Valentines Day 2023:संतांनीदेखील जीवापाड प्रेम केले, त्यांची प्रेमावस्था कशी होती ते वाचूया त्यांच्याच शब्दांत!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 10:47 AM2023-02-10T10:47:23+5:302023-02-10T10:47:51+5:30
Valentines Day 2023: प्रेम ही सुंदर भावना केवळ नवरा बायको नात्यापुरती मर्यादित नाही, तर सर्व जीव मात्रांवर प्रेम करण्याचा व्यापक दृष्टिकोन आपले संत देतात.
प्रेम हा अत्यंत नाजूक, परंतु तेवढाच गोंधळात टाकणारा विषय. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला आपुलकी वाटते, की आकर्षण, की प्रेम अशा संभ्रमित अवस्थेत आपण असतो. परंतु, आध्यात्मात प्रेमाची सुंदर व्याख्या दिली आहे, ती म्हणजे `मी तू पणाची झाली बोळवणं' अर्थात दोन जीवांची एकरूपता. बघणाऱ्याला प्रश्न पडावा, आपण दोन व्यक्तींपैकी नेमके कोणाला पाहतोय? ही भावावस्था म्हणजे प्रेम. आपल्याला आवडणारी व्यक्ती, ती नसून आपणच आपल्याला पाहतोय, हा अनुभव, म्हणजे प्रेम. असे प्रेम करावे लागत नाही, ते सहज होत जाते, जसे संत सेना महाराज यांना झाले.
जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा,
आनंदे केशवा भेटताची।।
संत सेना महाराज ज्या पद्धतीने विठ्ठलाप्रती आपले प्रेम व्यक्त करत आहेत, त्याप्रमाणे आपणही आपल्या प्रेमाची तुलना करून हेच खरे प्रेम आहे का, याची खातरजमा करू शकतो.
पंढरीला गेल्यावर, आपल्या आनंद सागराला भेटल्यावर, त्यांना अन्य कोणत्याही सुखाची अपेक्षाच राहिलेली नाही. म्हणजेच, आजवर जे शोधत होतो, तेच हे अंतिम सुख, अशी मनाची खात्री पटते.
या सुखाची उपमा, नाही त्रिभुवनी,
पाहिली शोधोनी, अवघी तीर्थे।।
सुखाच्या शोधात माणूस धडपडत असतो. सुख मिळावे म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करतो. परंतु, सर्व प्रकारची सुखं क्षणिक, क्षणभंगूर वाटू लागतात आणि आपल्या प्रिय विठ्ठलाच्या ठायी शाश्वत सुखाची प्राप्ती होते, तेव्हा मनातले द्वैत संपून अद्वैताचा साक्षात्कार होतो.
ऐसा नामघोष ऐसे, पताकांचे भार,
ऐसे वैष्णव दिगंबर, दावा कोठे।।
प्रेमावस्था अशीच असते. त्या आनंदाच्या भरात प्रत्येक दिवस उत्सवासारखा साजरा करावा, असे वाटू लागते. संत सेना महाराजांनादेखील तसेच झाले आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला गेल्यावर पंढरपुरातील चैतन्य त्यांना उत्सवाप्रमाणे भासू लागले आहे. असे उत्सवी वातावरण झाल्यावर, दु:खाला आयुष्यात स्थान उरेलच कसे?
ऐसी चंद्रभागा, ऐसा पुंडलिक,
ऐसा वेणुनादी, कानी दावा।।
आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्याची प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडू लागते. नव्हे, तर ती एकमेवाद्वितीय वाटू लागते. 'याचि सम हा!' संत सेना महाराजसुद्धा त्याच प्रेमदृष्टीने पांडुरंगाच्या पंढरीकडे पाहत असताना म्हणतात, अशी निर्मळ चंद्रभागा, असा भक्त पुंडलिक, येथील एकूणच भारावलेले वातावरण, अन्य कोठे सापडेल का? असे ते भारावून म्हणत आहेत.
ऐसा विटेवरी उभा, कटेवरी कर,
ऐसे पाहता निर्धार, नाही कोठे।।
आपलया प्रेमळ व्यक्तीचे आपल्याला सान्निध्य लाभले, की खूप हायसे वाटते. हर प्रकारच्या संकटाला सामोरे जाण्याचे बळ मिळते. भले तो कटेवर हात ठेवून, विटेवर उभा असला, तरी केवळ नजरेने 'में हू ना' असा दिलासा देत असेल, तरी आपल्याला खूप आधार वाटतो. तो आधार संत सेना महाराजांना विठ्ठलाच्या ठायी सापडला आहे.
सेना म्हणे खूण, सांगितली संती,
या परती विश्रांती, न मिळे जीवा।।
प्रेमाची ही लक्षणं, संतांनी सांगितली आहेत आणि संत सेना महाराज, ते प्रेम अनुभवत आहेत. असे प्रेम लाभले, की अन्य कोणत्याही गोष्टींची आस उरत नाही. मन शांत होते. आयुष्यात कितीही खडतर प्रसंग आले, तरी या प्रेमाचा क्षय न होता, ते वृद्धिंगत होत जाते आणि चिरंतन आनंद देते.