Valentines Day 2023: प्रेमाला असमाधानाची वाळवी लागू देऊ नका अन्यथा नाते पोखरले जाईल! - गौर गोपाल दास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 05:19 PM2023-02-13T17:19:44+5:302023-02-13T17:20:07+5:30
Valentines Day 2023: थोडक्यात समाधान मानेल तो मनुष्यच काय? पण याच हव्यासापोटी आपण आपला आनंद गमावून बसतोय याची जाणीव या गोष्टीतून होईल हे नक्की!
प्रेम ही अतिशय सुंदर भावना. जपून वापरली तर आयुष्यभराचा आनंद. परंतु त्याला अपेक्षा जोडली गेली, की प्रेमाचा अंत होतो आणि वादाला तोंड फुटते. प्रेम संपुष्टात येण्याची अनेक कारणे आहेत, पैकी एका कारणाकडे लक्ष वेधून घेताना प्रख्यात व्याख्याते गौर गोपाल दास एक गोष्ट सांगतात आणि सावधही करतात, की तुम्ही त्या गोष्टीचा एक भाग बनू नका. ती गोष्ट कोणती ते पाहू.
एकदा एक राजा आपल्या प्रधानासह राज्याचा फेरफटका मारण्यासाठी वेषांतर करून निघाला. राज्यात सगळी आलबेल होती. समाजव्यवस्था सक्षम होती. संरक्षणव्यवस्थाही चोख होती. राजा समाधानाने पुढे जात असताना एक कुटुंब त्याच्या नजरेस पडले. तिथे नवरा बायको दोघेही गाणी गात आनंदाने कुंभारकाम करत होती. गरीब कुटुंब असूनही त्यांच्या घरात एवढा आनंद पाहून राजा प्रधानाला म्हणाला, माझ्याकडे सगळे वैभव असूनही माझ्या घरात आनंद नाही तेवढा आनंद या गरीब कुटुंबात कसा?
प्रधान म्हणाले, राजन, कारण हे कुटुंब अजून ९९ व्यवस्थेचे सभासद नाहीत.
राजा गोंधळला. प्रधान म्हणाला, आपण मला ९९ सुवर्णमुद्रा द्याव्यात. त्या मी या गरीब घरात देण्याची व्यवस्था करतो. त्यानंतर सहा महिने या कुटुंबाचे निरीक्षण करा आणि फरक बघा.
राजाने प्रधानाला सुवर्ण मुद्रा दिल्या. प्रधानाने एका रात्री त्या घराच्या दारासमोर सुवर्ण मुद्रांची थैली ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी कुंभार बाहेर आला तर त्याला ती थैली दिसली. त्याने थैलीत डोकावून पाहिले. तो चक्रावला. पटकन आत गेला, दार लावले, मोहरा मोजल्या. ९९ मोहराच कशा? देणाऱ्याने १०० मोहरा दिल्या असल्या पाहिजेत. कदाचित उत्सुकतेमुळे माझा हिशोब चुकत असावा. असे म्हणत त्याने बायकोला मोहरा मोजायला दिल्या. तिनेही ९९ असल्याचे सांगितले. मुलांना मोजायला लावल्या त्यांनीही ९९ असल्याचे सांगितले. कुंभार बेचैन झाला. सुवर्ण मोहरा मिळाल्याचा आनंद होताच, पण एक मोहोर कमी असल्याने तो अस्वस्थ झाला. इरेला पेटला आणि एक मुद्रा कमवून १०० चा आकडा पूर्ण करण्याचा त्याने चंग बांधला.
तो दिवस रात्र मेहनत करून, रक्ताचे पाणी करून पैसे कमवत असे. १ मुद्रा कमवण्याच्या नादात तो वेडापिसा झाला. १ मुद्रा कमवणे त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. हे जाणून त्याच्या बायकोने विचार केला, लक्ष्मी दाराशी आली आहे तर तिचा उपभोग घ्यायचा सोडून नवरा दु:खं करत बसला आहे. आपण मात्र तसे करायचे नाही. सुख मिळाले आहे तर उपभोगायचे. असे ठरवून तिने दोन मोहरा खर्च केल्या. आईचे पाहून मुलांनीसुद्धा दोन मोहरा खर्च करून चैन केली. कुंभार दर रात्री मोहरा मोजत असल्याने एकाएक चार मोहरा गायब झाल्याने त्याने आकांडतांडव केला. बायको मुलांना जाब विचारला. कधी नव्हे ते त्यांच्या घरात वादावाद झाले. आणि त्यांच्या घरातली सुख, शांती, समाधान संपुष्टात आले.
प्रधानाने राजाला सांगितले, राजन हाच तो ९९ चा गट आहे. मनुष्य थोडक्यात समाधानी असतो, तोवर आनंदी असतो, परंतु अतिहव्यासापोटी तो प्रेम, शांतता, आनंद सगळे काही गमावून बसतो.
म्हणून प्रेमवीरांनो, तुमच्या नात्यात दुफळी माजण्यासाठी १ मोहोर पुरेशी ठरू शकते. कोणतेही १ कारण तुमचे प्रेम हिरावून घेवू शकते. त्या कलहाला आमंत्रण देऊ नका. अन्यथा जे आहे तेदेखील गमावून बसाल.