Tulasi Vivah 2023: तुळशी विवाह लावण्याएवढीच तिचे पावित्र्य जपणे ही आपलीच जबाबदारी; घ्या 'ही' खबरदारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 07:00 AM2023-11-24T07:00:00+5:302023-11-24T07:00:02+5:30
Tulasi Vivah 2023: कार्तिकी द्वादशी ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या कालावधीत तुळशी विवाहाचा विधी आपण पार पाडणार आहोतच, त्याबरोबर लक्षात ठेवा या गोष्टी!
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला मानाचे स्थान आहे. तुळस भगवान विष्णूंना प्रिय असते. जिथे विष्णू तिथे लक्ष्मी. त्यामुळे ज्या घरात तुळस असते आणि जिथे तिची नित्य पूजा केली जाते, अशा घरांमध्ये लक्ष्मी माता सदैव वास करते. त्यामुळे तुळशीच्या वापरात काही नियम जाणून घेणेही महत्त्वाचे ठरते. ते नियम कोणते व त्याचे पालन कसे करायचे ते जाणून घेऊ.
तुळशीच्या रोपाची पूजा करण्यासोबतच त्याला जल अर्पण करताना अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते. तसेच अनेक वेळा लोक काहीही विचार न करता तुळशीची पाने तोडतात. अशा स्थितीत विनाकारण तुळशीची पाने तोडल्याने मनुष्य पापात सहभागी होतो. ज्योतिष शास्त्रानुसार तुळशीची पाने तोडण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. चला शोधूया.
तुळशीची पाने खुडताना लक्षात ठेवा पुढील नियम :
>> शास्त्रानुसार तुळस इतकी पवित्र आहे की भगवान विष्णूंनी ती आपल्या मस्तकावर ठेवली आहे. एवढेच नाही तर भगवान विष्णू, तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्याचा स्वीकार करत नाहीत. म्हणून वैधृति और व्यतीपात या दोन योगांमध्ये चुकूनही तुळशीची पाने खुडू नयेत. या योगाची माहिती दिनदर्शिकेत दिलेली असते. ती रोजच्या रोज पाहण्याचा सराव ठेवावा.
>> याशिवाय मंगळवार, रविवार आणि शुक्रवारी चुकूनही तुळशीची पाने खुडू नका. तसेच एकादशी, अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींनाही तुळशीची पाने खुडू नयेत.
>> घरात कोणाचा मृत्यू झाल्यास आपण सुतक पाळतो. सुतकाच्या वेळी देवाला स्पर्श करत नाही तसेच देव कार्यही करत नाही, त्याचप्रमाणे तुळशीचे पावित्र्य सोयर आणि सुतक या दोन्ही वेळेस काटेकोरपणे पाळावे.
>> ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळीही तुळशीची पाने तोडणे वर्ज्य ठरवले आहे.
>> आंघोळ केल्याशिवाय अस्वच्छ हातांनी तुळशीची पाने तोडू नये. तुळस पवित्र असल्याने अंघोळ झाल्यानंतरच तिला स्पर्श करावा. तसेच तुळशीची पाने कधीही चाकू, कात्री न तोडता नखांनी अलगद खुडून घ्यावीत.