तुकाराम महाराज या अभंगात विठोबाची निंदा करत आहेत की स्तुती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 05:44 PM2020-12-12T17:44:32+5:302020-12-12T17:44:51+5:30

या अभंगात तुकाराम महाराजांनी निंदा करण्याच्या निमित्ताने पांडुरंगाचे गुणच वर्णन केले आहेत. तू पतितपावन आहेस, तू कृपानिधी आहेस, तू परिस आहेस, तू कल्पतरु आहेस असे नुसते म्हणून विनोदाने रंजक विधान नसते झाले. इते भक्ताची शरणता लक्षांश आहे व प्रभूची भक्ताबद्दलची अपेक्षाही लक्ष्यांश आहे. अशी गमतीची भाषा तुकाराम महाराजच करू शकतात, कारण सलगीचे नाते त्यांनीच साधलेले होते. 

Is Tukaram Maharaj condemning or praising Vithoba? | तुकाराम महाराज या अभंगात विठोबाची निंदा करत आहेत की स्तुती ?

तुकाराम महाराज या अभंगात विठोबाची निंदा करत आहेत की स्तुती ?

googlenewsNext

माय-लेकाचे, बाप-लेकीचे, दोन मित्रांचे, दोन मैत्रिणींचे किंवा सख्या शेजाऱ्यांचे एकमेकांशी असलेले अतूट नाते पाहताना, ते नेमके कोणत्या धाग्याने जोडले गेले आहेत, हे सांगणे अवघड असते. प्रेम हा प्रत्येक नात्याचा पाया असला, तरी नात्यांमधील प्रेमाचे स्वरूप वेगवेगळे असते. जिव्हाळ्याचे विषय वेगवेगळे असतात. या नात्यांमध्ये कधी वादविवाद तर कधी दुराव्याचे प्रसंगही ओढावतात, परंतु नाते तुटत नाही, दुरावत नाही. ते लाडिक किंवा प्रासंगिक भांडण असते. मनातले मळभ दूर झाले, की नात्यात पुन्हा पूर्वीइतकीच पारदर्शकता येते. असेच एक नाते आहे, भक्त आणि भगवंताचे. ते दोघेही परस्परपुरक आहेत. भक्ताशिवाय भगवंताला आणि भगवंताशिवाय भक्ताला ओळख मिळणे कठीण. याच नात्याचा उमाळा येऊन संत तुकाराम महाराज वर्णन करतात,

हेही वाचा : आपणच काय, तर संतदेखील करत असत देवाशी भांडण!

जरी मी नव्हतो पतित, तरी तू पावन कैचा येथ।
म्हणोनि माझे नाव आधी, मग तू पावन कृपानिधी।
लाहो महिमान परिसा, नाही तरी दगड कैसा ।
तुका म्हणे याचक भावे, कल्पतरु मान पावे।

शिष्याशिवाय गुरु नाही, श्रोत्याशिवाय वक्ता नाही व पापी माणसांशिवाय उद्धारकर्ता नाही. जर कोणी पतित नसेल, पापी नसेल, जर कोणी दीन नसेल तर पावन, उद्धारकर्ता कसा असणार? खरोखर याचकच नसला, दान घेणाराच नसला तर दातृत्वगुण कसा प्रकट होणार? तेव्हा भगवंताचे जे काही गुण आहेत ते भक्तांच्यामुळे प्रकट होतात. महाराज म्हणतात, देवा, पतितपावन हे जे तुझे नाव आहे त्यात पतिताचे नाव प्रथम, माझे नाव प्रथम येते व मगच तुझे नाव येते. मी जर पतित नसतो तर तुला काय किंमत असती? परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, पण लोखंडच नसेल तर परिसाचा गुण कसा व्यक्त होणार? तो नुसता दगडच म्हटला गेला असता? कल्पतरु म्हणे कल्पना करावी, मागावे त्या प्रमाणे इच्छा पूर्ण करतो. पण मागणारा नसेल, तर ते एक नुसते इतर झाडांसारखे झाडच म्हटले असते.

या अभंगात तुकाराम महाराजांनी निंदा करण्याच्या निमित्ताने पांडुरंगाचे गुणच वर्णन केले आहेत. तू पतितपावन आहेस, तू कृपानिधी आहेस, तू परिस आहेस, तू कल्पतरु आहेस असे नुसते म्हणून विनोदाने रंजक विधान नसते झाले. इते भक्ताची शरणता लक्षांश आहे व प्रभूची भक्ताबद्दलची अपेक्षाही लक्ष्यांश आहे. अशी गमतीची भाषा तुकाराम महाराजच करू शकतात, कारण सलगीचे नाते त्यांनीच साधलेले होते. 

अशाप्रकारे कोणा एकाशिवाय दुसऱ्याला परिपूर्णता येणे कठीण असते. म्हणून प्रत्येक नात्याची किंमत ओळखून नात्यांचा आदर करावा. त्या नात्यांच्या ठायी असलेले निष्काम प्रेम भगवंतावरील प्रेमाचेच प्रतिक असते. अशी नाती मिळणे दुर्मिळ बाब आहे. नात्यांच अनमोल ठेवा जपून ठेवा आणि दुसऱ्यांबरोबर आपल्याही आयुष्याला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा : लागली समाधी ज्ञानेशाची; इंद्रायणी काठी आळंदी यात्रेचे ७२४ वे वर्ष!

Web Title: Is Tukaram Maharaj condemning or praising Vithoba?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.