उद्या मार्गशीर्षातील पहिला गुरुवार; वैभवलक्ष्मीच्या व्रताची अशी करा परिपूर्ण तयारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 04:53 PM2021-12-08T16:53:12+5:302021-12-08T16:55:57+5:30

कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा केली जाते. लक्ष्मीला गोडोधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. स्त्रिया मनोभावे लक्ष्मीची कहाणी वाचतात.

Tomorrow is the first Thursday in the Margashirsha; Prepare the vows of Vaibhavalakshmi vrata like this! | उद्या मार्गशीर्षातील पहिला गुरुवार; वैभवलक्ष्मीच्या व्रताची अशी करा परिपूर्ण तयारी!

उद्या मार्गशीर्षातील पहिला गुरुवार; वैभवलक्ष्मीच्या व्रताची अशी करा परिपूर्ण तयारी!

googlenewsNext

मार्गशीर्ष मासात दोन गोष्टी मुख्यत्त्वे लक्षात असतात. एक म्हणजे दत्त जयंती आणि दुसरे म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारचे वैभव लक्ष्मीचे व्रत! अनेक स्त्रिया वैभवसंपन्नतेसाठी हे व्रत करतात. यावेळी वैभव लक्ष्मीची पूजा व उपास करतात. तसेच सवाष्णींना हळद कुंकू लावून वाणही देतात. चला या व्रताबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

जे कुणी महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन-चिंतन करावे; म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील; तुमची कामना पूर्ण करील असे मानले जाते. हे व्रत कसे करावे ते पाहू. 

मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी उपवास आणि शास्त्रोक्त पूजा केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. उद्यापनाच्या दिवशी सवाष्ण स्त्रियांना बोलावून हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात. 

  • या व्रताची पूजा सुरू करण्यापूर्वी पूजेची जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी.
  • चौरंगावर लाल वस्त्र घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाची रास मांडून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा.
  • कलशाला बाहेरून हळद-कुंकवाचे बोट लावावे.
  • कलशात दूर्वा, पैसा आणि सुपारी घालावी. 
  • विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर श्रीफळ अर्थात नारळ ठेवावा. 
  • चौरंगावर श्री लक्ष्मीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे.
  • त्यापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा.
  • लक्ष्मीसमोर दिवा लावावा.
  • लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करावी.
  • देवीला कमळाचे फूल अर्पित करावे.
  • लक्ष्मी पूजनानंतर सर्व कुटुंबासमवेत श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचावी आणि आरती करावी. 
  • श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे.
  • यादिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा. मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी. संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करुन नैवेद्य दाखवावे.
  • गायीसाठी एक पान वेगळं काढावे. नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे.

दुसर्‍या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे, किंवा तुळशीच्य झाडाला घालावे. पाने  निर्माल्यात टाकावीत. शेवटच्या गुरुवारी पाच कुमारिका किंवा पाच सवाष्णींना बोलावून हळद-कुंकू, फळं, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा.

दर गुरुवारी नेमाने केल्या जाणाऱ्या या पुजेचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. या दिवशी हळदीकुंकू देऊन सवाष्णींना फळे तसेच इतर वाण दिले जाते. या महिन्यात मांसाहार वर्ज्य केला जातो. मार्गशीर्षांतील गुरुवारची चाहुल लागताच बाजारपेठा फळाफुलांनी भरून जातात. या व्रतासाठी आंब्याचे डहाळे, पाच पत्री, पाच फळे, महालक्ष्मीसाठी सुवासिक वेणी, नारळ आणि यानिमित्ताने घरी येणाऱ्या सुवासिनींसाठी गजरे आदी गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे बाजार सगळा याच गोष्टींनी भरून गेलेला दिसतो. चला तर आपणही या व्रत वैकल्याचा एक भाग होऊया आणि वैभव लक्ष्मीची पूजा करूया. 

Web Title: Tomorrow is the first Thursday in the Margashirsha; Prepare the vows of Vaibhavalakshmi vrata like this!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.