Travel: समुद्राच्या पोटात गुडूप होणारे आणि भगवान कार्तिकेयाने वसवले आहे असे हे शिवमंदीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 01:55 PM2022-05-24T13:55:44+5:302022-05-24T13:57:09+5:30
Travel: ओहोटी काळातच या मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेता येते. भरतीच्या वेळी शिवलिंग पूर्ण बुडून जाते आणि कोणीही मंदिरापर्यंत पोहोचू शकत नाही.
गुजरातमध्ये असे शिवाचे मंदिर आहे, ज्याला स्वतः समुद्र देवता रोज अभिषेक घालते. हे मंदिर वडोदरा पासून ८५ किमी अंतरावर जंबुसर तहसीलच्या कावी-कंबोई गावात आहे. स्तंभेश्वर नावाचे हे शिवमंदिर मंदिर दिवसातून दोन वेळा अर्थात सकाळी आणि संध्याकाळी काही काळ पाण्यात बुडून जाते आणि काही वेळाने पूर्णतः अदृश्य होते. केवळ ओहोटीच्या काळातच मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेता येते. भरतीच्या वेळी शिवलिंग पूर्ण बुडून जाते आणि कोणीही मंदिरापर्यंत पोहोचू शकत नाही.
स्तंभेश्वर शिवमंदिर अतिशय पुरातन आहे. हे मंदिर अरबी समुद्राच्या कळंबे किनाऱ्यावर वसलेले आहे. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी या मंदिराचा शोध लागला. मंदिरात असलेल्या शिवलिंगाचा आकार चार फूट उंच आणि दोन फूट व्यासाचा आहे. या प्राचीन मंदिराच्या मागे अरबी समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. येथे येणाऱ्या भाविकांसाठी माहिती पत्रक वाटले जाते, त्यात भरती-ओहोटीची वेळ लिहिलेली असते जेणेकरून येणाऱ्या भाविकांना अडचणींना सामोरे जावे लागत नाही.
या मंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते की-
शिवपुराणानुसार ताडकासुर नावाच्या राक्षसाने आपल्या तपश्चर्येने भगवान शिवाला प्रसन्न केले होते. शिव जेव्हा त्यांच्या समोर प्रकट झाले तेव्हा त्यांनी वरदान मागितले की फक्त सहा दिवसांचा शिवपुत्रच त्याचा वध करू शकेल. शिवाने त्याला हे वरदान दिले होते. वरदान मिळताच ताडकासुरने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. देव आणि ऋषी घाबरले. देव आणि ऋषींनी शिवाला त्याचा संहार करण्याची प्रार्थना केली. शिव-शक्तीपासून निर्माण झालेला पुत्र कार्तिकेय याने जन्मानंतर अवघ्या सहा दिवसात ताडकासुरचा वध केला होता.
कार्तिकेयाला कळले की ताडकासुर हा शंकराचा भक्त आहे, तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला. तेव्हा भगवान विष्णूंनी कार्तिकेयाला वधाच्या ठिकाणी शिवालय बांधायला सांगितले. कार्तिकेयानेही तसे केले. सर्व देवतांनी मिळून महिसागर संगम मंदिरात विश्वानंदक स्तंभाची स्थापना केली, जे आज स्तंबेश्वर तीर्थ म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की शिव शंभू (भगवान शंकर) स्वतः स्तंबेश्वर महादेव मंदिरात वास्तव्य करतात, म्हणून महासागर देव स्वतः त्यांचा जलाभिषेक करतात. येथे महिसागर नदी समुद्राला मिळते. अशा या सुंदर तीर्थक्षेत्राला अवश्य भेट द्या! जय भोलेनाथ!