दुसऱ्यांची प्रगती पाहून त्रास होतोय? थांबा! त्याआधी ही गोष्ट वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 04:51 PM2021-06-16T16:51:56+5:302021-06-16T16:53:37+5:30

दुसऱ्याच्या यशाने वाईट वाटून न घेता आपण कुठे कमी पडत आहोत, याचा अभ्यास करा आणि आपल्या यशाची वाट तयार करा. तुम्हालाही निश्चितच यश मिळेल!

Troubled by the progress of others? Read this story before you wait! | दुसऱ्यांची प्रगती पाहून त्रास होतोय? थांबा! त्याआधी ही गोष्ट वाचा!

दुसऱ्यांची प्रगती पाहून त्रास होतोय? थांबा! त्याआधी ही गोष्ट वाचा!

Next

स्पर्धा निकोप असेल, तर प्रगतीला वाव असतो. परंतु सहसा तसे होत नाही. स्पर्धेतून एकमेकांबद्दल मत्सर वाढतो, द्वेष उत्पन्न होतो आणि दुसऱ्याच्या प्रगतीने आपण अस्वस्थ होतो. हा मनुष्य स्वभाव असला, तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दुसऱ्यांच्या प्रगतीबद्दल वाटणारी असूया आपल्या प्रगतीच्या आड येऊन नैराश्याला खतपाणी घालते. त्यावर पर्याय सुचवताना व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू एक गोष्ट सांगतात. ती वाचल्यावर तुम्हाला बालपणी ऐकलेली गोष्ट आठवेल. ती गोष्ट कोणती हे पुढे कळेलच. आधी प्रभुजींनी सांगितलेली गोष्ट पाहू. 

राहुल आणि जितेन हे दोघेही एकाच विद्यापीठातून एकाच गुणवत्तेने उत्तीर्ण झालेले दोन विद्यार्थी एकाच कंपनीत नोकरीला लागतात. दोघेही एकसारखे मेहनती असूनही वर्षभरातच राहुलला पगारवाढ आणि पदोन्नती मिळते. जितेनला या गोष्टीचा खूप त्रास होतो. तो कुढत राहतो. आणखी मेहनत घेतो. तरीदेखील त्याच्या कामाची दखल घेतली जात नाही. 

एक दिवस जितेन रागारागात राजीनामा देतो. आपल्या मेहनतीची दखल घेतली जात नसल्याचे राजीनाम्यात नमूद करतो. कंपनीचे व्यवस्थापक जितेनच्या याआधीच्या कामाची पाहणी करतात. पण तो नक्की कशात कमी पडतोय, हे पाहण्यासाठी त्याला एक संधी देतात. 

जितेनला बोलावून एक काम दिले जाते. आपल्या कंपनीच्या आवारात कोणी टरबूज विक्रेता आहे का? याची पाहणी करण्यास सांगितले जाते. जितेन तपास करून येतो. व्यवस्थापक त्याला टरबुजाची किंमत विचारतो, जितेन पुन्हा जाऊन चौकशी करून येतो. थोड्यावेळाने हेच काम राहुलला दिले जाते. राहुल तपास करून येतो आणि आल्यावर टरबूजवाला कुठे बसतो, तो किती रुपयाला टरबूज देणार आहे, तो टरबूज कुठे पिकवतो, महिन्याला किती उत्पन्न कमवतो, त्याच्याकडून घाऊक भावात खरेदी करायची असल्यास आपल्याला किती नफा होऊ शकेल अशी इथंभूत माहिती आणतो. ते ऐकून जितेन वरमतो. काम सारखेच, परंतु राहुलच्या कामाची पद्धत, त्याची विचार करण्याची पद्धत आणि कामाला दिलेले पूर्णत्त्व यामुळे त्याचे काम आपल्यापेक्षा वरचढ ठरते, हे जितेन च्या लक्षात येते. तो राजीनामा मागे घेतो आणि राहुलच्या हाताखाली राहून काम अधिक चांगल्या रीतीने पूर्ण कसे करता येईल हे शिकून घेतो. 

आता तुम्हालाही बालपणीची अकबर बिरबलाची गोष्ट आठवली ना? बिरबलाच्या जागी बेगम आपल्या भावाचा वशिला लावू पाहते, पण बिरबल म्हणजे आजचा राहुल असतो. जो कामात चोख आणि उजवा असतो. आपल्यालाही अशा राहुलचा, बिरबलाचा आदर्श ठेवायचा आहे. यशाचा मार्ग असाच शोधायचा असतो. त्यामुळे दुसऱ्याच्या यशाने वाईट वाटून न घेता आपण कुठे कमी पडत आहोत, याचा अभ्यास करा आणि आपल्या यशाची वाट तयार करा. तुम्हालाही निश्चितच यश मिळेल!

Web Title: Troubled by the progress of others? Read this story before you wait!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.