले होते. ती स्थाने कोणती, हे पाहू.
प्रथमं वक्रतुंड च एकदन्तं द्वितीयकम्। तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्।। २।।
लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च। सप्तमं विघ्न राजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम्।। ३ ।।
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्। एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम्।। ४।।
१. वक्रतुण्ड : मद्रास राज्यातील कननूर येथील गाव.
२. एकदंत : पश्चिम बंगालमध्ये कोलकाता जवळ.
३. कृष्णपिंगाक्ष: मद्रास येथे कन्याकुमारीजवळील गाव.
४. गजवस्त्र : ओरिसा राज्यात भुवनेश्वर जवळ.
५. लंबोदर : याची दोन स्थाने आहेत - १. गणपतीपुळे जवळ २. मध्यप्रदेश येथील पंचमुखी ओंकारेश्वर
६. विकट : हिमालयाच्या पायथ्याशी ऋषिकेश येथे.
७. विघ्नराजेंद्र : कुरु क्षेत्रात कौरव पांडवांच्या युद्धभूमीजवळ.
८. धुम्रवर्ण : दक्षिणेकडे केरळ राज्यात कालिकतजवळ आणि तिबेटमध्ये ल्हासापासून १५ मैलांवर
९. भालचंद्र : रामेश्वरजवळ धनुष्कोडी येथे
१०. विनायक : काशी क्षेत्रातील अन्नपूर्णा मंदिराजवळचा धुंडीराज गणेश.
११. गणपती : क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथील द्विभुज महागणपती.
१२. गजानन : हिमालयातील शेवटचे तीर्थस्थान पांडुकेसर येथील मुंडकटा गणेश. गौरी कुंडाजवळ ही गणेशमूर्ती शिरविरहित आहे.
आता जेव्हा केव्हा तुम्ही हे गणपती स्तोत्र संस्कृतात 'प्रणम्य शिरसा देवं' किंवा मराठीत 'साष्टांग नमन हे माझे' म्हणाल, तेव्हा या बारा तीर्थक्षेत्रांचा आठव तुम्हाला होईल, हे नक्की!