Travel : Kedarnath Dham: बाबा केदारनाथांचे दर्शन घ्यायचे असेल तर आताच करा आखणी, नंतर पुनश्च बंद होईल द्वार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 10:43 AM2022-05-06T10:43:12+5:302022-05-06T10:43:46+5:30
Kedarnath Dham: केदारनाथाचे दर्शन आणि नयनरम्य निसर्ग सौंदर्य याची प्रचिती घ्यायची असेल तर येत्या सहा महिन्यांचा काळ उत्तम आहे!
१२ ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात उंचावर वसलेले केदारनाथ, हे भाविकांचे आवडते तीर्थक्षेत्र आहे. बर्फवृष्टीमुळे तेथील बंद दरवाजे कधी उघडणार याकडे भाविकांचे लक्ष लागून असते. अशा समस्त भाविकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ३ मे रोजी केदारनाथचे द्वार उघडले आहे आणि आतापर्यंत हजारो भाविकांचे दर्शनही घेऊन झाले आहे.
अक्षय्य तृतीयेला उघडते मंदिराचे द्वार :
केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. गौरीकुंडहून १४ किलोमीटर (८.७ मैल) लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते. हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा ह्या कालावधीमध्येच खुले असते व हिवाळ्यामध्ये येथील देवांच्या मुर्ती उखीमठ ह्या स्थानवर आणल्या जातात व तेथेच पुजल्या जातात.
प्रशासकीय व्यवस्था :
केदारनाथला दरवर्षी लाखो भाविक दर्शन घेतात. कोरोना काळात दर्शन बंद असले, तरी आता जवळपास सर्व निर्बंध उठवल्यामुळे भाविकांचा ओघ पुनःश्च केदारनाथकडे वळला आहे. सध्या तिथे फारशी नियमावली नसली तरी मास्क वापरण्याबाबत सक्ती ठेवली आहे. एवढ्या भाविकांची राहण्याची सोय करण्याच्या दृष्टीने प्रशासन व्यवस्था अपुरी पडत असल्यामुळे तेथील खाजगी हॉटेलमध्ये राहून भाविक आपली तीर्थयात्रा पूर्ण करत आहेत. तसे असले, तरी वाहतूक सेवेबाबत प्रशासनाने पूर्व तयारी करून हवाई सेवा, रेल्वे सेवा, बस सेवा यांचा पुरवठा सुरळीतपणे सुरु ठेवण्यात यश मिळवले आहे. दोन वर्षांच्या कालावधी नंतर भक्तांची झुंबड वाढल्याने प्रशासन यंत्रणेवर ताण येणे साहजिक आहे. त्याची सुयोग्य हाताळणी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
असे झाले बाबा केदारनाथचे जंगी स्वागत :
यावेळी केदारनाथमध्ये वेळेआधी उपस्थित असलेल्या हजारो भाविकांनी भगवान शंकराच्या डोलीचे भव्य स्वागत केले. लष्कराच्या मराठा ब्रिगेडच्या ११ यादीतील जवानांनी खास बँड वाजवून डोलीचे स्वागत केले. मंदिराच्या प्रांगणात भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला. शिस्तबद्ध पद्धतीने बाबा केदारनाथच्या दर्शनाची सुरुवात झाली आहे. तुम्हीसुद्धा तिथे जाण्यास उत्सुक असाल तर कार्तिक पौर्णिमेपर्यंतचा कालावधी तुमच्या कडे आहे. त्यानंतर मंदिर पुनश्च बंद होईल. त्यामुळे केदारनाथाचे दर्शन आणि नयनरम्य निसर्ग सौंदर्य याची प्रचिती घेण्यासाठी आतापासून योजना आखा आणि तयारीला लागा.