स्मार्त आणि भागवत एकादशीमधला भेद आणि उत्पत्ती एकादशीचा उपास नेमका कधी करावा ते पहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 10:23 AM2023-12-08T10:23:17+5:302023-12-08T10:24:09+5:30

Utpatti Ekadashi 2023: ८ डिसेंबर रोजी स्मार्त एकादशी आणि ९ डिसेंबर रोजी उत्पत्ती एकादशी असल्याचे दिनदर्शिकेत म्हटले आहे, त्यातला भेद जाणून घेऊ!

Utpanna Ekadashi 2023: Know the difference between Smart and Bhagwat Ekadashi and know exactly when to worship Utpatti Ekadashi! | स्मार्त आणि भागवत एकादशीमधला भेद आणि उत्पत्ती एकादशीचा उपास नेमका कधी करावा ते पहा!

स्मार्त आणि भागवत एकादशीमधला भेद आणि उत्पत्ती एकादशीचा उपास नेमका कधी करावा ते पहा!

विष्णुभक्तांसाठी एकादशी हे व्रत म्हणजे एक पर्वणीच असते. त्यामुळे ते नेमाने सर्व एकादशी करतात. ज्यांना उपास करणे शक्य नसते त्यांनी भगवान विष्णूची पूजा करतात. तसेच साधा सात्त्विक आहार घेतात. 'ऊँ नमो भगवते वासुदेवाय नम:' या मंत्राचा जप करतात. अथवा विष्णुसहस्त्रनामाचे श्रवण-पठण करतात. मात्र जेव्हा एखादी तिथी विभागून येते आणि दिनदर्शिकेत दोन दिवसांवर एकाच तिथीचा दोनदा उल्लेख येतो तेव्हा काही भाविकांचा गोंधळ होतो. जसे की स्मार्त आणि भागवत एकादशी! ९ डिसेंबर रोजी येणाऱ्या उत्पत्ती एकादशीला ही आणखी दोन नावे का? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही माहिती तुमच्यासाठी!

उत्पत्ती एकादशी : 

सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावाने वर्तमानासह मागील जन्माची पापे नष्ट होतात. यासोबतच अनेक पिढ्यांतील पितरांना मोक्ष प्राप्त होतो. ज्यांना एकादशीचा उपवास सुरू करायचा आहे ते उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरु करू शकतात. या एकादशीच्या तिथीला देवीचा जन्म झाला म्हणून तिला उत्पन्ना तसेच उत्पत्ती एकादशी असेही म्हणतात. जाणून घेऊ एकादशीचे महत्त्व आणि कथा. 

मग स्मार्त एकादशी म्हणजे काय?

तर दशमी संपून एकादशी सुरू होताना त्या तिथीने सूर्योदय पाहिला नाही पण तो दिवस नव्या तिथीच्या नावे सुरू झाला असेल तर त्याला स्मार्त तसेच दर्श असा उल्लेख केला जातो. म्हणजे तिथी सुरू झाली पण तिथीशी संबंधित व्रत सूर्योदय पाहिलेल्या दिवशीच करायचे यासंबंधी ती सूचना असते. म्हणून ती स्मार्त एकादशी!

भागवत एकादशी : 

जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते. म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झालेली असली तरी तिने जर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी पाळली जाते आणि दिन दर्शिकेवर देखील सूर्योदय पाहिलेल्या तिथीवर भागवत धर्माचे ध्वजचिन्ह दिसून येते. भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव त्यालाच भागवत एकादशी म्हणतात. वैष्णव उदय तिथी मानतात. स्मार्त वाले जिथून तिथी सुरू झाली ती तिथी मानतात आणि व्रत सुरु करतात. हा तो फरक. 

स्मार्त म्हणजे जे लोक वेंदांवर, श्रुती स्मृती, पुराण यांना प्रमाण मानतात, ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान आहे, ते स्मार्त एकादशी पाळतात. थोडक्यात ऋषी, मुनी तसेच कर्मकांड करणारे योगी स्मार्त एकादशी करतात. तर वैष्णव म्हणजे जे विष्णू भक्त आहेत, संसारी आहेत, जे सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात ते भागवत एकादशीचे व्रत करतात. म्हणून विष्णू भक्तांनी स्मार्त एकादशीला विष्णू पूजा करावी मात्र एकादशी व्रताचे पालन भागवत एकादशीला करावे असे शास्त्र सांगते.

Web Title: Utpanna Ekadashi 2023: Know the difference between Smart and Bhagwat Ekadashi and know exactly when to worship Utpatti Ekadashi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.