Travel: आज अनसूया माता जयंती; त्यानिमित्त जाणून घ्या भारतात कुठे आहे अनसूया मातेचे मंदिर?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 03:23 PM2023-04-10T15:23:47+5:302023-04-10T15:24:27+5:30
Travel: दत्तगुरूंचे जन्मस्थान आणि त्यांची माता अनसूया यांचे मंदिर व तिथे जाण्याचा मार्ग याबद्दल सविस्तर जाणून घ्या!
आज चैत्र कृष्ण चतुर्थी. ही तिथी माता अनसूयेचि जयंती म्हणून ओळखली जाते. त्यानिमित्ताने आपण अनसूया मातेबद्दल आणि त्यांच्या मंदिराबद्दल जाणून घेऊया. अनेक निपुत्रिक भाविक तिथे संतती प्राप्तीची आस घेऊन जातात आणि नवस बोलतात. पाहूया तिथला स्थान महिमा आणि इतर माहिती.
अनुसूया मंदिर उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात मंडलपासून सहा किलोमीटर उंचीवर पर्वतांमध्ये आहे. हे मंदिर अनुसूया मातेला समर्पित आहे. येथे दरवर्षी दत्त जयंती साजरी केली जाते. तसेच दत्त जयंती उत्सवानिमित्त होणाऱ्या यात्रेत भारतभरातून भाविक त्या काळात दर्शनासाठी येतात. पौराणिक मान्यतेनुसार या मंदिरात जप आणि यज्ञ करणाऱ्यांना संतती प्राप्त होते. माता अनसूयेने याचठिकाणी आपल्या तपोबलावर 'त्रिदेव' (ब्रह्मा, विष्णू आणि शंकर) यांचे बाळात रूपात रूपांतर केले आणि कालांतराने त्यांना पुत्र म्हणून मागून घेतले. तिन्ही देवांनी अनसूया मातेच्या तपश्चर्येला भुलून तथास्तु म्हटले आणि त्याच स्थानावर त्रिदेवांचा जन्म झाला. तेव्हापासून लोक इथे संतती प्राप्तीच्या इच्छेने येतात. नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाल्यावर पुनश्च दर्शनाला जातात.
कोण होती माता अनसूया?
अनसूया माता ही अत्री ऋषींची पत्नी होती. ती अतिशय पतिव्रता होती. तिच्या तपोबलावर ती इंद्र पदाची मानकरी ठरेल अशी इंद्राला भीती वाटू लागली. तेव्हा तीनही देवांनी तिच्या सत्त्वाची परीक्षा घेतली व त्यात ती उत्तीर्ण झाली. अत्री ऋषींच्या आशीर्वादाने आणि तीनही देवांच्या कृपेने तिच्या उदरी दत्त, चन्द्र आणि दुर्वास यांची आई होण्याचे भाग्य लाभले.
कसे पोहोचायचे
गोउत्तराखंड येथे पोहोचल्यावर गोपेश्वर मंडलकडे रस्त्याने जाता येते. मंडल गेटपासून चार किमी अंतरावर घनदाट जंगलातून चालत जात अनसूया मंदिरात पोहोचता येते. संतती प्राप्तीच्या आशेने येणारी मंडळी गुरुवारी मोठ्या संख्येने तिथे जातात.