देहभ्रांती, मनोभ्रांती, जीवभ्रांती तोडतो तोच खरा गुरु​​​​​​​!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 11:50 AM2020-11-10T11:50:13+5:302020-11-10T12:07:47+5:30

गुरुमुळे भ्रम मिटत नसेल व भ्रांती जात नसेल तर असा गुरु सोडायला वेळ न करणे योग्य.

The true Guru is the one who breaks delusion of life! | देहभ्रांती, मनोभ्रांती, जीवभ्रांती तोडतो तोच खरा गुरु​​​​​​​!

देहभ्रांती, मनोभ्रांती, जीवभ्रांती तोडतो तोच खरा गुरु​​​​​​​!

googlenewsNext

           जो गुरु ते भ्रम न मिटे
               भ्रांति न जिसका न जाय ।
                  सो गुरु झुठा जानिये
                   त्यागत देर न लाय ॥

          जो गुरु भ्रमच मिटवित नसेल, तर तो भयानक आहे. असा गुरु मनुष्याला भ्रमात ठेवून शोषण करु शकतो. म्हणून कबिरजी चेतावणी देतात, ज्या गुरुमुळे भ्रम मिटत नसेल व भ्रांती जात नसेल तर असा गुरु सोडायला वेळ न करणे योग्य. लायचा अर्थ होतो योग्य. 
        असा गुरु गुरु नाही गुरुघंटाल आहे. अर्थात चलाख आहे. उलट तो भ्रम कायम ठेवतो. मनुष्याची भ्रान्ती कायम ठेवतो. अहंकाराने देहाभिमान होतो. देहाभिमानाने नश्वर संसार सत्य असल्याचा भ्रम निर्माण होतो व शाश्वत सत्याविषयी भ्रांती निर्माण होते. खरे गुरु हा भ्रम व भ्रांती दूर करतात.
                 आपण पाहतो कधी टीव्हीवर की, काही गुरु  हास्यास्पद भ्रमात मनुष्याला गुंतवितात. एक प्रसिध्द गुरु समोसा खाण्याने समस्या दूर करतो.  तर दुसरे काही गुरु देहासक्तीला आपल्या उपदेशात खोटं ठरवित होते, मात्र स्वतःच देहासक्ती व भोगापायी  कारावास भोगत आहेत. असे  शेकडो गुरु आपल्या चाहत्यांना भ्रमात ठेवून, भ्रांती कायम ठेवून लोकांच्या टाळ्या पडतील असे विचार सांगतात. संतांच्या वचनावर त्यांच्या हयातीत कधी एवढ्या  टाळ्या नाही पडल्या.  कारण ते लोकांची भ्रम, भ्रांती तोडत होते,  आंधळी श्रध्दा तोडत होते. अहंकारावर वार करीत होते. ह्यामुळे खर्‍या संतांना आपल्या काळात जनरोषाला सदैव सोसावे लागले.
             खोट्या गुरुला लोक  बळी का पडतात? कारण बर्‍याच लोकांना अंहकार, सत्याविषयीचा भ्रम कायम असणेच सुखाचे वाटते. मग असा चलाख गुरु भ्रम कायमही ठेवताे.  त्याचेकडे शिष्य म्हणून येणार्‍या मनुष्याला तू खूप धार्मिक आहेस, दानी आहेस, खरा प्रेमी आहेस, खरा भक्त आहेस, अशा  अहंकाराचा अनेस्थिया देताे. मग त्या अहंकाराचे  गुंगीत असलेल्या माणसाचे तनमनधनाचे पूर्ण शोषण करायला चलाख गुरु मोकळा होतो. खरे तर  मनुष्याचे हे लक्षात यायला थोडी तरी स्तुति पराङ्मुखता असायला हवी. म्हणून बहुतेक स्तुति विषयी सावध नसलेले लोकच फसविले जातात. स्तुति मुळे स्वाभिमान फुलतो. आपल्या विषयी कोणताही अभिमानच घातक असतो. मुख्यतः स्त्रीच्या सौंदर्याचा व पुरुषाचे कर्तृत्वाचा अभिमान तर सर्वसाधारण राहतो. गुरुघंटाल त्या अभिमानाचे भ्रमालाच गोंजारतो.जगात अनेक लोक अध्यात्मिक लोकांकडून नाडविले जातात, त्याचे मुख्य कारण हेच असते.
           यामुळे खरे संत खूप व्यथित होतात. म्हणून कबीरजी एक सुत्र देतात, की ओळखा, जो गुरु तुमच्या अहंकाराला गोंंजारत असेल, भ्रम व भ्रांती तोडत नसेल तर पळा त्याच्यापासून. कारण जगात केवळ खरा सदगुरूच भ्रम मिटवितो, भ्रांति पासून मुक्त करतो. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांचे वचन यासाठी समजून घेणे योग्य होईल.
  
    हे श्री सदगुरुदयार्णव । तुझे कृपेसी नाही ठांव ।
      कृपेने तारिसी जीव । जीवभाव सांडवूनि ॥
      सांडवूनि देहबुध्दी । निरसोननि जीवोपाधी ।
    भक्त तारिसी भवाब्धीं । कृपानिधी कृपाळुवा ॥
हे सदगुरुनाथा, तुझ्या कृपेला अंत नाही. अनंत कृपा का म्हटली आहे ? कारण  ही कृपा संसाराच्या छोट्या मोठ्या समस्येसाठी नाही तर मनुष्याचा जीवच तारल्या जातो त्यासाठी होते.  संसाराची सुखदुःख का आहेत? खरे सुख काय आहे त्याचा बोध खरा गुरु देतो. गुरु जो जीवाचा जीव घेऊन जो देहभावाचा भ्रम मोडून शिवत्वाची ओळख करुन देतो.  
             साधारणतः  मनुष्याची बुध्दी सदेैव आपला देह,
 त्याचा लौकिक, घरदाराची, सत्ता संपत्ती याचे चिंतन करीत असते व मग यातून जो देहाभिमान होतो, खरा  गुरु तो नष्ट करतो. ती सांडवूनि देहबुध्दी, निरसोनि जीवोपाधी, गुरु आपल्या भक्ताला भवाब्धी, भवसागरातून  तारतो. वाचवतो. गुरुघंटाल डुबवतो. म्हणून पळा म्हणतात कबीरजी.
          सदगुरु जग्गी वासुदेव यांची ध्यान पध्दती पाहत होतो. ते त्यामध्ये ते म्हणायला सांगतात, मी शरीरही नाही, मी मनही नाही.  
            तेव्हां जो देहभ्रांती तोडतो, जो मनोभ्रांती तोडतो? व जो शेवटची जीवभ्रांतीही तोडतो तोच खरा गुरु. जो या तिनही भ्रांतीला पोसत असेल तर पळा अशा गुरुजवळून लवकरात लवकर, असेच कबीरजी म्हणत आहेत.
 संतश्रेष्ठ कबीरजींना श्रध्दा नमन!
                               

-  शं.ना.बेंडे पाटील               

Web Title: The true Guru is the one who breaks delusion of life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.