मनरुपी इंजिनाला भक्तीमार्गाकडे वळवा; इंद्रिये आपोआप त्या मार्गाने जातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 06:06 PM2021-02-03T18:06:22+5:302021-02-03T18:08:04+5:30
इंजिना पाठोपाठ रेल्वेचे डबे धावतात. डब्याच्या पाठोपाठ इंजिन धावत नाही तसेच मनाच्या मागे इतर इंद्रिये धावत असतात मग या मनरुपी इंजिनालाच जर भक्तीमार्गाकडे वळविले तर प्रश्नच निर्माण होत नाही. इतर इंद्रिये आपोआप त्या मार्गाने जातील..!
- ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )
राघवाच्या अनंत पंथाकडे जाण्यासाठी मन जर भक्तीच्या मार्गाने तर श्रीहरी सहज प्राप्त होईल. भक्ती मार्गासाठी मनाचे सहाय्य नसले तर; कांहीही उपयोग नाही. मन हे सहावें इंद्रिय आहे. गीता माऊली म्हणते -
मनः षष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ।
इंजिना पाठोपाठ रेल्वेचे डबे धावतात. डब्याच्या पाठोपाठ इंजिन धावत नाही तसेच मनाच्या मागे इतर इंद्रिये धावत असतात मग या मनरुपी इंजिनालाच जर भक्तीमार्गाकडे वळविले तर प्रश्नच निर्माण होत नाही. इतर इंद्रिये आपोआप त्या मार्गाने जातील पण सगळ्यात अवघड हेच आहे की - मन हे भक्तीमार्गाकडे सहज वळत नाही. दासगणू महाराज म्हणतात -
करुं कायी करुं कायी । मन हे ऐकत नाही ।
बुद्धी कराया पुण्य जाय । परिमन खेचि अघडोही ॥
मन हे सगळ्यांत अवखळ इंद्रिय आहे. मन हे नाठाळ मुलासारखे आहे. मन हे अवखळ जनावरासारखे आहे. अवखळ जनावराला वठणीवर आणण्यासाठी त्याच्या गळ्यात जसे लोढणे घालतात तसे मनाला लोढणे हवे आहे. बहिणाबाई चौधरी एका काव्यात बहारीचे वर्णन करतात -
मन वढाय वढाय । उभ्या पिकातलं ढोरं ।
किती हाकला हाकला । पुन्हा येते पिकावर ॥
नामस्मरणामध्ये, भक्तिमार्गामध्ये कितीही अवीट गोडी असली तरी विषयाच्या ध्यासाने वेडे झालेले मन, मनुष्य देहाला येण्यापूर्वी फक्त विषय सुखाचीच गोडी अनुभवलेली असल्यामुळे या ही जन्मांत पुन्हा विषयांकडेच धाव घेते.
तुकाराम महाराज देखील म्हणतात -
काय करुं आता या मना । न सांडी विषय वासना ॥
प्रार्थिता राही राहेना । आदरे पतना नेऊ पाहे ॥
आता धावे धावे गा श्रीहरी । गेलो वाया नाही तरी ॥
न दिसे कोणी आवटी । आणिक दुजा तयासी ॥
मन विषयाचेच चिंतन करीत असल्यामुळे ते विषयासक्त झालेले असते. खरं तर मन इंद्रियांच्या आधीन होऊन बुद्धीचा दरवाजा झाकते आणि बुद्धीच नष्ट झाल्यामुळे -
बुद्धी नाशात् प्रणश्यति ।
सर्वनाश होतो म्हणून तर श्रीसमर्थ रामदास स्वामी मनांच्या दुसर्याच श्लोकांत या मनालाच उपदेश करतात की - बा मना.! तूं भक्तीच्याच मार्गाने जा..!
मना सज्जना भक्तीपंथेचि जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी ८७ ९३ ०३ ०३ ०३. )