Travel : परदेशात स्थित असलेली सर्वात उंच विष्णू मूर्ती कुठे आहे व ती कोणी साकारली? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 12:03 PM2022-06-04T12:03:52+5:302022-06-04T12:04:17+5:30
Travel : हिंदू धर्म सर्वात प्राचीन धर्म आहे आणि जगभरात पसरलेला आहे. त्यामुळे विदेशातही हिंदू संस्कृतीचे बीज रुजलेले दिसते. सदर विष्णू मूर्ती त्याचेच एक प्रतीक आहे!
भारतात हिंदू देवी-देवतांची अनेक आश्चर्यकारक मंदिरे आहेत आणि त्यांच्याशी संबंधित अनेक रहस्ये अजूनही उलगडलेली नाहीत. जगातील विविध देशांमध्ये हिंदू देवी-देवतांची प्रसिद्ध मंदिरेही आहेत. पण काही मंदिरे खूप खास आहेत. असेच एक मंदिर मुस्लिम देशात आहे. भगवान विष्णूची जगातील सर्वात उंच मूर्ती येथे स्थापित आहे. तर मुस्लिम समाजाचे सर्वाधिक अनुयायी येथे आहेत. ही विष्णू मूर्ती आहे इंडोनेशियात. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
१२२ फूट उंचीची मूर्ती बनवण्यासाठी २४ वर्षे लागली
मुस्लिम देश इंडोनेशिया हा एक असा देश आहे जिथे हिंदू भगवान विष्णूंची जगातील सर्वात उंच मूर्ती स्थापित आहे. हिंदूंची लोकसंख्या सर्वाधिक असलेल्या भारतातही इतकी मोठी विष्णूमूर्ती नाही. ही मूर्ती इंडोनेशियातील बाली बेटावरील केनकाना पार्कमध्ये आहे. ही मूर्ती १२२ फूट उंच आणि ६४ फूट रुंद असून ती बनवण्यासाठी २४ वर्षे लागली. या मूर्तीमध्ये भगवान विष्णू गरुडावर विराजमान आहेत. ही मूर्ती २०१८ मध्ये पूर्ण झाली असून ती पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. ही मूर्ती तांबे आणि पितळाची आहे.
ही योजना १६ वर्षांपूर्वी तयार करण्यात आली होती
इंडोनेशियामध्ये राहणारे शिल्पकार बाप्पा नुमान नुआरता यांनी १९७९ मध्ये अशी महाकाय मूर्ती बनवण्याचे स्वप्न पाहिले, जी आजपर्यंत जगात कुठेही बनलेली नाही. त्यानंतर ही मूर्ती घडवण्याचे नियोजन सुरू झाले. तब्बल १६ वर्षांच्या नियोजनानंतर त्यावर काम सुरू झाले. ते तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले.
देशाच्या विमान कंपनीचेही नाव विष्णूच्या वाहनाच्या नावावर आहे
या मुस्लिम देशात हिंदू देवी-देवतांची लोकप्रियता खूप जास्त आहे. येथे हिंदू देवतांची मोठ्या प्रमाणावर पूजा केली जाते. भगवान विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाच्या नावावरून इंडोनेशियन विमान कंपनीचे नाव गरुड एअरलाइन आहे, हा लोकांच्या श्रद्धेचा परिणाम आहे. त्याचप्रमाणे इंडोनेशियाची रामलीलाही जगप्रसिद्ध आहे.