हनुमंताला भक्तश्रेष्ठ ही उपाधी का मिळाली, याचे वर्णन करणारा दोन ओळींचा श्लोक!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 08:00 AM2021-03-06T08:00:00+5:302021-03-06T02:30:01+5:30
या श्लोकातून बालमनावर योग्य संस्कार घालता येतात. हनुमंताचे चरित्र आजच्या तरुणांसाठी अतिशय आदर्श चरित्र आहे. मैत्री, प्रेम, भक्ती, दास्यत्व अशा सर्व बाबतीत त्याला तोड नाही.
शक्ती, भक्ती आणि युक्ती यांचा त्रिवेणी संगम हनुमंताच्या ठायी होता, म्हणून सकल संतांनी एकमुखाने त्याला भक्तश्रेष्ठ ही उपाधी दिली. कारण, ही उपाधी मिळूनही त्याच्याठायी अहंकाराचा लवलेश नव्हता, तर सदैव विनम्र भाव होता. या हनुमंताचे वर्णन करणारी अनेक स्तोत्र आपल्या परिचयाची आहेत. तरीदेखील दोन ओळीत त्याचे वर्णन करायचे झाले, तर समर्थ रामदास रचित मारुती स्तोत्रातील श्लोकाचा आधार घेता येईल.
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।
मनाचा वेग वाऱ्यापेक्षा जास्त आहे. ते घटकेत गल्ली ते दिल्ली एवढा वेगाने प्रवास करू शकते. अशा वेगवान मनावर ज्याने ताबा मिळवला. इंद्रियांना नियंत्रणात ठेवून जो जितेंद्र झाला. विद्वतचर्चेत भाग घेऊन ज्याने नम्रपणे आपले बुद्धिचातुर्य दाखवले. जो वानर सेनेचा नायक झाला आणि ज्याच्या ठायी प्रचंड सामर्थ्य असूनही ज्याने श्रीरामाचे दास्यत्व पत्करले त्या हनुमंताला आम्ही शरण जातो.
या श्लोकातून बालमनावर योग्य संस्कार घालता येतात. हनुमंताचे चरित्र आजच्या तरुणांसाठी अतिशय आदर्श चरित्र आहे. मैत्री, प्रेम, भक्ती, दास्यत्व अशा सर्व बाबतीत त्याला तोड नाही. राम नाम घेत कमावलेले शरीर आणि जीवनाला दिलेली योग्य दिशा आपणही आचरणात आणण्यासारखी आहे. म्हणून केवळ भक्ती नाही, तर युक्ती आणि शक्तीचाही आदर्श घेऊन हनुमंताचे अनुकरण आपण केले पाहिजे.
रामरक्षा आणि पाठोपाठ मारुती स्तोत्र म्हणण्याची सवय आपल्याला बालपणापासूनच आहे. काही कारणाने ती सवय मोडली असेल, तरी हरकत नाही. रोज दहा मिनिटे इंटरनेटवर स्तोत्र लावून त्याबरोबर आपणही म्हणण्याचा सराव केला, तर कोणत्याही वयात ही स्तोत्र सहज पाठ होतील आणि जिभेला चांगले वळण लागेल.