आजच्या आभासी जगात आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठी 'हा' पर्याय वापरून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 04:36 PM2021-11-10T16:36:45+5:302021-11-10T16:37:07+5:30

जी व्यक्ती आपल्या गुणांनी, स्वभावानी सर्वांना जिंकून घेते, ती लोकप्रिय ठरते.

In today's virtual world, try the 'this' option to identify who is your near and dear ones | आजच्या आभासी जगात आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठी 'हा' पर्याय वापरून बघा!

आजच्या आभासी जगात आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठी 'हा' पर्याय वापरून बघा!

googlenewsNext

'मी काही दिवसांसाठी समाज माध्यमांवरून रजा घेत आहे.' अशी पोस्ट आली, की का, कशासाठी, किती दिवस वगैरे प्रश्नांची सरबत्ती होते. लोकांच्या प्रतिसादामुळे पोस्ट टाकणारी व्यक्ती भारावून जाते आणि महिन्याभराचा संकल्प करून गेलेली व्यक्ती आठ-दहा दिवसातच समाज माध्यमांवर दिसू लागते. सगळ्या गोष्टी पूर्ववत होतात. आभासी जगातले लोक पुन्हा जोडले जातात. लाईक-डिसलाईकचा ससेमिरा सुरू होतो आणि व्यक्ती त्या जगात पुनश्च गुरफटून जाते. मात्र, त्या आठ-दहा दिवसांत किती जणांनी आस्थेने आपली चौकशी केली, ते जरूर आठवून पहा. कारण, तीच तुम्ही जोडलेली आणि कमावलेली खरी 'फ्रेंडलिस्ट' आहे.

तुम्हाला कोण आवडतं, हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही कोणाला आवडता, हे महत्त्वाचे आहे. समाज माध्यमांवरील आभासी जगात कोणीही, कधीही, कसाही लोकप्रिय ठरू शकतो. परंतु वास्तवात आपल्याशिवाय जगू शकणार नाहीत, अशी किती नाती आपण जोडली आहेत, याचा सारासार विचार होणे महत्त्वाचे आहे.
  
तुमची आवड-निवड काय, हे पूर्णपणे तुमच्या विचारांवर अवलंबून असते. एखादी व्यक्ती आवडत असेल, तर ती तुमच्या मनात राहते आणि एखादी व्यक्ती आवडत नसेल, तर ती तुमच्या डोक्यात राहते. याचे कारण, तुम्ही तुमच्या सोयीने त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात स्थान दिलेले असते. मात्र, तुमच्या आवडून घेण्या-न घेण्याने, समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात अजिबात फरक पडत नाही. मात्र, किती जणांनी, तुम्हाला तुमच्या गुण-दोषांसकट स्वीकारले आहे, या गोष्टीचा, तुमच्या आयुष्यात नक्कीच फरक पडतो. 

जो आवडतो सर्वांना...

एखादी व्यक्ती सर्वांना का आवडते, याचे कारण शोधा. रूप, सौंदर्य, पैसा या शुल्लक बाबी आहेत. त्या आज आहेत, तर उद्या नाहीत. परंतु, जी व्यक्ती आपल्या गुणांनी, स्वभावानी सर्वांना जिंकून घेते, ती लोकप्रिय ठरते. अशी व्यक्ती आनंदाचे झाड असल्याप्रमाणे सर्वांना आपल्या छायेखाली घेते. ती व्यक्ती होण्याचा प्रयत्न आपण कधी केला आहे का? की फक्त समाज माध्यमांवर असणाऱ्या फॉलोवर्सच्या संख्येवर आपण समाधानी आहोत, याचा विचार होणे गरजेचे आहे. 

निसर्गाशी मैत्री करा. 

केवळ लोकच नाहीत, तर निसर्गाशीसुद्धा जुळवून घेता आले पाहिजे. निसर्ग सर्वांना आवडतो, परंतु निसर्गाच्या सान्निध्यात आल्यावर काही मंडळी, खुशाल नासधूस सुरू करतात. स्वत:च्या इब्रतीचा आणि निसर्गाचा कचरा करतात. अशा व्यक्तीचा सहवास निसर्गाला तरी आवडत असेल का? निश्चितच नाही.

संत तुकाराम महाराज नामात दंगून गेले, की त्यांच्या अंगाखांद्यावर फुलपाखरे, चिमण्या बागडत असत. कारण, त्या सुक्ष्म जीवांनाही तुकाराम महाराजांचे भय वाटले नसेल. नाहीतर आपल्याला रोज पाहणारी गल्लीतली कुत्रीही सोडत नाहीत. भूंकुन सारा परिसर डोक्यावर घेतात. याचाच अर्थ, आपल्यातून निघणाऱ्या  नकारात्मक लहरी ते शोषून घेतात. याउलट, सकारात्मक लोकांच्या सहवासात निसर्गही आनंदाने खुलतो. अलीकडचे उदाहरण द्यायचे, तर डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या आनंदवनात मुंगसापासून, मगरीपर्यंत सर्व प्राणी-पक्षी गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. हे आधुनिक काळातले ऋषीमुनीच नाही का?

निसर्ग अतिशय संवेदनशील आहे. तो आपल्याशी बोलत असतो. पण आपणच जर आपली ज्ञानेंद्रिय बंद करून घेतली असतील, तर त्यांचाच काय, तर स्वत:चाही आतला आवाज ऐकू शकणार नाही. यासाठी दुसऱ्याचे ऐकायची, समजून घ्यायची तयारी हवी. समोरच्या व्यक्तीला गुणदोषासकट स्वीकारायची तयारी हवी. आपली मते न लादता, दुसऱ्यांचे प्रश्न, अडचणी सोडवण्याची तयारी हवी. ही सवय लावून घेतली, तर आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या, पाना, फुला, दगडाच्या भावनाही न सांगता कळतील. अगदी, 'अगं बाई अरेच्चा' मधल्या संजय नार्वेकर सारख्या. 

जगा आणि जगू द्या. 

ही दैवी शक्ती नाही, हा आपल्या आवडी-निवडीचा भाग आहे. आपल्याला व्यक्तीशी, परिस्थितीशी, निसर्गाशी जुळवून घ्यायचे आहे, की एकटे राहायचे आहे? तुमच्या सुख-दु:खाने कोणालाही फरक पडणार नसेल, तर तुम्ही जगूनही मृतवत आहात. 

या गोष्टी सांगायला, शिकवायला कोणी येणार नाही, त्या आपणच आपल्या समजून घ्यायच्या आहेत. आभासी जग आपल्यासाठी आहे, आपण आभासी जगासाठी नाही. याची जाणीव ठेवा आणि वास्तवात या.

Web Title: In today's virtual world, try the 'this' option to identify who is your near and dear ones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.