एकीच्या अध्यात्माने मोठं संकटसुद्धा जमिनीत गाडता येते
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 04:03 AM2020-07-10T04:03:22+5:302020-07-10T04:05:13+5:30
एकीने जबर शत्रूलाही हरवू शकतो याचा गावकऱ्यांना विश्वास होता.
- विजयराज बोधनकर
गावातल्या ‘त्या’ वाड्यात जायला गावकऱ्यांना एकप्रकारचं भय वाटायचे. हा तीन पिढ्यांचा प्रवास आहे. बाप गेल्यानंतर वारसाने मिळालेल्या इस्टेटीवर एकुलता एक मुलगा अधिराज्य व हुकुमशाही गाजवत होता. बापाने गरिबांवर सोडलेले हुकूम आणि बळजबरीचा अत्याचारच लहानपणापासून अनुभवले होता, त्याच संस्कारात तो वाढला होता. विषाच्या बाटलीतून काही अमृत बाहेर येणार नव्हते हे गावाला माहीत होते. पण भूतकाळात कधीकाळी अमृताच्या बाटलीचे रूपांतर विषाच्या बाटलीत झाल्याचे सा-या गावाने अनुभविले होते. या एकुलत्या एक नातवाचे आजोबा फार सद्गुणी होते, वारकरी होते. पण त्याची आजी मात्र फार कपटी आणि लोभी मनाची होती. तिच्या कपटी संस्कारातच पोटचा पोरगा लाडावला आणि मग नातू बिघडला. नातवाला इतरांचे तारूण्यही नासविण्याचे व्यसन लागले होते. घरात काम करणा-या गरीब भोळ्या स्त्रियांना फसवून तो अत्याचार करू लागला. कारण त्याला दौलतीने दंश केला होता. हळूहळू गावात त्याची धग जाणवू लागली. लोकांच्या मनात हळूहळू एक चीड निर्माण झाली होती. दौलतीने नातवाने रग्गड माणसे दावणीला बांधली असली तरी गावात एकीचे अध्यात्म विश्वासाचे होते. या एकीने जबर शत्रूलाही हरवू शकतो याचा गावकऱ्यांना विश्वास होता.
गावातले पाप समूळ नष्ट करण्याचा गावाने विडा उचलला. एकीचे बळ खूप मोठे असते हे गावकरी जाणून होते. जुलुमाने हैवानाचे रूप घेतले आणि एक दिवस एका पीडित स्त्रीने बंड पुकारले. तिच्यामागे पूर्ण गाव उभा राहिला आणि त्या अत्याचारी नातवाच्या विरोधात गावाने पोलीस दरबारी रिपोर्ट केला. त्या निर्मळ स्त्रीवर झालेला बळजबरीच्या अत्याचाराच्या अर्जावर अर्ध्या गावाच्या सह्या केल्या गेल्या आणि या एकीमुळेच गाव सशक्त बनला. शापित संपत्ती शेवटी हरली. नातवाला तुरूंगाची हवा खावी लागली. तात्पर्य हेच की एकीच्या अध्यात्माने मोठं संकटसुद्धा जमिनीत गाडता येते.