तुमच्या आयुष्यातही संकटांचा ससेमिरा सुरू आहे? मग या गोष्टीत दडले आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 08:00 AM2021-06-23T08:00:00+5:302021-06-23T08:00:07+5:30
ज्याप्रमाणे सुख फार काळ टिकत नाही, त्याप्रमाणे दुःखही फार काळ टिकत नाही.
एक मुलगा अतिशय दुःखी होता. त्याच्या आयुष्यात दुःखांचा, संकटांचा ससेमिरा थांबतच नव्हता. शेवटी कंटाळून सगळ्या संसाराचा त्याग करून तो एका डोंगरावर निघून गेला. तिथे त्याला एक साधू महाराज भेटले. त्याने त्यांना आपली व्यथा सांगितली. साधू महाराज म्हणाले, 'एवढंच ना, तुला मी एक उपाय सांगतो, त्यामुळे तुझे सगळे प्रश्न संपतील.'
हे ऐकून मुलाला हायसे वाटते. साधू सांगतात. आज रात्री आपण डोंगराच्या पायथ्याशी जाऊ. जिथून तू वर चढत इथे आलास. तिथेच तुझ्या समस्येचे समाधान आहे. मुलाचे कुतूहल वाढते. तो साधू महाराजांबरोबर डोंगराच्या पायथ्याशी जायला निघतो.
तिथे एक उंट पाळणारा दरवेशी असतो. मुलाला वाटते, साधू महाराज त्याच्याकडून माझ्या समस्येचे उत्तर देणार आहेत. उंट एका झाडाला बांधलेले असतात. दरवेशी शांत झोपलेला असतो. साधू महाराज तो उठण्याची वाट पाहत असतात. बराच वेळ जातो. रात्र चढत जाते. साधू महाराज सांगतात, 'एक काम कर, हे उंट झोपले, की तू ही झोपी जा. सकाळी तुझ्या प्रश्नाचे उत्तर घेऊ आणि मग तू तुझ्या वाटेने जा, मी माझ्या वाटेने जातो. तोवर दरवेशी सुद्धा उठेल.'
असे सांगून साधू महाराज झोपी गेले.
मुलगा ताटकळत उंट झोपण्याची वाट पाहत राहिला. रात्र सरली. सकाळ झाली. दरवेशी उठला. साधू महाराजांनाही जाग आली. मुलगा त्या उंटांकडे बघत पेंगत बसलेला. त्याला पाहून साधू महाराज म्हणाले, 'काय रे, तू झोपलास की नाही?'
मुलगा म्हणाला, 'कसं झोपणार महाराज? तुम्ही सांगितलेलं, सगळे उंट झोपले की मग झोप. इथे मात्र एक उंट झोपला की दुसऱ्या उंटाला जाग येईल. दुसरा उठला की त्याच्या आवाजाने तिसऱ्याला जाग येई. असे करत या सगळ्यांनी मला रात्र जागवली.'
त्यावर साधू महाराज आणि दरवेशी हसू लागले. साधू महाराज म्हणाले, 'वेड्या हेच आहे तुझ्या प्रश्नाचे उत्तर! एका मागून एक संकटांना जाग येतच राहणार. पण आपण त्यांच्याकडे किती वेळ लक्ष द्यायचं आणि कधी दुर्लक्ष करत शांत झोपी जायचं, हे या दरवेशाकडून शिक! तो सुद्धा तुझ्यासारखा उंटांवर पाळत ठेवत राहिला, तर त्याला कधीच झोपता येणार नाही. एका ठराविक मर्यादेनंतर सगळा भार देवावर सोपवून निश्चिन्त राहायला शिक, म्हणजे तुझ्या वाट्याला आलेल्या संकटांना तोंड देण्याचे बळ तुझ्यात आपोआप येईल.'
मुलाला ही गोष्ट पटली. त्याने साधू महाराजांचे आभार मानले आणि दरवेशाचा आदर्श ठेवून आपल्या घराकडे प्रयाण केले. त्यामुळे यापुढे आपल्याही मागे संकटांचा ससेमिरा लागला, तर या दरवेशाची आठवण नक्की काढा आणि परमेश्वरावर भार सोपवून निवांत राहा.