तुका म्हणे माझे, हेचि सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 1, 2021 04:20 PM2021-01-01T16:20:42+5:302021-01-01T16:21:03+5:30
पंढरपूरचा पांडुरंग हे अखिल महाराष्ट्राचे लाडके दैवत. तो सावळा असूनही संतांच्या नजरेतून त्याच्याकडे पाहत आल्यामुळे तो सुंदरच दिसतो. सुंदर व्यक्तीला कोणतेही कपडे घाला, अलंकार घाला, ते शोभूनच दिसतात. नव्हे तर ते अलंकार त्या व्यक्तीमुळे खुलून दिसतात. तसेच काहीसे तुकाराम महाराजांना पांडुरंगाने ल्यायलेल्या अलंकारांबाबत वाटत आहे.
ज्योत्स्ना गाडगीळ
'दिल को देखो, चेहरा न देखो' असे एक जुने गीत हिंदी सिनेमात आढळते. माणसाचा चेहरा महत्त्वाचा नाही, तर त्याचे मन बघा, स्वभाव बघा, वागणे बोलणे बघा, एवढाच त्यामागचा आशय. परंतु, वास्तवात तसे होत नाही. आधी चेहरा मग वृत्तीचे आपल्याला दर्शन घडते. सहवासातून व्यक्ती कळत जाते. परंतु, सुरुवात चेहऱ्यापासूनच होते. त्यामुळे बाह्य रुपाची मोहीनी कोणालाही सुटलेली नाही. तुम्ही आम्हीच काय, तर संतांनाही नाही.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजही विठुरायाच्या बाह्य रूपावर भाळले आणि त्या रूपाचे कोडकौतुक करता करता म्हणतात, तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने! त्या रूपाचे गारुड एवढे, की दिवसरात्र त्याच्याकडे पाहिले, तरी मन भरणार नाही. पाहतच राहावेसे वाटेल आणि श्रीमुखाकडे पाहताना सर्वोच्च सुख मिळेल. ते रूप कसे, तर...
सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, कर कटावरी ठेवूनिया।
तुळशीहार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेचि ध्यान।
मकरकुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणि विराजित।
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने।
पंढरपूरचा पांडुरंग हे अखिल महाराष्ट्राचे लाडके दैवत. तो सावळा असूनही संतांच्या नजरेतून त्याच्याकडे पाहत आल्यामुळे तो सुंदरच दिसतो. सुंदर व्यक्तीला कोणतेही कपडे घाला, अलंकार घाला, ते शोभूनच दिसतात. नव्हे तर ते अलंकार त्या व्यक्तीमुळे खुलून दिसतात. तसेच काहीसे तुकाराम महाराजांना पांडुरंगाने ल्यायलेल्या अलंकारांबाबत वाटत आहे. ते म्हणतात, तो विठ्ठल, आपल्या अलंकारांना शोभा आणतो. त्याने गातली म्हणून तुळशीची माळ पवित्र! त्याने धारन केला म्हणून पीतांबर पवित्र, त्याने कानात घातले म्हणून कुंडलांना शोभा, कौस्तुभमणी त्याच्या वक्षावर रुळतो, म्हणून त्याच्याकडे लक्ष जाते. या अलंकारांनी विठुरायाला सजवले नसून त्याने अलंकारांचे महत्त्व वाढवले.
तुकाराम महाराजांच्या वर्णनात अजिबात अतिशयोक्ती नाही. एखाद्या सन्माननीय व्यक्तीला त्याच्या कार्याबद्दल पुरस्कार दिला जातो. तो केवळ व्यक्तीचा गौरव नसून, पुरस्काराचाही सन्मान असतो. आपण सगळे भारतीय आहोत, ही अभिमानाची बाब आहेच. परंतु, जेव्हा आपल्या देशातला नागरिक जागतिक पातळीवर आपले कर्तृत्त्व गाजवतो, तेव्हा तो भारताचा नागरिक आहे, असे सांगण्यात देशाचा सन्मान असतो.
त्याचप्रमाणे तुळशी माळा, कुंडले, कौस्तुभमणी, पीतांबर यांना महत्त्व आहेच, परंतु विठुरायाने त्यांना धारण केल्यामुळे त्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
या वर्णनातून तुकोबाराय सुचवतात, भक्त भगवंताचे नाव घेतो, यात विशेष काही नाही, परंतु भगवंताने भक्ताचे नाव घेणे हे विशेष आहे. त्याने ज्याला जवळ केले, त्याची किंमत आपोआप वाढते. भगवंताने आपल्याला जवळ करावे असे वाटत असेल, तर उपयुक्त व्हा, लोकोपयोगी व्हा, स्वत:साठी नाही, तर इतरांसाठी जगा. तसे केल्यावर भगवंत तुम्हाला आपलेसे करेल आणि त्या सगुण निर्गुण रूपाशी तुम्हीदेखील एकरूप होऊ शकाल.'