एका देवघरात दोन शंख ठेवू नये आणि ठेवायचे असल्यास शास्त्रदंडक असा आहे की...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 02:28 PM2021-11-08T14:28:06+5:302021-11-08T14:28:25+5:30
शंखास अक्षता वाहू नये. फक्त गंधतुलसीपत्र किंवा गंधपुष्प अर्पण करावे.
देवपूजेत शंख आणि घंटा असणे ही अत्यावश्यक बाब समजली जाते. काही ठिकाणी गव्याचे शिंगही ठेवले जाते. शंखोदकात औषधी गुणधर्म असतात. वास्तविक देवाच्या अंगावर समर्पण करावयाचे शंखोदक हे रात्रभर त्या शंखात ठेवलेले असावे. पण हा औषधी गुणधर्म सहसा लक्षात आलेला नसतो.
पूजा करण्यापूर्वी शंख धुवून, पुसून तो भरण्यात येतो व त्याची पूजा करून त्यात कलशोदक मिसळून ते पूजाद्रव्य व आपणावर शिंपडले जाते. नंतर देवाच्या मूर्तींना स्नान घालताना तो शंख पात्रात बुडवून कधीही पाणी त्यात भरू नये असा शास्त्रदंडक आहे. कारण त्यामुळे शंख बुडवलेले पाणी सुरापानाप्रमाणे ठरते. म्हणून शंखात पात्राने वरून पाणी घालून तो शंख भरावा व देवांना शंखोदक अर्पण करावे.
देवांच्या मूर्तींमध्ये पंचायतनाची स्थापना असेल तर त्यातील बाणलिंगावर शंखोदक घालण्यास हरकत नाही. पण महादेवाची पिंड असेल तर तिला शंखोदकाने स्नान घालू नये. एकाच देवघरात दोन शंख ठेवू नयेत. पण उजवा शंख शंखोदकासाठी व डावा शंख ध्वनिसाठी ठेवायचा झाल्यास ते वेगळे व वेगवेगळ्या कोपऱ्यात ठेवावेत. शंखास अक्षता वाहू नये. फक्त गंधतुलसीपत्र किंवा गंधपुष्प अर्पण करावे.
शंखाचे पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व:
महाभारतात युद्धाचेवेळी भगवान श्री कृष्णाजवळ पांचजन्य शंख होता. तर अर्जुनाजवळ देवदत्त आणि भीमाजवळ पौंड्रक नावाचा मोठा असा शंख होता. युधिष्ठिराजवळ अनंतविजय, नकुलकडे सुघोष आणि सहदेवाकडे मणिपुष्पक शंख होता. यापैकी एका शंखाचा आवाज करुन युद्धाची सुरुवात केली जायची.
भारताच्या पुरातन इतिहास कालात शंख हे एक राष्ट्रीय नादवाद्य होते, मांगल्याचे प्रतीक होते. आपल्याकडील रत्नशास्त्रात फिक्कट गुलाबी रंगी गोलसर, स्वच्छ चकचकीत, सुंदर शंख हा रत्न मानतात. उजवा शंख व डावा शंख असे शंखात प्रकार आहेत. ते उजवीकडे व डावीकडे वळलेले असतात. उजवा शंख दुर्मिळ व पुण्यप्रद समजतात.