वेळेच्या व्यवस्थापनासाठी ८+८+८ हे सूत्र वापरून पहा- ग्यानवत्सल स्वामी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 01:06 PM2021-03-31T13:06:09+5:302021-03-31T13:08:33+5:30
वाळूचे कालमापनाचे यंत्र डोळ्यासमोर ठेवा. झरझर निसटणारी वाळू म्हणजे आपल्या हातून निसटणारी वेळ आहे. तिचा योग्य विनिमय करायचा असेल तर प्रत्येक दिवसाचा हिशोब ठेवायला शिका.
गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून हिऱ्यापेक्षा अमूल्य काही असेल, तर ती आहे वेळ! आज सकाळी आपण जो सूर्योदय पाहिला, तो तसाच उद्या अनुभवता येईल असे नाही. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. परंतु, या संधीचे सोने केले नाही, तर वेळ वाया गेला, असे म्हणावे लागेल. यासाठी वेळेच्या नियोजनाला प्राधान्य द्या; सांगत आहेत आध्यात्मिक वक्ते ग्यानवत्सल स्वामी.
स्वामींनी वेळ व्यवस्थापनाला त्रिसूत्रीत विभागले आहे. ते सांगतात, वाळूचे कालमापनाचे यंत्र डोळ्यासमोर ठेवा. झरझर निसटणारी वाळू म्हणजे आपल्या हातून निसटणारी वेळ आहे. तिचा योग्य विनिमय करायचा असेल तर प्रत्येक दिवसाचा हिशोब ठेवायला शिका. हा हिशोब कसा मांडायचा? तर दिवसातल्या २४ तासांना तीन टप्प्यात विभागून घ्या.
पहिले आठ तास झोपेचे. ती पूर्ण झाली नाही, तर सगळे गणितच बिघडेल. पुढचे आठ तास आपल्या नियोजित कामाचे. अभ्यास, व्यवसाय, नोकरीचे. शेवटचे आठ तास, जे आपण वाया घालवतो, ते आठ तास आपल्याला कामी लावायचे असतील, तर त्यात आणखी ९ भाग पाडून त्यांना आलटून पालटून प्राधान्य दिले पाहिजे.
पहिला टप्पा :कुटुंब, मित्रपरिवार, नातेसंबंध
दुसरा टप्पा : आरोग्य, स्वच्छता, छंद
तिसरा टप्पा : आत्मसंवाद, निर्मळ हास्य आणि समाजसेवा
या गोष्टी शेवटच्या आठ तासात आपण केल्या पाहिजेत. जेणेकरून आपल्याला आयुष्यात कंटाळा येणारच नाही. नैराश्य स्पर्श करू शकणार नाही. वेळ वाया जाणार नाही आणि एक चांगले, आनंदी आणि निरोगी आयुष्य जगल्याचे समाधान आपल्याला नक्की मिळेल.
म्हणून आजपासून आयुष्यात ही त्रिसुत्री वापरायला सुरुवात करा, सकारात्मक बदल आपोआप घडू लागतील.