नैराश्याच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी 'हा' प्रभावी उपाय आजमावून बघा आणि इतरांनाही सांगा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 03:55 PM2022-07-05T15:55:18+5:302022-07-05T15:55:57+5:30
नैराश्य आपोआप येते की आपण ओढवून घेतो? हे शोधण्यासाठी योग्य वेळी योग्य लोकांचा सल्ला गरजेचा; जसा की हा...
एक संसारी माणूस गेले अनेक दिवस घरी चिडचिड करत होता. ऑफिस कामातही त्याचे लक्ष लागेना. कोणाशी बोलावेसे वाटेना. रोेजचे काम, डोक्यावरचे कर्ज, भविष्यातले प्रश्न यासर्वांनी तो पिचून गेला होता. बाहेरचा सगळा राग तो घरच्यांवर काढत असे.
एक दिवस तो घरी आल्यावर बायकोने शांतपणे त्याला रागराग होण्याचे कारण विचारले. त्याच्याजवळ उत्तर नव्हते. तो एवढेच म्हणाला, की 'मला ही नैराश्याची सुरुवात आहे असे वाटत आहे. सध्या माझ्या आयुष्यात काहीच चांगले होत नाही असे सतत वाटून निरुत्साहीपणा जाणवत राहतो.'
बायको म्हणाली, `माझ्या ओळखीत एक मानसोपचार तज्ज्ञ आहेत ते भविष्यही पाहतात. त्यांच्याशी बोलून पाहता का? ते तुमचे मानसिक प्रश्न आणि त्याचबरोबर तुमची ग्रहदशा पाहून उकल सांगतील.'
नवऱ्याला उपाय पटला. त्याने तज्ञांची भेट घेतली व आपली पत्रिका दाखवली. तज्ञांनी पत्रिकेवरून नजर टाकत म्हटले, ग्रहदशा व्यवस्थित आहे. तुमचे प्रश्न मानसिक स्थितीशी जोडले आहेत असे वाटते. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मी काही विचारतो, ते सांगा.'
असे म्हणत तज्ञांनी त्या माणसाला त्यांच्या शालेय मित्रांशी संपर्क आहे का असे विचारले. त्यांच्याशी भेटीगाठी करण्याचा सल्ला दिला आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटा असे सांगितले. त्या माणसाने तसे केले. जुन्या ओळखी शोधून शालेय मित्रांची भेट घेतली. पुढच्या आठवड्यात तो पुन्हा तज्ञांना जाऊन भेटला.
तज्ञांनी विचारले, 'शालेय मित्रांना भेटून कसे वाटले?'
तो म्हणाला, 'सर, तुमचा उपाय खूपच परिणामकारक ठरला. माझ्या शालेय मित्रांपैकी अनेक जण चांगल्या हुद्द्यावर काम करत आहेत. काही जण वैयक्तिक आयुष्यात सुखी आहेत तर काही दु:खी! काही जणांनी लग्नच केले नाही, तर काही जणांचे दोनदा लग्न होऊन मोडले. काही जण आजारांनी ग्रासले आहेत, तर काही जण आजाराच्या भितीने जगत आहेत. या सर्वांशी तुलना केली असता माझ्या वाट्याला यापैकी काहीच नाही. तरी मी उगीचच दु:खी होतो. पण का? हे मात्र मला कळले नाही! कृपया सांगा.'
तज्ञ म्हणाले, 'अनेकदा सुख टोचते म्हणतात, ते हेच. आपण अकारण छोटी मोठी दु:खं उगाळत बसतो. परंतु, दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावल्यावर कळते, की त्यांच्या तुलनेत आपले दु:खं काहीच नाही. मूळात हे कोणतेही दु:खं नसून काही काळासाठी मनावर आलेले मळभ आहे, ते दूर करणे आपल्या हाती आहे. त्याला नैराश्याचे लेबल लावून मिरवण्यापेक्षा लोकांशी भेटून, बोलून त्यांच्या सुखाऐवजी दु:खाशी तुलना करावी, म्हणजे आपण किती सुस्थितीत आहोत याची आपल्याला जाणीव होईल.
म्हणतात ना, पायात चप्पल नाही याचे दु:खं करू नका, अनेकांना चप्पच दूरच, पण पायही नाहीत! म्हणून जे आहे त्यात आनंद मानायला शिका आणि मनावरचे मळभ दूर सारून नैराश्य झटकून नव्या दमाने कामाला लागा. जमलेच, तर दुसऱ्यांनाही नैराश्याच्या विळख्यातून बाहेर पडायला मदत करा.