असाध्य ते साध्य करीता सायास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 05:42 PM2020-11-25T17:42:54+5:302020-11-25T17:43:01+5:30

अभ्यासाने आलेली अचुकता पाहून हे असाध्य होते पण प्रयत्नाने त्या व्यक्तीने साध्य केले असे वाटू लागते.

Trying hard is key to achieve Impossible | असाध्य ते साध्य करीता सायास

असाध्य ते साध्य करीता सायास

googlenewsNext

             साधुनी बचनाग खाती तोळा तोळा । 
                 आणिकांते डोळा न पाहावे ॥ 
                साधुनी भुजंग धरितील हाती । 
                 आणिकें कांपती देखोनियां ॥ 
               असाध्य ते साध्य करीता सायास । 
                  कारण अभ्यास तुका म्हणे ॥
            वत्सनाभ नावाची भयंकर विषारी वनस्पती आहे. जिला व्यवहारात बचनाग असेही म्हणतात.  औषधी म्हणूनही  हे विष वैद्य उपयोगात घेतात.  तेव्हा  हे विष रत्ती अर्धारत्ती  प्रमाणात  वापरतात. एका तोळ्यात सुमारे शंभर रत्ती बसतात. तुकोबा म्हणतात, काही लोक अभ्यासाने तोळा तोळा बचनाग खातात, त्यांचे ते एवढे विष खाणे डोळ्यांना पहावत नाही. तर काही लोक,  जहाल विषाने क्षणात मारणारा भुजंग प्रकारचा सर्प युक्तीच्या सवयीने  त्याला सहज हातात धरतात. जीवाचा थरकांप करणारा भयंकर सर्प पकडण्याचे कौशल्य हे अभ्यासाने प्राप्त होते. जगात मनुष्याला जे काही असाध्य वाटत असेल ते कष्टाचे प्रयत्नाने साध्य होते. याला कारण अभ्यास आहे. अभ्यासाचा अर्थ होतो  ईप्सित साध्य होई पर्यंत अविरत प्रयत्नशिल राहणे.
           तुकोबारायांचे समकालीन, औरंगजेबाचे सेवेत राहिलेले जोधपूर मध्ये १६४३साली  जन्मलेले  प्रकांड पंडित वृंदावनदास यांचाही दोहा तुकोबारायांचे वरील अभंगाशी थोडा सम अर्थाचा आहे. त्यांना वृंद या नांवाने ओळखले जाते. ते म्हणतात

      रसरी आवत जात है, सील पर पडत निसान ।
      करत करत अभ्यास के जडमती होत सुजान ॥

रसरी म्हणजे दोरी. दररोज दोरी थोडी थोडी जरी दगडावर घासल्या गेली तर दगडावर घाव होतो, घासल्याची निशाणी पडते. विहिरीच्या कांठावर असा दोरीने घासलेला दगड जरुर दिसतो. वृंद म्हणतात,  जडमती, दगड बुध्दी माणूसही रोज थोड्या थोडया अभ्यासाने सुजाण होऊ शकतो. सुज्ञानचा अपभ्रंश आहे सुजाण. जडमती आहे म्हणजे बुध्दीत जडत्व आहे, बुध्दीचा विकास नाही. पण अभ्यासाने बुध्दी विकसीत होते.
            असे म्हणतात आदि शंकराचार्यांचे काळात मंडनमिश्र नांवाचे श्रेष्ठ खूप मोठे तत्ववेत्ते होते. त्यांची मोठी कीर्ती होती. शास्त्र विवादावर त्यांना जिंकणे अशक्य होते. त्यांचा व शंकराचार्य यांचा शास्त्रार्थ म्हणजे शास्त्रावर झालेली चर्चा प्रसिध्द आहे. असा उल्लेख आहे की मंडनमिश्रच्या घरचा पोपटही वेदाच्या ॠचा म्हणायचा. मंडनमिश्रंच्या घरात सतत वेदपठण असायचे. पोपटही सततच्या ॠचा श्रवण अभ्यासातून पंडित झाला. सतत ॠचा ऐकण्याचे अभ्यासाने पोपटही ॠचा म्हणू शकतो तर मनुष्य कां नाही ? आई वडिलांना मोठे कौतुक असते जेव्हा त्यांचं काही न बोलणारं तान्हुलं बाळ नुकतेच नर्सरी वा केजीत जाते व इंग्रजी कविता म्हणू लागते.  हा अभ्यास आहे. अभ्यासाने गीता वा ज्ञानेश्वरी मुखोदगत असणारी माणसं आहेत.
                    योगासनाच्या शारीरिक करामती आम्ही पाहतो. कठीण शरीर रबरासारखे लवचिक होते. सर्कसीतील मुली तर अभ्यासाने एवढया लवचिकतेने करामती करतात की, योगक्रिया करणार्‍या योग्यांनाही मागे टाकतात. जादुगार ज्या करामती दाखवितो, त्या खरेच  जादु वाटतात. पण त्या अभ्यासाने सिध्द केलेल्या करामतीच असतात.             
             महत्वाची बाब म्हणजे असाध्य हे अभ्यासाने साध्य होते आहे तर ते साध्यच आहे. पण ते प्रयत्नाअभावी वा अभ्यासा अभावी असाध्य वाटते.  
माणूस  प्रथमदर्शनीच एखादी गोष्ट असाध्य ठरवतो. पण प्रत्येक असाध्य गोष्टीत पुढे अभ्यासाने व अनुभवाने प्राविण्य वाढत जाते. कौशल्य वाढत जाते.  कसब वाढत जाते. अचुकता वाढत जाते. ती अभ्यासाने आलेली अचुकता पाहून हे असाध्य होते पण प्रयत्नाने त्या व्यक्तीने साध्य केले असे वाटू लागते. तिनशे  वर्षा आधी माणूस सदेह चंद्रावर जाईल ही गोष्ट साध्यच वाटणारी नव्हती. पण अभ्यासाने त्याने आधी विमान बनविले व तो आकाशात उडाला. मग अनुभव व अभ्यासाचे आधाराने तो अंतरिक्षात उडाला व मग चंद्रावरही उतरला.
              रामकृष्ण परमहंसाचे काळातील एक मजेशीर गोष्ट आहे. त्यांचेकडे लोकांनी एक योगी आणला. तो महान योगी आहे जो पाण्यावर चालतो असे लोक रामकृष्णांना सांगू लागले. रामकृष्ण म्हणाले, अरे पाण्यावर चालण्याच्या कौशल्यासाठी तू आयुष्य खर्ची घातले. मी दोन आणे देऊन नावेतून गंगा पार करतो. 
             वरील उदाहरणावरुन संताचे मते असाध्य अभ्यासाने साध्य तर होते आहे. पण असाध्य शेवटी काय आहे, त्याचे मोल समजणेही महत्वाचे आहे. असाध्य ते साध्य करुनही आयुष्याचे हित काय साधल्या जाते हेही समजणे महत्वाचे आहे व तशी हिताची गोष्ट असाध्य असली तरी साध्य करण्यासाठी अभ्यास व्हावा असे तुकोबारायांनाही वाटते. 
             
 
                                             

- शं.ना.बेंडे

Web Title: Trying hard is key to achieve Impossible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.