सांबरला त्याच्या शिंगाचा अभिमान होता; शेवटी काय झाले...वाचा ही गोष्ट!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 29, 2021 05:36 PM2021-01-29T17:36:36+5:302021-01-29T17:38:17+5:30

संपत्ती, संतती, सौंदर्य आणि कीर्ती या गोष्टी नशीबाने मिळतात. त्यांचा अभिमान केल्यास त्या नाशाला कारणीभूत होतात.

Tukaram Maharaj says that there should be satisfaction. Why? Read the deer story! | सांबरला त्याच्या शिंगाचा अभिमान होता; शेवटी काय झाले...वाचा ही गोष्ट!

सांबरला त्याच्या शिंगाचा अभिमान होता; शेवटी काय झाले...वाचा ही गोष्ट!

googlenewsNext

आपल्याला जे काही मिळाले आहे, ते दैवगतीने. मग ते सुख असो नाहीतर दु:खं! जे मिळाले आहे, त्यात आनंद मानावा आणि मिळालेल्या परिस्थितीचा सत्कार्यासाठी वापर करावा. तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान! परंतु एकूणच प्राणीमात्रांत, समाधान तर दूरच, परंतु नको त्या गोष्टींचा अभिमानच जास्त असल्याचे आढळून येते. पण म्हणतात ना, वृथा अभिमान कधीच टिकत नाही. गर्वाचे घर खाली होतेच. मग ते मनुष्याचे असो किंवा अन्य जीवजिवांचे. याच गोष्टीची जाणीव करून देणारी छानशी बोधकथा!

एकदा एक सांबर पाणी प्यायला पाणवठ्यावर गेले. पाणी पिताना त्याला आपले प्रतिबिंब पाण्यात दिसले. त्याने नीट निरखून पाहिले आणि स्वत:शीच आनंदीत होत म्हणाले, 'वा, किती डौलदार शिंगं आहेत नाही! कोणत्याही प्राण्याला एवढी सुंदरता लाभली नसेल. खरेच, ईश्वराने सुंदर शरीराबरोबरच सुंदर शिंगं देऊन आपल्यावर फार मोठी कृपा केली आहे.'

असे म्हणत, ते आनंदानी उड्या मारत निघाले. अचानक त्याचे लक्ष आपल्या पायाकडे गेले. सांबर अतिशय उदास झाले. आपल्या पायाकडे बघत म्हाले, `देवा तू मला सुंदर शरीर दिलेस, सुंदर शिंगे दिलीस आणि पाय मात्र काटकुळे दिलेस. एवढ्या सुंदर शिंगांना साजेसे चांगले जाडजूड पाय दिले असते तर किती बरे झाले असते?'

मनातल्या मनात देवाला दोष देत ते पुढे निघाले. थोडे पुढे जात नाही तोच त्याला एक सिंह दिसला. सिंह सांबरकडे पाहत होता. भुकेलेला सिंह सांबरकडे येऊ लागगताच जिवाच्या आकांताने सांबर पळू लागले. पळता पळता खूप दूर निघून गेले. सिंह अजून खूप मागे होता. सांबर चपळाईने एका दाट झाडीत शिरले. जीव वाचल्याचा त्याला आनंद झाला. 

थोड्या वेळाने सिंह माग काढत सांबरजवळ आला. सांबर पुन्हा पळू लागले. पळता पळता त्याची शिंगे करवंदाच्या जाळीत अडकली. जाळीतून शिंगे निघता निघेना. तोपर्यंत सिंह तिथे पोहोचलासुद्धा! आता जीव वाचवणे शक्य नव्हते. ज्या पायांना सांबर हिणवत होते, त्यांनी एवढ्या लांबवर त्याला नेले, सिंहाच्या तावडीतून वाचवले. पण ज्या डौलदार शिंगांचा अभिमान बाळगला, त्यांनीच शेवटी सांबरचा घात केला. 

म्हणून कोणत्याही गोष्टीचा वृथा अभिमान करू नये. संपत्ती, संतती, सौंदर्य आणि कीर्ती या गोष्टी नशीबाने मिळतात. त्यांचा अभिमान केल्यास त्या नाशाला कारणीभूत होतात.

Web Title: Tukaram Maharaj says that there should be satisfaction. Why? Read the deer story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.