Travel: वर्षाअखेरचे दिवस, गुलाबी थंडी आणि माथेरानचा ३५ फूट उंच बाप्पा; सरत्या वर्षात घेणार का बाप्पाची भेट?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 07:00 AM2022-12-27T07:00:00+5:302022-12-27T07:00:02+5:30
Travel: बाप्पाच्या दर्शनाने नवीन वर्षांची सुरुवात होणार असेल तर उत्तमच, सोबतच थंडीची मजा आणि ट्रेकिंगचे थ्रिल, सविस्तर वाचा.
नवीन वर्षाच्या आगमनाचे अनेक बेत आखले, रद्द झाले. गोवा ट्रिप प्लॅन केली ती सुद्धा रद्द झाली, आता रडत बसत नवीन वर्षाचे स्वागत करण्यापेक्षा मुंबई जवळचा बेत तुम्हाला आखता येईल. माथेरान हे पर्यटकांचे आवडते स्थान आहेच, पण तिथे उभा असलेला बाप्पा लक्षवेधक आहे. त्याच्या दर्शनाने नवीन वर्षांची सुरुवात करायची ठरवली तर? चला अधिक जाणून घेऊ.
माथेरानच्या डोंगरात एका दगडावर स्थानिक कलाकारांनी आपल्या कलाकुसरीने भव्य बाप्पा साकारला आहे. डोंगराच्या कपारीत आणि खोल दरीच्या बाजूला ३५ फूट उंचीचा गणपती प्रामुख्याने ट्रेकर्सला आपल्याकडे खुणावतो. २००५ पासून येथे निसर्गराजा गणपती उभारण्याचे काम सुरू झाले होते.
कृषीवल या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, ४७ मीटरच्या दगडी कड्याला गणेशाच्या भक्तीमुळे आकार देण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर राजाराम खडे यांनी पुढे गणेशापुढे मोदक असावा म्हणून, तब्बल साडेपाच फूट उंचीचा आणि एका व्यक्तीच्या कवेत येणार नाही एवढा मोठा मोदक सिमेंटच्या सहाय्याने तयार केला. या निसर्गराजा गणपतीच्या बाजूला एक कमी जाणवत असल्याचे तेथे भेट देणारे आवर्जून सांगायचे. अगदी लहान आकाराचा असलेला उंदीरमामा हा देखील मोठा असावा या हेतूने खडे यांनी तब्बल सात फूट उंचीचा उंदीर मामा बनविला. एखाद्या व्यक्तीच्या उंचीपेक्षा मोठ्या आकाराचा उंदीरमामा ही गोष्ट निसर्गराजा गणपती येथे शक्य झाली आहे.
त्या कड्यावरच्या गणपतीला रंगरंगोटी करण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये म्हणून लोखंडी शिड्या बनविण्यात आल्या आहेत. नेरळ ममदापूर येथील बाळू कारले यांनी त्या परिसराला आणि कितीही दूरवरून पाहिले तरी आकर्षक दिसेल असे रंगकाम पूर्ण केले आहे. त्यामुळे मिनीट्रेनमधून प्रवास करणारा प्रत्येक पर्यटक त्या दगडात कोरलेल्या गणेशाच्या मूर्तीचे कौतूक करत असतात. कड्यावरच्या गणपतीपासून काही अंतरावर असलेल्या पेब म्हणजे विकटगडावर अनेक ट्रेकर्स येतात. हे ट्रेकर्स मोठ्या संख्येने कड्यावरच्या गणपतीला भेट देतात. दुसरीकडे हौशी पर्यटक आणि ट्रेकर्स हे आवर्जून निसर्गराजा गणेशाची भेट घेण्यासाठी येत असतात. तेथे पोहोचण्यासाठी किमान चार किलोमीटरचे अंतर नेरळ-माथेरान मिनीट्रेच्या मार्गात चालत जावे लागते.
तर मग तुम्ही पण आखताय का बेत? माथेरानचे, बाप्पाच्या भेटीचे आणि नव्या वर्षाच्या जंगी स्वागताचे?