Travel: गजानन महाराजांचे रत्नागिरीतील सुंदर मंदिर तुम्ही पाहिले आहे का? सविस्तर जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 05:40 PM2022-12-15T17:40:14+5:302022-12-15T17:41:16+5:30
Travel: गण गण गणात बोते, हा सिद्धमंत्र देणारे गजानन महाराज यांचे रत्नागिरीस्थीत सुंदर मंदिर प्रेक्षणीय आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती...
>> मकरंद करंदीकर
आपल्या हिंदू धर्मातील मंदिरे, मठ, तीर्थस्थाने याबद्दल अनेक दंतकथा, कथा, त्याबद्दलचे काही किस्से आपण ऐकतो. रत्नागिरी शहरापासून, पावस मार्गावर फक्त १२ कि.मी. अंतरावर, श्री संत गजानन महाराजांचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराबद्दलही असेच काही आश्चर्यकारक व योगायोगाचे किस्से ऐकायला मिळतात.
सध्याच्या युगात प्रत्येक जण अनेक प्रश्न, संकटे आणि अडचणीने गांजलेला असतो. त्यावर बहुतेक सामान्य संसारी माणूस हा देवधर्मातून, भक्तीमार्गाने उपाय शोधत असतो. शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांचा भक्त परिवार देश विदेशात खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. अलीकडे आपण खूप मोठमोठ्या श्रीमंत देवस्थानांमधील गैरप्रकारांबद्दल बातम्या वाचतो. पण गजानन महाराज यांच्या शेगाव येथील देवस्थानचे व्यवस्थापन, स्वच्छता, शिस्त, भक्तमंडळींच्या उत्तम व्यवस्थेची मात्र आपण खूप चांगली वर्णने ऐकतो. गजानन महाराजांच्या अन्यत्र असलेल्या मंदिरातही तीच शिस्त, स्वच्छता, पारदर्शकता, भक्तांची स्वयंशिस्त आढळून येते.
रत्नागिरी नजिकच्या गोळप या ठिकाणी असलेले गजानन महाराजांचे मंदिर असेच अत्यंत प्रशस्त स्वच्छ आणि भव्य आहे. मंदिराच्या भोवती चारही बाजूंना पाण्याचे छोटे खंदक आहेत. हे मंदिर २०१६ मध्ये सुरू झाले. सकाळी ६ll ते रात्री ७ll पर्यंत हे मंदिर दर्शनार्थ खुले असते. गुरुवारी खिचडी व झुणका भाकरीचा प्रसाद असतो.
मूळचे या गावातील आणि मुंबईतील रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करणारे कै. वसंतराव गोगटे हे गजानन महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या मनात या ठिकाणी गजानन महाराजांचे मंदिर बांधण्याची खूप इच्छा होती. त्यांच्या येथील घरात जायला, कोकणातील खालची आळी, वरची आळी या रचनेप्रामाणे जेमतेम पायवाट होती. तरीही १९८६ मध्ये, शेगावची महाराजांची पालखी, हत्ती घोड्यांसह त्यांच्या घरी आली. आता महाराजच येथपर्यंत आले आहेत तर त्यांचे कायमस्वरूपी मंदिर येथे व्हायला हवे, असे त्यांना तीव्रपणे वाटू लागले. पण सर्व गोष्टी आणि याचे आर्थिक गणित जमवायचे कसे हा प्रश्न होता. या वसंतराव गोगटे यांना गजानन महाराजांच्या चरित्रावर निघालेल्या दूरदर्शन मालिकेमध्ये, साक्षात गजानन महाराजांचेच काम करण्याची सुसंधी लाभली. हाच गजानन महाराजांचा आदेश आहे, इच्छा आहे असे मानून त्यांनी त्यांना मिळालेले त्याचे सर्व मानधन या कामासाठी दिले व सुरुवात केली. या प्रचंड खर्चासाठी त्यांचा हा एक अत्यंत पवित्र असा हातभार होता. त्यांचे पुतणे श्री. माधव गोगटे हे आता या मंदिराची व्यवस्था पाहतात.
या मंदिराच्या प्रांगणात, गजानन महाराजांची, एक पाय खाली सोडून बसलेल्या सुप्रसिद्ध छबितील, एक प्रचंड म्हणजे सुमारे १८ फूट उंचीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. असे कळले की ही मूर्ती खरे तर माहिमच्या गजानन महाराजांच्या मंदिर परिसरात बसविण्यासाठी तयार करण्यात आली होती. पण तेथे कांहीं तांत्रिक कारणामुळे ते शक्य न झाल्याने, त्या मूर्तीचा स्थानापन्न होण्याचा योग मात्र या गोळपच्या मंदिरात होता हे खरे ! या मंदिरातील गाभाऱ्यातील मूर्तीचे दर्शन तर अगदी हमरस्त्यावरून जातांना सुद्धा सहजपणे होते. मुख्य मंदिराशेजारी पठण, पारायण, कीर्तन, प्रवचन इत्यादींसाठी एक प्रशस्त सभागृह बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. श्री गजानन महाराजांचे जगभर पोचलेले, 'श्री गजानन विजय ' हे चरित्र लिहिणारे दास गणू महाराज ( सहस्रबुद्धे) यांची मूळ वास्तू आणि विठ्ठल मंदिर रत्नागिरीनजिकच्या कोतवडे येथे आहे, हा सुद्धा एक योगच म्हणायचा ! इथली प्रसन्नता आणि पावित्र्य याचा अनुभव घेण्यासारखा आहे.
ll गण गण गणात बोते ll