Tulasi vivah 2020 : तुळशीच्या लग्नाला येते ३३ कोटी देवांची वरात; स्वागताला राहा तयार!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: November 25, 2020 12:03 PM2020-11-25T12:03:00+5:302020-11-25T12:05:16+5:30

Tulasi Vivah 2020 : भगवान महाविष्णूंचे जावई म्हणून स्वागत करणे आणि त्यांना आपली ज्येष्ठ कन्या तुळशी सोपवणे, हा विचारच किती सुखद आहे. या सोहळ्याचे वर्णन करताना संत नरसी मेहता श्रीकृष्णाला सांगतात, येताना एकटा येऊ नकोस, तर तुझ्याबरोबर सर्वांना घेऊन ये.

Tulasi vivah 2020: 33 crore gods including Lord Vishnu are ready for Tulsi's wedding! | Tulasi vivah 2020 : तुळशीच्या लग्नाला येते ३३ कोटी देवांची वरात; स्वागताला राहा तयार!

Tulasi vivah 2020 : तुळशीच्या लग्नाला येते ३३ कोटी देवांची वरात; स्वागताला राहा तयार!

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ 

लग्नाच्या गाठी स्वर्गात बनातात, असे म्हटले जाते. त्या जेव्हा जुळायच्या, जिथे जुळायच्या, जशा जुळायच्या, त्या तशाच जुळतात. त्यांच्या आड कोणी येऊ शकत नाही. अगदी कोरोनादेखील नाही. म्हणून तर लॉकडाऊन काळातही अनेक लग्न  पार पडली. त्यातच आता घरचे लग्नही होऊ घातले आहे. मात्र, इथे येणारी वरात २५-५० जणांची नसून ३३ कोटी देवदेवतांची असणार आहे. कारण, हा विवाह साधासुधा नसून तो तुळशी आणि श्रीकृष्णाचा विवाह असणार आहे. खुद्द भगवान विष्णूंचे जावई म्हणून स्वागत करायचे, तर आपल्याकडून लग्नाची पूर्ण तयारी नको का?

अखिल विश्वाचा पालनकर्ता श्रीकृष्ण अर्थात भगवान महाविष्णू चातुर्मासाची विश्रांती संपवून उठतात आणि लागलीच, सर्व भक्तगण त्यांचा विवाह लावून देतात. भक्ताचा हा भोळा भाव पाहून भगवंतही या विवाहाचा मनापासून स्वीकार करतात. विष्णूंची सर्वात प्रिय, पवित्र, पावन असलेली तुळशी, जिला हरिप्रिया असेही म्हणतात, तिच्याशी विवाह लावून देतात. भगवान विष्णू आणि तुळशी माता भक्तांना भरभरून आशीर्वाद देतात. त्यांच्या आशीर्वादाने घरातील शुभकार्याची सुरुवात होते, ती वर्षभर साखरपुडा, लग्न, मुंज, वास्तू, गृहप्रवेश इ रूपात सुरूच असते. 

हेही वाचा : Tulasi vivah 2020 : तुलसी विवाह मुहूर्त, तिथी आणि विधी

तुळशीचा लग्नसोहळा घरातील लग्न सोहळ्याप्रमाणे मोठ्या थाटामाटात पार पाडला जातो. फरक एवढाच, की हे लग्न कार्यालयात न लागता, घरच्या घरी किंवा गावाकडे अंगणात, मंदिरात पार पडते. मात्र, सर्व आप्तेष्ठांची त्या लग्नाला उपस्थिती असते. लग्नविधी, अंतरपाट, मुंडावळ्या, अक्षता, मंगलाष्टक अशा थाटात लग्न पार पडते.

भगवान महाविष्णूंचे जावई म्हणून स्वागत करणे आणि त्यांना आपली ज्येष्ठ कन्या तुळशी सोपवणे, हा विचारच किती सुखद आहे. या सोहळ्याचे वर्णन करताना संत नरसी मेहता श्रीकृष्णाला सांगतात, येताना एकटा येऊ नकोस, तर तुझ्याबरोबर सर्वांना घेऊन ये. आजवर भक्तांवर आलेल्या बिकट प्रसंगाच्या वेळी एकटा धावून गेला आहेस, आता तर तुझेच लग्न लावून देतोय, मग तर तू वाजत गाजत आलेच पाहिजेस...

घेऊनि सकळाला, श्रीपती यावे लग्नाला,
अर्पूनि सुवर्णनगराला, दिधले बहुसुख मित्राला, 
स्मरूनि भक्तीला, पुरविली वस्त्रे भगिनीला,
प्रपंच खटपट वाहूनी चरणाला, श्रीपती यावे लग्नाला।

भारतीय संस्कृती तुळशीला विभूती समजते आणि `तुलसी माता' या नात्याने तिचे पूजन करते. समाजातून रोग, विकार किंवा पाप दूर करण्यासाठी तुळशीप्रमाणे आपणही जर कटिबद्ध झालो, तर आपणही प्रभूशी लग्न लावू शकू . पण हे सगळे तारुण्यात शक्य आहे. या गोष्टीचे आपल्याला भान यावे, म्हणून तुळशी नारायणाच्या लग्नाचा मंडप उसाच्या झाडांनी बनवण्यात येतो. उसासारखे रसमय जीवन असेल म्हणजे तारुण्यात प्रभुकार्य करता आले, तरच प्रभुच्या मिलनाची शक्यता राहू शकते. कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी लग्नाचा मुहूर्त आहे, तर मग झाली की नाही लग्नाची तयारी ? 

हेही वाचा : त्रिपुरी पौर्णिमेला होणार, तुलसी विवाह व कार्तिक स्नान समाप्ती!

Web Title: Tulasi vivah 2020: 33 crore gods including Lord Vishnu are ready for Tulsi's wedding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.